‘भक्तिमार्ग सहज व सोपा वाटला का,’ असा प्रश्न करून भक्तिमार्गाविषयी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘कित्येक लोक म्हणतात, सर्वात सोपा मार्ग जर कोणता असेल तर संतांनी सांगितलेला भक्तिमार्गच होय. कसलेही कष्ट न पडता मनुष्याला आयते भोजन, जगात विशेष मान, सेवेला जनता आणि मृत्यूसमयी मोक्ष या सर्व गोष्टी सोप्या भक्तिमार्गात सहजच प्राप्त होतात. मी म्हणतो- हा खरा भक्तिमार्गच नव्हे. आणि खरा भक्तिमार्ग जर एवढा सोपा आहे, तर लोक ढोरासारखे कष्ट तरी का करतात आणि आयत्या धनाऐवजी पोट भरले तरी पुरे म्हणून आपला अनुभव का सांगतात? अहो, आयते सुख कोणाला नको आहे? कामे करून इतरांचे गुलाम होऊन राहण्यापेक्षा सहज योगक्षेम चालवणारी व पाया पडणाऱ्यांना आशीर्वाद देण्याचेच काम शिल्लक ठेवणारी ही भक्ती कोण नको म्हणेल? परंतु भक्ती जर खरोखरच अप्रयासाने सुख देणारी असेल तर किती लोक निश्चयाने या भक्तीच्या मागे लागले आहेत? आणि लागले ते सर्व भक्तीच्याच मागे लागले आहेत की, आपल्या आळसाने भक्तीचे नाव बदनाम करणारेच त्यात अधिक आहेत, हा खरा प्रश्न आहे.’
महाराज म्हणतात, ‘माझी अशी खास समजूत आहे की, जगात जे अनेक कठीण मार्ग आहेत त्या सर्वाहून कठीणपणा जर कोणत्या मार्गात असेल तर तो भक्तीच्या मार्गातच होय आणि जे सज्जन या भक्तिमार्गात आम्ही आहोत, असे म्हणणारे आहेत त्यातील एक लक्ष लोकांतून एखादा तरी भक्तीच्या खऱ्या भूमिकेवर चढला की नाही याची मला शंकाच आहे आणि ती काही भक्त म्हणविणाऱ्यांची चरित्रे पाहून तर अधिकच बळावली आहे. कारण भक्तिमान् म्हणजे चमत्कार करणारा असे समीकरण मला मुळीच मान्य नाही, तसेच भक्तीत समरस होणे म्हणजे सदैव देह विसरून आणि सदाचाराच्या उचित कल्पना विसरून, ज्यात मुळीच माणुसकी नाही असे शुद्ध वेडेपण मिरविणे हे तर मला विचित्र वाटते. याचा अर्थ असा नव्हे की, विदेही पुरुष नसतातच. परंतु त्यांची लक्षणे मात्र ही नव्हेतच!’
तुकडोजी महाराज म्हणतात, ‘एवढा हा कठीण मार्ग यथार्थपणे सोपा कोण मानतो तर ज्यांच्यात आवश्यक सहनशीलता असेल, जे नियमितपणाला आजन्म विसरले नसतील, ज्यांच्या इंद्रियांनी त्यांच्या आत्मविश्वासास मदत दिली असेल, ज्यांचा आत्मविश्वास ईश्वरावर अढळ राहू शकला असेल, ज्यांच्या आयुष्यात त्यांना सद्धर्मबोधक महात्मे भेटले असतील, तसेच ज्यांची बहुत दिवसांची अभ्यासवृत्ती फळाला आली असेल व ज्यांचे श्रीगुरू त्यांचेवर प्रसन्न असतील त्यांच्याकरिताच भक्तिमार्ग सोपा आहे, असे मी स्वानुभवानेही सांगू शकेन. पण सज्जनांनो! या सर्व वृत्ती त्यांच्यात निर्माण व सुदृढ होण्यास त्यांना कोणकोणत्या प्रसंगाशी झगडावे लागले असेल, याचा- भक्ती सोपी म्हणून ऐकणाऱ्याने कधी विचार केला आहे काय?’ असा प्रश्न महाराज करतात.- राजेश बोबडे