राजेश बोबडे

‘‘पूर्वी मनुष्याचा कल स्वाभाविकपणेच धार्मिक संस्कारांकडे असे. परंतु हल्ली प्रत्येक माणूस अन्न- वस्त्र- निवारा यांच्या विवंचनेत दिसतो. तेव्हा आपल्या दैनंदिन जीवनात हे मिळविण्याचा प्रयत्न करणे योग्य की भगवंताचे भजन करणे योग्य?’’ असा प्रश्न राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भेटायला आलेल्या एका शिक्षणाधिकाऱ्याने विचारला त्यावर महाराज म्हणतात, ‘‘ज्यांना धर्माची आस्था आहे अशा मनुष्यांच्या मनात हा प्रश्न उत्पन्न होणे साहजिक आहे. एरव्ही आजच्या धकाधकीच्या जीवनात एवढा विचार करण्याची तरी फुरसत कोणाला आहे? शिवाय योग्य काय आहे? याचा विचार करण्यापूर्वी आवश्यक काय आहे? याचाच विचार माणूस प्रथम करेल. आपली नित्याची आवश्यकता बाजूस सारून योग्य गोष्टींच्या मागे लागणे हे तरी कसे शक्य आहे?

‘‘कोणीही माणूस प्रथम अन्न, पाणी, वस्त्र, औषध, जागा आदि आवश्यक वस्तूंची व्यवस्था असल्याखेरीज देवाचे भजनही करू शकणार नाही. प्रथम त्याचे भजन चालते ते आवश्यकतांच्या पूर्तीचेच; आणि ते योग्यच आहे. भोजन हेच मनुष्याचे पहिले भजन! प्रथम जगण्याचा प्रयत्न होईल तरच पुढे विकासाचा विचार होऊ शकेल. झाड आधी जमिनीत रुजेल तरच ते पुढे आकाशाला कवटाळू लागेल, हा नियमच आहे. जगण्याचा प्रयत्न ही पहिली आवश्यक बाब, हे मान्य केले तरी, तो प्रयत्न कशा स्वरूपाचा असावा हे पाहणेही अगत्याचे आहे आणि तो प्रयत्न योग्य दिशेने केला तर तेही एक प्रकारे भजनच ठरणार आहे. ज्याच्या जवळ अन्न- वस्त्र नाही त्याने चोरी करून वा अनैतिक मार्गाने त्या वस्तू मिळवाव्यात का? कोणत्याही हीन प्रकारच्या किंवा निषिद्ध अशा वस्तूंवर जगावे का? कित्येक लोक या गोष्टीचे समर्थन करतील व करतात, हे आपण पाहतोच. आपद्धर्म म्हणून क्षणभर त्यांच्या म्हणण्याला दुजोराही दिला जातो. पण हा मनुष्यधर्म नव्हे, ही जाणीव तेवत राहिली पाहिजे. हे मनुष्यासारखे जगणे नव्हे, हे नुसतेच जगणे आहे, याची खूणगाठ बांधली पाहिजे. आणि सर्वप्रथम जगण्याला लायक ठरले पाहिजे.’’

‘‘अर्थात समाजाच्या ज्या दोषांमुळे कष्ट करूनही योग्य अन्न-वस्त्र मिळत नसेल ते दोष नाहीसे करण्यासाठी निर्धाराने झटले पाहिजे, झगडले पाहिजे. प्रामाणिकपणे जगता येईल, अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी धडपडले पाहिजे. सत्याला व चारित्र्याला तिलांजली न देता धडपडले पाहिजे. अशा प्रकारची ही धडपड हेसुद्धा एक धर्मकार्यच आहे. भजन आहे, असे मी मानतो. महाराज ग्रामगीतेत म्हणतात..

जो दुसऱ्यांसि उत्तम करितो।

त्यातचि आनंद मानतो।

तोचि सेवक मी समजतो।

येत्या युगाचा।।

rajesh772@gmail.com