राजेश बोबडे

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘खोटी आदर्शप्रियता आपण समाजात प्रामुख्याने पाहात आहोत. वास्तविक ही आदर्शप्रीती नसून थोरांच्या शब्दांवर जगण्याचाच हा किफायतशीर धंदा आहे. जे या धंद्याला दूर सारून आपला देश सर्वतोपरी सुखी व्हावा म्हणून त्यागाने खरा आदर्श निर्माण करतील ते मारले जातील अथवा त्यांना मागे पाडण्याचे प्रयत्न केले जातील. आपण तत्त्वज्ञानाने उच्च पण व्यवहारात पशुतुल्य गणले गेलो आहोत. या कठीण साखळीतून बाहेर पडण्यासाठी आपल्याला आजचा रूढ धर्म, सध्याची दिखाऊ देशभक्ती, राजकारणातील शैली व प्रचलित वर्णाश्रमयोजना यात नुसती वरवर डागडुजी न करता, या गोंधळास मूठमाती देऊन यातून एक नवीन धारणा व नवे युगच निर्माण केले पाहिजे.’’

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

‘‘महापुरुषांनी हाडांची काडे करून या मानवी समाजाला खऱ्या आदर्शतेची जाणीव करून देण्याचे आटोकाट प्रयत्न केले पण त्यांचे लोण अजूनही खेडय़ापाडय़ांत पोहोचू शकले नाही. आणि ते कसे पोहोचणार? एखाद्या तापलेल्या वाळवंटात पावसाचे थेंब जमिनीपर्यंत पोहोचण्यापूर्वीच त्यांची वाफ व्हावी तशीच येथे अवस्था आहे. येनकेनप्रकारेण आपले मोठेपण टिकावे, या मनोवृत्तीचे लोक लहानात लहान अशा खेडय़ातही आढळतात आणि कोणाही थोर पुरुषाने संदेश दिला तरी त्याची योजना कशी बिघडवून टाकता येईल, याचाच विचार त्यांना सुचतो. ‘स्वप्राण देउनीया दुर्जन करितात विघ्न दुसऱ्यासी। जैसे भोजन करिता भोजनकर्त्यांसि ओकवी माशी।।’ या माशीसारखीच त्यांची गती असते. वासरात लंगडी गाय शहाणी या म्हणीप्रमाणे त्यांची स्थिती असते. त्यामुळे यापुढे जी सुधारणा करावयाची असेल त्यासाठी व्यापारी, पुढारी, भिकारी, कथेकरी, बुवा- महंत, विद्वान, पंडित, शिक्षक, सरकारी नोकर व गावातील काही बोलके लोक हे ज्या ज्या मार्गानी एकत्रित होतील त्यांचाच अवलंब केला पाहिजे. आपला देश कसा असावा हे त्यांना बौद्धिकतेने समजावून वा राजसत्तेने पढवून त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न समाजाची दिशाभूल व पिळवणूक न होऊ देता सोडवला पाहिजे. अशा रीतीने हे सत्कार्य सर्वाकडून घडवून आणले पाहिजे. असे जर आपण करणार नसलो तर आजची दुनिया कुणाच्यानेही ताळय़ावर येणे शक्य नाही असे माझे स्पष्ट मत आहे.’’

‘‘वरील कार्यालाच मी खरे समाजशिक्षण समजतो, अर्थात् विद्यार्थी मी वर दर्शविलेले लोकच आहेत. आधी त्यांनाच समाजशिक्षणाची गरज आहे, त्यानंतर मग माझ्या भोळय़ा समाजाला शिक्षण देण्यात यावे व तेच त्यांच्या पदरात पडेल असे मला वाटते. नाहीपेक्षा निव्वळ हंगामी सुधारणा केल्याने पैसा उधळण्यापलीकडे त्याला कवडी इतकीही किंमत राहणार नाही; व लोकांत भरमसाट आदर्शतेची चर्चा चालूनही आदर्श कोणालाही दिसणार नाही. याचा परिणाम हाच की मग माणूसच माणसाचा शत्रू होईल व ‘जिसकी लाठी उसकी भैंस’ अशा अनवस्थेतून युगप्रलय ताबडतोब पुढे येईल, हे वाचकांनी विसरू नये. यातील प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवून तिचा अनुभव घ्या म्हणजे कळेल.’’

rajesh772@gmail.com

Story img Loader