राजेश बोबडे

आपण करीत असलेली नित्य प्रार्थना निष्क्रिय ठरू नये, असे स्पष्ट करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘सामुदायिक प्रार्थना हा आमच्या कार्याचा प्राण आहे; पण याचा अर्थ निष्क्रिय प्रार्थना असा मात्र नव्हे. प्रार्थना ही सर्वांना एका अधिष्ठानावर, एका सात्त्विक भूमिकेवर आणण्याची साधना असली तरी, तीमधून कार्याचीच स्फूर्ती घ्यावयाची असते; ईश्वराचे नुसते नाम जपावयाचे नसून त्याचे काम हाती घ्यावयाचे असते. ईश्वराचे काम म्हणजे तरी काय? आम्ही आतापर्यंत अनेक महापुरुषांच्या व अवतारांच्या कथा ऐकत आलो आहोत. त्यांना आम्ही अवतार किंवा महापुरुष ज्या गुणकर्मावरून म्हटले, ज्या अधिकारांना आम्ही दिव्य मानत आलो, त्यांचा विचार केला तर ईश्वरी कार्याचा उलगडा सहज होईल.’’

Donald Trump Home Hawan
US Election 2024 : डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयासाठी भारतात होमहवन; दिल्लीत धर्मगुरूंनी केली प्रार्थना!
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
amol mitkari jitendra awhad
“मुंब्र्यात जाऊन जितेंद्र आव्हाडांना…”, मिटकरींचं आव्हान; अजित पवारांवरील टीकेनंतर संताप व्यक्त करत म्हणाले…
Shani Dev Margi 2024
१५ नोव्हेंबरपासून शनी होणार मार्गी; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळेल प्रत्येक कामात यश
Indian Context of Federalism Loksatta Lecture Dhananjay Chandrachud
संघराज्यवादाचे भारतीय संदर्भ
Brijbhushan Pazare warned about to commit suicide if he pressured to withdraw candidature
“उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव आणल्यास आत्महत्या करणार,” ब्रिजभूषण पाझारे यांचा इशारा
Budhaditya rajyog in scorpio
‘या’ ३ राशी कमावणार बक्कळ पैसा; मंगळाच्या राशीतील बुधादित्य राजयोग देणार पैसा, प्रेम आणि प्रसिद्धी
chief justice of India Dhananjay Y Chandrachud
संघराज्यवादाचे भारतीय संदर्भ

हेही वाचा >>> चिंतनधारा: आपले शिक्षण जीवनोपयोगी आहे काय?

‘‘सदाचारी जनांचे रक्षण, दुर्वर्तनी लोकांचे दमन व समाजाचे योग्य पोषण आणि उन्नती, ही कार्ये केल्यामुळेच आपण त्या पुरुषांना महान अवतार म्हणत आलो ना? अर्थात तोच आदर्श समोर ठेवून आपल्या परीने देशकालानुसार उचित कार्य करण्यास सज्ज होणे हेच त्या महापुरुषांच्या अनुयायांचे कर्तव्य ठरत नाही काय? ईश्वराने निर्माण केलेल्या या सृष्टीत सर्वांना न्यायाने व सुखाने राहता यावे, ईश्वराची ही सर्व लेकरे एकोप्याने आणि समतेने नांदत राहावीत, हीच सृष्टिकर्त्याची इच्छा असणार आहे आणि हे कार्य करण्याची जबाबदारी सर्व प्रार्थनाप्रेमी उपासकांवर येते. या कर्तव्यासाठी कमर न कसता नुसतीच प्रार्थना जर कोणी करील तर ती निष्क्रिय समजली जाईल; मग ती सर्व कार्याचा प्राण कशी ठरणार? एकीकडे देवाची प्रार्थना करावयाची व दुसरीकडे दुष्ट बुद्धी ठेवावयाची, हाच प्रकार चालणार असेल तर त्या प्रार्थनेला प्रार्थना तरी कोण म्हणेल?’’

हेही वाचा >>> चिंतनधारा : विजयादशमीला नवा इतिहास घडवू या!

‘‘वास्तविक प्रार्थना ही आंधळी मागणी किंवा दुबळी हाक नसून ती एक जागृत प्रतिज्ञा आणि आत्मविश्वासाने ईश्वराला दिलेले अभिवचन आहे. हे प्रभू! तुझे कार्यच मी माझे समजतो. माझ्या हातून कोणताही अन्याय होणार नाही असा तुला भरवसा देतो आणि तू आम्हाला बुद्धिवान, कलावान, शक्तिमान व तेजस्वी होण्यात यश देशील असा विश्वास धारण करतो, अशी प्रार्थनाच सत्य असून या प्रार्थनेला कोणीही बट्टा लावणार नाही. ही प्रार्थना मनुष्याला दुबळे न बनविता सामर्थ्यसंपन्न करेल. प्रार्थनेचे खरे पथ्य म्हणजे जनहिताची तेजस्वी वागणूक; न्याय व सत्य-संस्थापनेची सक्रिय तळमळ. ती असेल, तर प्रार्थना ही अफू नसून एक महान संजीवनी आहे! जनतेची प्रामाणिक सेवा व न्यायनिर्मितीची वर्तणूक हेच प्रार्थनेचे खरे प्रत्यंतर आहे. ही गोष्ट जर निश्चित आहे तर, भक्तीच्या बाह्य अवडंबराऐवजी जीवनाच्या शुद्धतेकडेच लक्ष पुरविणे सर्वप्रमुख कर्तव्य ठरते आणि जीवनाच्या शुद्धतेकडे लक्ष द्यावयाचे झाल्यास कोणत्याही बाजूकडे दुर्लक्ष करता येत नाही. अर्थात प्रार्थनेद्वारे दृष्टीसमोर उभी करण्यात आलेली सर्वांच्या कल्याणाची, नीतिन्यायाची, सामुदायिकतेची व समतेची तत्त्वे ही सर्व व्यवहारात प्रत्यक्षपणे आकारास आणणे हेच सर्व उपासकांचे आद्या कर्तव्य ठरते.

rajesh772@gmail.com