राजेश बोबडे
आज धनत्रयोदशीने दिवाळीची सुरुवात होत आहे. या सणामागच्या तात्त्विकतेचे चिंतन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी वेळोवेळी मांडले. महाराज म्हणतात, ‘‘व्यक्तिगत सुखासाठी वाटेल त्या सणावारांचे नाव घेऊन मनात येईल ते खावे-प्यावे व खुशाल मजा मारावी, हेच जर दिवाळीसारख्या सणांचे महत्त्व असेल तर ते दुसऱ्या बाजूस- गरीब, मजुरांच्या जीवनाला- किती घातक ठरेल हे सांगायलाच नको. याची कल्पना दिवाळसण आला म्हणजे गावात निरीक्षक बुद्धीने फिरून पाहिल्यावर सहज येते. काही उपयोग नसताही निव्वळ आवड म्हणून एकाने बारुदखाना व फटाके उडवावेत आणि काहींजवळ खाण्यासाठीही पैसा नसताना त्यांनी कर्ज काढून रूढींना बळी पडून व्याज सोशीत पुढच्या दिवाळीपर्यंत रडत दिवस काढावेत; अशी दिवाळी. ही दिवाळी आहे की दिवाळखोरी हा प्रश्न पडतो! इतरांसारखे न केल्यास धर्मबाह्य वर्तन ठरण्याची भीती असते.
महासणाला हौसेने खाण्याचे पदार्थ केलेच पाहिजेत; नवी वस्त्रे घातलीच पाहिजेत; लक्ष्मी कुठून तरी येईलच म्हणून कर्ज काढून सर्व दारे, खिडक्या, कोनाडे, भिंती यावर किंबहुना शेणखताचा उकिरडा, शौचालय व मागील खंडाऱ्यावरसुद्धा दिवे लावलेच पाहिजेत आणि अंगालाही उटणी, साबण, सुवासिक तेल लावून अभ्यंगस्नान केलेच पाहिजे; नाहीतर आपण पापी ठरू, असा समज धर्मवीर म्हणविणाऱ्यांनी करून दिल्याने ते संस्कार मनातून जात नाहीत.
हेही वाचा >>> चिंतनधारा : ..तुका झालासे कळस।
आज तरी आमच्या लाखो गावांतून सणावारांचा सोहळा हा असाच सुरू आहे. महाराज म्हणतात हे सगळं माझ्या दृष्टीने तरी विपरीतच आहे! सणावाराला गोड न केले तर पाप लागेल, हे म्हणणे व्यर्थ आहे. पण निदान वर्षांतून सणावाराच्या रूपाने येणाऱ्या काही ठरावीक दिवशीही गरिबांना अंगभर वस्त्र आणि पोटभर चांगले अन्न मिळू नये, असे कोण म्हणेल? पण ते मिळण्याच्या मोबदल्यात त्यांना वर्षभर चिंता आणि दु:ख भोगण्याचा प्रसंग यावा, हे तरी कसे मान्य करता येईल? समाजातील काही लोकांनी खूप चैन भोगावी आणि या असंख्य गरिबांवर सणावारीही असा पेचप्रसंग यावा, ही धार्मिक व लक्ष्मीपूजक म्हणवणाऱ्या लोकांना किती नामुष्कीची गोष्ट आहे! यातून सरळ मार्ग हाच निघतो की, एकतर त्या गावच्या जमीनदाराने वा धनवानाने दिवाळीसाठी सर्व गाव आपल्या घरी आमंत्रित केले पाहिजे हे शक्य नसेल तर सर्वांना दिवाळी उत्तम प्रकारे करता येईल अशी व्यवस्था तरी करून दिली पाहिजे.
हेही वाचा >>> चिंतनधारा : फूट पाडणारी ब्रिटिशनीती सोडून द्या!
अर्थात एका दिवाळीपुरतचे असे करून भागणार नाही. तेव्हा सर्वच सणावारांच्या व्यवस्थेसाठी म्हणून, गावातील सर्वच लोक आपापल्या रोजच्या उद्योगातून नित्याच्या गरजा भागवून सणावारांसाठी काही शिल्लक ठेवू शकतील, अशी व्यवस्थाच करण्यात आली पाहिजे. नाही तर सण, मानवांनी मानवांची फजिती करून ती हसत पाहण्यासाठी आहेत, असे का म्हणू नये?
rajesh772@gmail.com