उपासनेशिवाय जगात कोणीच उन्नती करू शकत नाही, असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे ठाम मत आहे. महाराज म्हणतात : ‘‘उपास्य आणि उपासनेची रीत या गोष्टी भिन्न असतील तथापि उपासनेची आवश्यकता मात्र सर्वाना आहे. एखादा गरीब मनुष्य कीर्तिशिखरावर चढतो तो तरी विशिष्ट उपासनेमुळेच ना? याचा सरळ अर्थ हा की, आकुंचित स्थिती किंवा लहान गोष्ट विकसित करण्याचा जो मार्ग त्यालाच आपण ‘उन्नतिपथ’ म्हणतो व जुने लोक ‘उपासना’ म्हणतात. त्यात सूक्ष्म फरक एवढाच की, उन्नती याचा अर्थ हल्ली भौतिक सुधारणा, नैतिक व्यवहार किंवा मानव्याचा विकास असा केला जातो आणि संतजन तो वेगळा करीत, इहलौकिक सुखाबरोबर परमार्थमार्ग साधून आत्मशक्तीस ओळखणे यासच ते उन्नती मानीत व ती शक्ती ज्या मार्गाने, ज्यांच्या संगतीने, ज्या आचरणाने व व्यवहाराने प्राप्त करून घेता येईल त्यास ऋषिमहर्षि ‘धर्ममार्ग’ किंवा ‘उपासना’ म्हणत असे मला विश्वासपूर्वक वाटते. याखेरीज उपासना म्हणजे जर व्यवहारशून्य होऊन वेडय़ासारखे गलिच्छ व आळशी बनणे असेल तर त्या उपासना मार्गाचा मी खास नाही. वास्तविक उपासना असे भलतेच शिकवीत नाही असे मी निश्चयाने सांगतो. लोभी लोकांनी उगीच त्याचा विपर्यास करून तत्त्वाची राखरांगोळी केलेली आहे असे मला बहुजन समाजाची उपासनापद्धती पाहून खेदाने म्हणावे लागते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा