राजेश बोबडे
दुरभिमान टाळण्याचा सल्ला देतानाच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘ही गोष्ट खरी आहे की, तुमच्या कुलात जे महापुरुष झाले असतील त्यांच्या नावानेच तुमचे कुल ओळखले जात असेल; तरी त्यांच्या थोरवीचा तुमच्या वागणुकीशी काय संबंध आहे? तुमच्या बऱ्या-वाईटपणाचे तुम्हीच भागीदार होणार. रामासारखा दिव्य पुरुष ज्याच्या कुळात आला त्यालाही आपल्या दुष्कृत्याचे फळ भोगणेच भाग पडले ना? जे महापुरुष झाले ते आपल्या पूर्वजांच्या नावावरच की स्वकर्तृत्वावर? आमच्या पूर्वजांनी केलेल्या सत्कृत्यांनीच आमचा उद्धार झाला, असे समजून ते स्वस्थ बसले असते तर त्यांच्याकडून विशेष ते काय घडणार होते? या गोष्टींचा विचार करून कर्तबगारीनेच आपण त्यांची पदवी प्राप्त केली पाहिजे.’’
‘‘नुसते आडनाव असणे निराळे आणि कर्तव्याने पदवी मिळवणे हे निराळे, असेच नाही का? काही लोक स्वत:ला सूरदास समजतही असतील, पण त्यांनी सूरदासाची माहिती तरी करून घेतली असते का, की त्या सूरदासाने आपले डोळे का फोडले आणि त्याचा अधिकार काय होता? जग जर असेच ज्यांच्या त्यांच्या नावावर खपू लागले तर, हल्लीचा समाज फिरून उठून उभा राहणे दुरापास्त आहे. असा जर प्रत्येक पुरुष आपल्या कर्तव्यपालनाशिवाय केवळ दुसऱ्याच्या नावावर जगू लागला, तर मनुष्यमात्राचा आवश्यक गुणविकास होणे बंद होईल. माणसे आपल्या मनुष्यपणालाच सोडचिठ्ठीच देऊन बसतील आणि मनुष्यपणाला काळिमा ठरणारे लोक त्याचा विपरीत फायदा घेतील, असे होणार नाही का? कारण, आपण जर रामाचे दास म्हणून मारुती बनलो नाही, नाव फक्त रामदास आणि वृत्ती मात्र अयोग्य, असे जर आपण राहू लागलो तर आपल्यापेक्षा आपल्या रामाचीच लोक अधिक िनदा नाही का करणार? हा कसला देव, जो आपल्या दासाला अंशत:सुद्धा आपल्यासारखा करत नाही!’’
‘‘अर्थात, असे म्हणताना त्यांनी हा विचार थोडाच केलेला असतो की- ‘माला बिचारी क्या करे जपनेवाला कपूत।’ यासाठी आपण स्वत:च आपल्या आदर्शाचे भूषण बनले पाहिजे. आपण उत्तम बनण्यातच त्याचा गौरव आहे. मला या संपूर्ण विवेचनातून एवढेच सांगायचे आहे की, तुम्हाला काय व्हावयाचे असेल ते थोरांच्या आदर्शाना समोर ठेवून स्वत:च्या कर्तबगारीने स्वत:च व्हा! ‘आमचे आदर्श’ म्हणून आपल्या पूर्वजांचे महत्त्व वर्णन करा, परंतु त्यांच्या मार्गाने गेल्याशिवाय मात्र आपणास गत्यंतरच नाही, हे नीट लक्षात असू द्या. मनुष्य आपल्या कर्तव्याने काय बनू शकणार नाही? असाध्य अशी गोष्टच जगात नाही, परंतु त्याला अनुरूप प्रयत्नांची आवश्यकता आहे. मी तर आपणास निश्चयाने सांगतो की, धनाढय़च काय, शूरवीरच काय, चक्रवर्तीच काय, प्रत्यक्ष परमात्माही बनवण्याची मानवी कर्तव्यात जबर शक्ती आहे. मग असे असताना मनाने भित्रे राहून आपले नाव इतरांच्या नावावर जगवण्याची प्रवृत्ती ठेवण्यात काय अर्थ आहे?’’ संत तुकाराम महाराज म्हणतात,
शुद्ध चर्या हेचि संतांचे पूजन।
लागतचि धन नाही वित्त।।
rajesh772@gmail.com