राजेश बोबडे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्राचे शोषण थांबविण्यासाठी उपाय सुचिविताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘आम्ही सर्वच राष्ट्राचे मजूर व सर्वच हुजूर झालो पाहिजे. असे झाले म्हणजेच आजच्या विकृत भारतात खरे चैतन्य, खरे स्वातंत्र्यसुख नांदू लागेल. हे घडवून आणणे राष्ट्राच्या सत्ताधिकाऱ्यांच्या तसेच नेत्यांच्या हाती आहे, हे जरी खरे असले तरी, ते जागरूक नसल्यास त्यांना तशी आठवण करून देऊन व तशाच जागरूक लोकांना पुढे आणून काम करायला लावणे हा अधिकार जनतेचा आहे. लहानात लहान खेडय़ातील सामान्य मजुराच्या हातीदेखील राष्ट्राचे भवितव्य घडविण्याची शक्ती आहे. ही गोष्ट ध्यानात घेऊन आज प्रत्येकाने इमानेइतबारे आपले काम जीव लावून केले पाहिजे. असे होईल तेव्हाच स्वातंत्र्य घराघरात पोहोचून सर्व जगात आपला यशोध्वज फडकेल,’’ असे तुकडोजी महाराज सांगतात.

ते म्हणतात, ‘‘देशाला मिळालेले स्वातंत्र्य टिकवून सर्वाना त्याचा उपभोग घेता येईल, अशा प्रकारची पात्रता सर्वात आणणे हाच आज महचत्त्वाचा टप्पा आपल्याला गाठायचा आहे व तेव्हाच हे स्वातंत्र्य खरे स्वातंत्र्य ठरणार आहे. परंतु ही गोष्ट आज किती जाणते लोक, सामान्यांच्या निदर्शनास आणून देतात व स्वत: त्या दिशेने पावले टाकतात? आजचे भारताचे चित्र पाहता खेदाने असेच म्हणावे लागते की बहुधा प्रत्येकजण अज्ञानामुळे किंवा स्वार्थाधतेमुळे आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करू लागला आहे आणि त्याच्या सर्व लहान-मोठय़ा कृतीचा परिणाम साऱ्या राष्ट्राला म्हणजेच राष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला या ना त्या स्वरूपात भोगावा लागत आहे. थोरांच्या राष्ट्रघातकी वागणुकीचे व चुकारपणा आणि चैनीवृत्तीचेच लोण अगदी खालच्या कामकरी थरापर्यंत पोहोचून सारे राष्ट्र आज पोखरले गेले आहे. याचा परिणाम अखेर कोणत्या थरावर जाईल हे विचारी माणसांच्या मनात येताच त्यांच्या अंगावर काटे उभे राहात आहेत. हा सर्व प्रकार बंद होऊन पुढची सर्व अनर्थपरंपरा टळावी असे वाटत असेल तर, आज सर्वानी आपला व्यक्तिगत किंवा गटाचा स्वार्थ बाजूस सारून राष्ट्रहिताच्या दृष्टीने पाऊल टाकले पाहिजे. आपल्या हातातील सत्तेचा अधिकारांचा व कामांचा उपयोग राष्ट्रसेवेच्या दृष्टीने प्रामाणिकपणे केला पाहिजे.

महाराज म्हणतात, ‘‘प्रत्येकाला पटवून देता आले पाहिजे की ही सत्ता, हा पैसा, तुम्ही-आम्ही सर्व देशाचे आहोत. श्रीमंत ही राष्ट्राची बँक आहे आणि सत्ताधीश हे व्यवस्थापक-सेवक. राष्ट्राचे काम करून जीवनाच्या आवश्यकतेप्रमाणे उपजीविकेसाठी वेतन घेणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. राष्ट्राच्या रक्षकांनासुद्धा परिश्रमाशिवाय पैसा मिळता कामा नये. श्रीमंतांनासुद्धा काम करूनच पोट भरता आले पाहिजे. मजूर, मुनीम, मुखत्यार व मालक या सर्वाना इमानेइतबारे काम करूनच योग्य वेतन मिळाले पाहिजे. अधिकार पैशासाठी, चैनीसाठी, गटबाजी, वशिलेबाजीसाठी अथवा गरिबांची पिळवणूक करण्यासाठी नसून, तो सेवाकार्यासाठी आहे. थोरांनी मजुरांची पत सांभाळली पाहिजे व मजुरांनी राष्ट्राची इभ्रत सांभाळली पाहिजे.’’ rajesh772@gmail.com

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rashtrasant tukdoji maharaj suggesting measures to stop the exploitation of nation zws