भारतीय संस्कृतीच्या उच्चाटनाचे काम वेगाने सुरू असल्याचे खेदाने स्पष्ट करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘आता एका पंथाने दुसऱ्या पंथाची निंदा करू नये. कोणत्याही पंथाची उपासना-आराधना असो, त्याद्वारे सद्गतीच प्राप्त होईल. फक्त माणसांची नीती चांगली पाहिजेत. जेवढे संप्रदाय जन्माला आले आहेत त्या सर्वानी सदाचरणालाच प्राधान्य दिले आहे. संत ज्ञानेश्वरांनी तर आव्हानच दिले आहे की ‘जे खळांची व्यंकटी सांडो-तया सत्कर्मी रति वाढो- भूतापरस्परे जडो- मैत्र जीवांचे।।’ मी माझ्या कल्पनेप्रमाणे माझी भावना तुम्हाला सांगितली. काही विद्वानांकडूनही संत ज्ञानेश्वरांच्या ओवीचा अर्थ जाणून घेतला. ‘खल’ म्हणजे दुर्जन नाहीसे होत नाहीत, त्यांची वृत्ती नाहीशी होते. देव साधुसंतांसाठी अवतार घेतात तर भक्तजन सदाचारासाठीच जन्म घेतात. राक्षसही जन्माला येतात. परंतु राक्षसांचे काम नायनाट करण्याचेच असते.’’
‘‘आज राक्षसी वृत्तीचाच पसारा जास्त दिसतो, परंतु खांदेपालटही लवकरच होईल, ही आशा आहे. असा खांदेपालट होण्याकरिता मानवतेचे साम्राज्य निर्माण झाले पाहिजे. संतांच्या चरित्रात मानवतेचे साम्राज्यच सांगितले आहे. त्याकरिता ‘जे खळांची व्यंकटी सांडो’ अशी प्रार्थना केली पाहिजे. आपली उपासना नेटाने पुढे चालविली पाहिजे. परंतु आजची परिस्थिती तर अगदी भिन्न आहे. लाखो रुपये खर्च करून विद्वत्ताप्रचुर पुष्कळ बोलणारेही असतात. नोटांच्या साहाय्याने नुसते एखादे शेत किंवा घरच घेता येते असे नाही तर ज्याला लोकशाही म्हणतात, त्या लोकशाहीत पैशाने मत दिले व घेतले जाते, हेही आपण पाहतोच आहोत. आता पैशाच्या भरवशावर ‘धर्म सोडा’ असे म्हणणारे जसे काही कारखानेच निघाले आहेत. विचारी माणसाला आज कापरे भरले आहे. पैशाच्या बळावर संप्रदायाचाही आता खांदेपालट होण्याची शक्यता बळावत चालली आहे. माझे तुम्हाला फक्त एकच सांगणे आहे, तुम्ही कोणत्याही बाबाचे चेले व्हा, कोणाचाही मंत्र घ्या, उभे गंध लावा किंवा आडवे लावा, परंतु माणुसकी सोडू नका. माणसे दुर्गुण सोडून सद्गुणी असाच आशावाद भाषणातून व्यक्त करा.
मानव सृष्टीहूनि थोर।
तो ईश्वराचा अंशावतार।
अचूक प्रयत्न दैवी हत्यार।
निर्मू शके प्रतिसृष्टि॥
राजेश बोबडे