राजेश बोबडे
‘कोणत्याही कार्यास एखाद्या उद्देशाने सुरुवात केली की, त्या प्रतिक्रियेशी झगडणे हे कर्तव्यच होऊन बसते. जो प्रतिक्रियेशी अनावर वृत्तीने झगडतो तो चांगल्या कर्मातही टिकू शकत नाही, मग वाईट कामाचा तर तमाशाच, हे ठरलेलेच आहे,’ असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भक्तीमार्गाचे धडे देताना सांगतात. महाराज याबद्दल म्हणतात, ‘नेहमीच्या झगडण्यात दोन प्रकार असतात. एक तर दूरवर विचार करून त्याच्या बऱ्या-वाईटपणाच्या परिणामांकडे पाहून- कर्तव्यतत्परता म्हणून सावधानता, सहनशीलता अंगी ठेवून झगडणे आणि दुसरे म्हणजे, आपण काय करतो याचा विचार न करता स्वार्थभावनेच्या भरात किंवा सुखदु:खाच्या आवेगात झटक्यासरशी आपल्यासहित दुसऱ्याचे नुकसान करणे. परंतु यात आपलेच नुकसान अधिक झालेले दिसेल.’
‘सत्कार्याचा निश्चय टिकवणे हे प्रथम सोपे वाटत असले, तरी ते बिघडविण्याकरिता ज्या अनेक प्रतिकारक वृत्ती निर्माण होतात त्यांचा सामना करणारी कणखर निर्भयता असावी लागते, नव्हे अंगी बाणवावीच लागते, कष्टाने ती निर्माण केली जाऊ शकते.
कुणी म्हटले की, आम्हाला हे कार्य अत्यंत आवडणारे आहे, तोच दुसरा म्हणतो- मला नाही आवडत. अशा वेळी मला हे का आवडते? याची यथोचित मांडणी पहिल्याला करता आलीच पाहिजे. आणि त्यात जर का तो अपुरा पडला तर दुसऱ्याने त्याला पछाडलेच म्हणून समजा. अर्थात त्यावर त्या प्रतिशक्तीचे असे वजन पडते की, तो फिरून आपले मत सांगायला उठतच नाही. समाजात अशा उदाहरणांचा तोटा नाही. आपण पाहतोच की, काही भोळेभाबडे लोक जातात कीर्तनाला आणि तिकडून रंगून येऊन सापडतात निंदकांच्या सपाटय़ात, अर्थातच मग दोघांची चर्चा सुरू होते.
एक म्हणतो- यावं महामुनी! कसं काय? पोहोचलात की काय मोक्षपदाला? आपण तर आज समाधिमग्नच दिसता बुवा. तो बिचारा जरा पक्का असला तर लाजून जात नाही! असला असाच साधारण, तर तो तिथेच कीर्तनाचा रंग विसरतो नि म्हणतो- ‘अहो! बघायला गेलो होतो, तेथे काय बुवाबाजी चालते ते. थोडा मजवरही परिणाम झालाच होता पण आता आपले दर्शन होताच तो मावळला. नको ते कीर्तन असे वाटू लागले आहे आता.’
अशा प्रकारे प्रतिक्रियेशी झगडण्यात जे मागे पडतात, ते स्वाभाविकपणेच गळून जातात. याचे कारण वास्तविक हेच आहे की, त्याविषयीची खरी जाणीव व रुचीच त्यांच्या हृदयात निर्माण झालेली नसते. ज्यांना तो विषय पूर्णपणे पटला व आवडला ते प्रतिक्रियेचा धीरोदात्तपणे सामना करतात. तिचा प्रतिकार करतात व प्रतिपक्षाचे तोंडसुद्धा बंद करू शकतात. साध्यासाध्या गोष्टींतही जर असे प्रसंग येतात तर विशेष सत्कार्य, सत्संगती, हरिभक्ती इत्यादी गोष्टींत किती तरी अडथळे येत असतील हे उघड आहे. अर्थात यात जो गडबडला- नेभळट वा भित्रा ठरला तो नागवलाच म्हणून समजा आणि अशा रीतीने भक्ती केली की पतन पावण्यास काय उशीर? असे हे कठीण प्रसंग असतात.
rajesh772@gmail.com