राजेश बोबडे
देश स्वतंत्र झाल्यावर देशातील काही संस्थाने सरकारमध्ये विलीन होण्यास तयार नव्हती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या देशकार्यामुळे प्रभावित झाल्याने सरदार वल्लभभाई पटेल यांनी ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविली. कोल्हापूर संस्थान महाराजांच्या प्रयत्नांमुळे १ मार्च १९४९ रोजी लोकसत्ताक झाले. महाराज म्हणतात, ‘‘भारतीय हा भारत देशाचा असावा, त्याचा बाणा एकच असावा, त्याची राष्ट्रभाषा व त्याची प्रार्थनाही एकच असावी आणि त्याची सर्व संपत्तीही सर्वांची असावी. मानवधर्माचा प्रकाश जगावर पसरविणारा हा देश देवासारखा पूज्य मानला जावा व तो आतूनही तितकाच उज्ज्वल आणि बलवान असावा. हा प्रांत, तो प्रांत, हा भेद कार्य आणि व्यवस्थेसाठी असावा. हक्कांच्या झगडय़ासाठी व गटांच्या राजकारणासाठी नव्हे.’’
हेही वाचा >>> चिंतनधारा : देवभक्ती हा देशसेवेत अडथळा ठरू नये!
‘‘पिढय़ानपिढय़ांचे हक्क व भाषा आदीच्या नावावर कोंबडे लढवणे ही ब्रिटिशांची भेदनीती त्यांच्या स्वार्थासाठी होती. त्यापूर्वी लहान-लहान गट, जाती व संस्थाने करून बसले होते व आपसातच भांडत होते. स्वत:च्या स्वार्थासाठी देश खड्डय़ात गेला तरी पर्वा नाही अशी फुटीर व कुटिल वृत्ती होती. आजही आम्ही तीच पक्षांधता व स्वार्थाधता खेळवत बसलो आहोत. सत्तेसाठी आपसात ओढाताण करीत आहोत; तेव्हा तोच रोग पुन्हा नाही झाला तर दुसरा तरी होईल. संकट अन्य एखाद्या दिशेने झडप घालेल हे उघड आहे. अशा स्थितीत आपला विकास सुरक्षितपणे व्हावा, असे वाटत असेल, तर देशच आम्हा सर्वांची जात, प्रांत व पंथ बनला पाहिजे. किंबहुना त्याहीपुढे मजल गेली पाहिजे. एका जातीच्या साडेबारा जाती करण्याला मी पतन समजतो.’’
‘‘मतभेद असेल पण मतद्वेष का? आपल्या न्यायप्रेमी बुद्धीने राष्ट्राची बिघडलेली घडी बसविण्याचे प्रामाणिक प्रयत्न आपण केले पाहिजेत आणि अन्याय करणाऱ्यांना योग्य शिक्षा देऊन मार्गावर आणले पाहिजे. असे नव्हे की, देशात काहीही झाले तरी सर्व काही देव करेल म्हणून स्वस्थ बसावे व आळशी व्हावे. असा खुळा बोध मला मुळीच आवडत नाही. जागतिक जीवनसंघर्षांत विजयी होण्यास सर्वप्रथम देशातील व्यक्तींचे स्वभाव उत्तम असावे लागतात. त्यांच्या स्वभावातून द्वेषमत्सर, व्यक्तित्वाकरिता केलेली गटबाजी, चोरीलबाडी इत्यादी गोष्टींचे उच्चाटन झाले पाहिजे. कितीही द्रव्य असेल, साधने असतील, सत्ता असेल, तरीही कामे करणाऱ्या माणसांत एकदा का बेइमानी शिरली, की डोलारा केव्हा ढासळून पडेल याचा नेम नसतो. माणसांची मने स्वच्छ असावी लागतात. ती साफ ठेवण्यासाठी तितकेच निर्मळ वर्तनही आवश्यक असते.’’
rajesh772@gmail.com