राजेश बोबडे
सर्वधर्मसमभावाचे शास्त्रशुद्ध विवेचन करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘प्रत्येक धर्माचे मूळ तत्त्वज्ञान वेगळेच होते. आज मानवाने स्वार्थासाठी जे धर्माचे भेद केले तसे मूळ धर्माचे स्वरूप कधीच नव्हते. परमोच्च मानवीय मूल्यांची प्राप्ती हा प्रत्येक धर्मातील विचारांचा गाभा होता. आपल्या पुण्यकृतीने ‘नराचा नारायण’ होण्याचे धर्म हे प्रमुख साधन होते व त्याची उपासना करून प्रत्येक धर्मप्रवर्तकाने या पृथ्वीतलावर असामान्य व्यक्तित्व प्राप्त केले ही साक्ष इतिहास आपल्याला देतच आहे.’’
‘‘मुस्लीम धर्माचे प्रवर्तक महंमद पैगंबर, ख्रिस्ती- धर्मप्रवर्तक भगवान येशू ख्रिस्त, बौद्ध धर्माचे संस्थापक भगवान् गौतम बुद्ध यांच्यापासून आतापर्यंतच्या प्रत्येक धर्ममतप्रवर्तकाने मानवीय मूल्यांच्या प्राप्तीसाठी व जोपासनेसाठीच आपल्या प्राणांची आहुती दिली. परंतु त्यांचे अनुयायी मात्र आपसात वैर-विरोध वाढवून लढाया करतात, हे कितपत बरोबर आहे; याचा सर्वानी गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.’’ महाराज म्हणतात, ‘‘ही गोष्ट जाणूनच मी अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळाच्या सामुदायिक प्रार्थनेत सर्व धर्ममतांना व धर्मप्रवर्तकांना समुचित व आदराचे स्थान दिलेले आहे. आपल्यात अनेक उपासनाभेद असल्यामुळे प्रत्येक उपासकाला त्याच्या धर्ममतानुसार उपासना करता यावी म्हणून प्रार्थनाधिष्ठानावर फक्त एक पांढरेशुभ्र- स्वच्छ खादीचे आसन व एक गोल तकिया ठेवलेला आहे. तो यासाठी की प्रत्येकाला आपले आराध्य व मनोवांछित दैवत त्यावर बसविता यावे. अशा प्रकारे कोणत्याही धर्ममताच्या समर्थकास या सामुदायिक प्रार्थनेत सामील होण्यास कोणत्याच प्रकारची अडचण भासत नाही. उलट जो-तो आपल्या देवतेचे स्मरण तेथे वैयक्तिकरीत्याही करू शकतो व यासाठीच वैयक्तिक ध्यानाचा कार्यक्रम सेवामंडळाच्या सामुदायिक प्रार्थनेत ठेवलेला आहे.’’
‘‘तात्पर्य, सर्वधर्मसमभाव व सर्वधर्मसहिष्णुतेशिवाय खरे धर्माचरण घडणे शक्यच नाही, शिवाय आपल्या राष्ट्राचे भावनात्मक ऐक्य साधण्याकरिता अशा सामुदायिक प्रार्थनेशिवाय दुसरे कोणतेच माध्यम व पर्याय राष्ट्रासमोर आज तरी उपलब्ध असल्याचे दिसत नाही. १९५५ मध्ये जपान येथे विश्वधर्म व विश्वशांती परिषदेत महाराजांनी आपल्या ‘हर देश में तू..’ या लोकप्रिय भजनात देव व धार्मिक कल्पनेबद्दलचा आपला विशाल दृष्टिकोन स्पष्ट केला. महाराज भजनात म्हणतात,
हर देश में तू, हर भेष में तू,
तेरे नाम अनेक तू एकही है।
तेरी रंगभूमि यह विश्व भरा,
सब खेल में, मेल में तू ही तो है।।
यह दिव्य दिखाया है जिसने,
वह है गुरुदेव की पूर्ण दया।
तुकडय़ा कहे कोई न और दिखा,
बस मैं अरु तू सब एकही है।।
rajesh772@gmail.com