राजेश बोबडे
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘तुलसीदासांनी राम निर्माण केला. सूरदास, मीराबाई आदींनी कृष्ण निर्माण केला. हे त्यांचे देवच होत. पण यांच्यानंतर देवच निर्माण होणार नाहीत हे म्हणणे चूक आहे. कारण हे देवही देव नसून मूळ मार्गदर्शक होत. वसिष्ठाने तरी रामास हेच सांगितले- याच दृष्टीने व्यक्तीत भेद निर्माण होतो. म्हणून त्याकडे न पाहता शक्तीकडे लक्ष वळवावे, असे श्रीगुरुदेव मंडळाने ठरविले. आपण म्हणाल की यात नवीन तत्त्वज्ञान कोठे आहे? नवीन तत्त्वज्ञान रामाने किंवा कृष्णाने तरी निर्माण केले काय? भारतीय संस्कृतीत कोणीही यापुढे नवीन तत्त्वज्ञान निर्माणच करण्याचे कारण नाही. एवढेच की ऋषी-महर्षीनी सांगितलेल्या पुरातन पद्धतीवर अज्ञानाचे ढग येतात तेव्हा ते दूर करण्याचे तत्त्वज्ञान साधनमार्गाच्या रूपाने पसरवायचे असते. वस्तूचे ज्ञान सांगणारे वस्तू होऊ शकत नाहीत. त्यांच्याद्वारे ते येत असले तरी त्यांच्यापेक्षा ते तत्त्व निराळे! मनुष्यास महत्त्व एवढेच की त्याच्याद्वारे ते प्रगट झाले.’’
हेही वाचा >>> चिंतनधारा : व्यक्तिपूजक नव्हे तत्त्वपूजक व्हा!
‘‘कोणी एखाद्याचा आवडता असल्याखेरीज त्याच्याजवळ अंतरंगांतील गोष्टी प्रकट करतो काय? तसेच गुरुदेवाचा तो लाडका म्हणून त्याच्याद्वारे ते आले हे खरे. मनुष्याची पूजा फुलांनी-फळांनी होते तर तत्त्वाची भक्ती विरहवृत्तीने, आत्मचिंतनाने होते. अंत:करण जोपर्यंत तदाकार आहे तोपर्यंत पूजा सुरूच असते. नाही तरी पूजेच्या बाह्य साधनांना महत्त्व पूजेसाठी नसतेच. महत्त्व असते आमच्या वृत्तीस तदाकारता प्राप्त होण्याचे. देवाच्या नावाने सौंदर्ययुक्त व कलावान व्यवहाराची सृष्टी निर्माण करून आपण चिंतनास सुलभता प्राप्त करून घेतो. सौंदर्याची आपली कल्पना आपण अधिष्ठानावर आरूढ करतो. वस्तुत: ही सर्व पद्धती स्वत:ला सात्त्विक बनविण्याची आहे. खरे तर आत्मचिंतनाने तत्त्वाची तदाकारता वाढविण्याच्या मार्गाचे अवलंबन करावे.’’
‘‘त्या गुरुदेव शक्तीजवळ याचना करायची असते की, ‘मलाही या अनेक महापुरुषांप्रमाणे तुझ्या विश्वात प्रकट होण्याचे द्वार बनव, तुझी शक्ती माझ्यात येऊ दे.’ हीच पूजेची शुद्ध भावना होय. मी नेहमी सांगत असतो, की व्यक्तीच्या पायावर आधारलेल्या परंपरेत गादीवर येणारे सर्वच अधिकारी नसतात व होऊही शकत नाहीत. बुवाचा मुलगा किंवा नातू त्याच्याइतकाच अधिकारी निघेल, अशी खात्री कोणताही बुवा देऊ शकणार नाही व अनाधिकारी लोकांमुळे परंपरेत विपर्यास निर्माण होऊन अनवस्था-प्रसंग ओढवतो. म्हणून शरीराने वा जात्याच गुरू मानण्याचे सोडून सदसद्विवेक बुद्धीचा मार्ग- म्हणजेच ज्यांच्यात दैवी शक्ती आहे त्यांनाच आदरणीय मानण्याचा मार्ग मी स्वीकारला. व सेवामंडळातही आमच्या जिवंतपणी किंवा पश्चात सर्वानी मान्य केलेला एखादा सेवकच मंडळाचा अधिकारी ठरविण्यात यावा. तात्पर्य, व्यक्तिपूजेचे बंड मला समाजातून काढून टाकावयाचे आहे. नाही तर मठातील महात्मा समाधिस्थ होताच व्यक्तीच्या नावाखाली मालकीबद्दल भांडणे सुरू होतात, पण मला ही दृष्टी नष्ट करून तत्त्वपूजेचा मार्ग जनतेसमोर ठेवायचा आहे.
rajesh772@gmail.com