राजेश बोबडे
१९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी गुरुकुंज आश्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी तातडीची सभा बोलावून देशातील हिंदू-मुसलमांनामध्ये दंगल होऊ नये म्हणून जनजागृती करण्याचा निर्णय घेतला. देवभक्ती व देशभक्तीचे पालन करून शासनाला श्रीगुरुदेव सेवा मंडळाने मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियापासून सैन्यभरती मोहिमेला सुरुवात करून हजारो जवान लष्करात पाठविले. शासनाला सरंक्षण निधी दिला.
महाराज म्हणतात, ‘‘आपला देश एक जगावेगळा देश आहे. जगात पुष्कळ देश आहेत. पण ते सारे एकेका धर्माचे आहेत. पण ज्यात अनेक धर्म, वंश आणि पक्ष आहेत असा भारत हा एकच देश आहे. भारत पाकिस्तानविरोधात उभा आहे, मात्र तो मुस्लीम धर्माच्या व पाकिस्तानातील जनतेच्या विरोधात नाही. पाकिस्तानी हुकूमशहांनी जे आक्रमक धोरण अंगीकारलेले आहे त्यांचा बीमोड करणे हा उद्देश आहे. आजचे युद्ध हे धर्म आणि अधर्म, न्याय आणि अन्याय, चांगले आणि वाईट अशा स्वरूपाचे युद्ध आहे.’’
हेही वाचा >>> चिंतनधारा : आओ चिनीयों मैदान में!
‘‘जगातील सर्व वाईट शक्ती आज पाकिस्तानच्या बाजूने आहेत आणि सर्व सज्जन शक्ती तटस्थ आहेत. या वृत्तीशी सामना करणे याला आम्ही धर्मयुद्ध म्हणतो. धर्मयुद्ध म्हणजे धर्माचे धर्माशी युद्ध नसून धर्माचे अधर्माशी युद्ध, असे गीतेत सांगितले आहे. तुम्ही हिंदू असा, मुस्लीम असा नाही तर आणखी कोणी असा, तुम्ही सारे भारतीय आहात. देशावर आलेल्या संकटाचा एकजुटीने प्रतिकार करणे, हा आपला पहिला धर्म आहे. निधर्मी राज्य याचा अर्थ धर्महीन राज्य नव्हे. धर्मातीत राज्य असा त्याचा अर्थ आहे. येथे सर्व धर्माना सारखीच प्रतिष्ठा आहे. धर्म म्हणजे समाजाला सुसंघटित ठेवणारी विचारधारा. परंतु आज खऱ्या अर्थाने आपण आपल्या धर्मापासून दूर गेलो आहोत. जे येथे अन्याय करण्यासाठी येतील त्यांना येथे इंचभरसुद्धा जागा मिळणार नाही. मग ते चिनी असोत वा पाकिस्तानी!’’
हेही वाचा >>> चिंतनधारा : पुरुषी अहंकारामुळे महिलांची गळचेपी?
‘‘भक्तीची आणि पूजेची भावनासुद्धा आता आपल्याला बदलून घेतली पाहिजे. देवाची प्राप्ती गंध लावून आणि मूर्तीपुढे घंटी वाजवून होते, हा गैरसमज आहे. भोवतालची सारी राष्ट्रे आज शस्त्रबळावर उभी आहेत. लष्करी सामर्थ्य हा त्यांचा मूळ आधार आहे. अशा परिस्थितीत आम्ही केवळ अहिंसेचा जप करत बसू तर पराभूत होऊ. आमचेही शस्त्रसामर्थ्य आम्हाला वाढवावे लागेल. आक्रमणाचा प्रतिकार हिंसात्मक मार्गानी केला तरीसुद्धा ती हिंसा होऊ शकत नाही. हिंसेचा संबंध वृत्तीशी आहे. डॉक्टर ऑपरेशन करतो आणि शरीराचा वाईट भाग कापून काढतो. परंतु कोणी डॉक्टरला हिंसक म्हणत नाही. महाराज राष्ट्रवंदनेत म्हणतात,
सारा भारत रहे शिपाई,
शत्रु को दहशाने।
तुकडय़ादास कहे स्फूर्ति हो,
सबको भक्ती करने।
विजयी हो, विजयी हो,
विजयी हो, भारत देश हमारा ।।
rajesh772@gmail.com