राजेश बोबडे
बहुसंख्य लोक प्रतिकारक्षम नसतात, संघटित नसतात म्हणूनच मूठभर गुंडाचे फावते व ते समाजाचे स्वास्थ्य बिघडवू शकतात. इतकेच काय पण आज जनता जर संघटित झाली नाही तर मूठभर प्रतिगाम्यांचा एखादा संघटित गट दहशतवादाची हत्यारे वापरून आपणा सर्वाना गुलामही करू शकेल, तसे होणे अशक्य नाही. शांतिप्रेमी, सामर्थ्यशाली व राष्ट्रसेवादक्ष अशी जनतेची संघटनाच खऱ्याखुऱ्या लोकशाहीचा पाया होय. या सर्वोदय कार्याची फलश्रुती राजकारणाचे धोरण निर्माण करणे एवढीच आहे व असावी. असे महात्मा गांधींच्या हत्येनंतर प्रक्षुब्ध समाजाला शांत करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात..
‘आपले हित कसे व कोणत्या कार्यक्रमाने होईल, हे ओळखण्याची दृष्टी आणि पात्रता निर्माण करणे हेच कार्य महत्त्वाचे आहे. जनजागृतीचा कार्यक्रम आखायचा, संस्था स्थापन करायची आणि सत्तेच्या राजकारणात त्याचा विचका व्हावयाचा असे आजवर घडले आहे. तेव्हा क्रांतीकारक व प्रगतीप्रधान लोकसत्तेची पार्श्वभूमी तयार करण्यापलीकडे राजकारणावर नजर ठेवणे अनिष्ट ठरेल. विधायक जनतोद्धाराचे कार्य आणि राजकारण यांच्या बैठकीच भिन्न असू द्या.
सरकारने समाजाच्या प्रगतीच्या दृष्टीने जे अनिष्ट असेल ते कायद्याने नाहीसे करावे, असे आपण म्हणतो. पण कायद्यासारख्या कृत्रिम दडपणांनी मानसिक नि वैचारिक क्रांती होत नाही. तसेच पैशाच्या साधनांची वाट पाहूनही हे काम व्हावयाचे नाही. कारण त्यामुळे कार्यक्रमांनाच नव्हे तर तत्त्वांनाही मुरड घालण्याचा प्रसंग आल्याविना राहणार नाही. आता प्रत्यक्ष व अविलंब कामाला लागले पाहिजे. प्रथम थोडासा गोंधळ होईल पण एकदा चौफेर काम सुरू होऊ द्या, म्हणजे आपोआपच साऱ्या अडचणी दूर होऊ लागतील. श्रमजीवी जनतेला, किसान कामगारांना स्वातंत्र्य मिळेल, बंधुता व समता यावर अधिष्ठित, क्रांतिप्रधान लोकसत्ता निर्माण होईल, यासाठी श्रमाचा व प्रेमाचा मोबदला तरी देऊ या! हीच माझी माझ्या बांधवांना हाक आहे.
संप्रदायावर माझा विश्वास नाही. एखादी व्यक्ती गेल्यानंतर ती संप्रदायरूपाने जीवंत ठेवण्याचे प्रयत्न व कल्पना मला संमत नाहीत. महात्माजींच्या पश्चात त्यांचे केवळ अंधानुकरण न होता, त्यांना केवळ देव्हाऱ्यात न बसविता त्यांनी आमरण आचरलेला सर्वोदय कार्यक्रम वाढत्या निष्ठेने व जोमाने सुरू ठेवणे आवश्यक आहे. महाराष्ट्रीयांनी आपला तेजोभंग होऊ देऊ नये. महाराष्ट्र कलंकित झाल्याचा भास व्यर्थ आहे. महाराष्ट्राने राष्ट्राकरिता असीम त्याग केलेला आहे व पुढेही करेलच. गांधी गीतांजलीमध्ये महाराज आपल्या भजनात लिहितात..
किसने कहा ‘गांधी मरा’? अजि कहनेवाले मर गये।
किर्ति नहि मरती कभी, निंदक हि आखिर डर गये।
कहता तुकडय़ा, कहते-कहते, गांधीजी तो तर गये।।
rajesh772@gmail.com