राजेश बोबडे
आजपासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाला सुरुवात होत आहे. महापुरुषांचे अमूर्त स्वप्न अपूर्ण का? याविषयी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात- ‘‘महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, स्वामी विवेकानंद, साने गुरुजी यांसारख्या थोरामोठ्यांच्या हृदयात भारतीय समाजपुरुषाला वेगळ्याच आदर्श स्वरूपात सजविण्याची तळमळ रात्रंदिवस तेवत होती. समाजातील अनेक अनिष्ट चालीरीती, दोष व दुबळेपणाचे निर्मूलन करून त्यात समतेचे व शांततेचे रामराज्य निर्माण करण्याची त्यांची मनोकामना होती. त्यासाठीच त्यांनी असंख्य प्रयोग केले, शेकडो ग्रंथ लिहिले, हजारो व्याख्याने दिली. त्यांचे उत्तम विचार त्यांच्या ग्रंथांतून आजही वाचता येतात. आमचे सुशिक्षित लोक ते विचार वाचून थक्क होतात. पण एवढ्यानेच त्या थोर पुरुषांचे उद्दिष्ट सफल होऊ शकते का? महाराज म्हणतात, आजही भारतात निरक्षर लोक असल्याने ते त्या थोर पुरुषांच्या विचारांची तोंडओळखदेखील करून घेऊ शकत नाहीत. अशा स्थितीत हा सारा समाज त्या महापुरुषांनी अपेक्षिलेल्या साचात ओतला जाणे, त्याला योग्य घडण मिळणे कसे शक्य आहे? आणि हे घडत नसेल तर आमचे स्वातंत्र्य, सुधारणा व प्रगती हे मूठभर शिक्षितांचे नुसते स्वप्नच ठरणार नाही का? पण एवढ्यावरच ही दुर्दशा थांबत नाही.’’
हेही वाचा >>> चिंतनधारा: आपली प्रार्थना निष्क्रिय ठरू नये!
‘‘महापुरुषांचे विचार जे सुशिक्षित समजू शकतात ते त्यांचा प्रचार करत नसून, त्या विचारांहून वेगळ्याच पीछेहाट करणाऱ्या भ्रामक विचारांचा प्रचार मात्र अनेक स्वार्थी उपदेशकांकडून केला जात आहे. अनेक कर्मठतेच्या रुढी, खर्चीक व घातक चालीरीती, जातिपंथ – पक्षांचा गोंधळ, भक्ती- धर्म- ज्ञान- वैराग्य इत्यादींच्या नावावर बेजबाबदार आचारांचा फैलाव अपवाद वगळता बुवा, भिक्षुक, कीर्तनकार, पुराणिक, पंडे, बडवे करत आहेत. वर्षानुवर्षं कृष्णलीलेच्या व गुरुभक्तीच्या नावावर अनैतिकतेचे पाठ दिले जात आहेत; भोळ्या स्त्री-पुरुषांत दुबळेपणाची जोपासना केली जात आहे. विषमतेची मुळे खोल रुजविण्याचे दुष्कर्म अनेक वर्षांपासून कळत-नकळत असंख्य धार्मिक म्हणवणाऱ्यांनी केले आहे. या सर्व गोष्टीचा परिणाम असा झाला आहे की, आज समाजात मानवापेक्षा दानवांचीच संख्या वाढली आहे. अशा वातावरणात रामराज्य यांची उपज कशी होणार? सर्वोदयाची कल्पना कशी प्रत्यक्षात उतरणार? सानेगुरुजी, महात्मा गांधी यांच्या बलिदानाने तरी या विराट समाजाच्या घडणीत काही बदल घडून यायला नको का?’’
हेही वाचा >>> चिंतनधारा: आपले शिक्षण जीवनोपयोगी आहे काय?
‘‘देवत्वाला जगू न देणारे केवढे जहाल विष या समाजात पेरले गेले आहे, याची अजून जाणत्यांना जाणीव होऊ नये का? हे विष कोणी नहीसे करावे? त्या महापुरुषांचे विचार समाजात प्रत्यक्षात आणण्यासाठी कोण तयार आहे? या प्रश्नांच्या उत्तरातच सर्वोदयाचे बीज दडले आहे. समाजातील ते विष नाहीसे करून-अज्ञान व अनिष्ट कल्पनांचे उच्चाटन करून त्या महापुरुषांच्या धारणेनुसार सर्व ठिकाणी रामराज्य आकारास आणण्याचे सामर्थ्य आपणा प्रत्येकात आहे, सर्वांच्या सामूहिक भावनेत व संघटित प्रयत्नात आहे.
rajesh772@gmail.com