राजेश बोबडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या निर्मितीमागची पार्श्वभूमी सागताना, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘जनतेस असे भय वाटले की राष्ट्रीय वृत्तीत तत्त्वपूजा आणण्याचा श्रीगुरुदेव सेवा मंडळ हा नवीनच पंथ निर्माण होणार का? असे भय वाटण्याचे वस्तुत: कारण नाही. कारण ही गोष्ट आम्ही नवीन सांगत नसून भगवान श्रीकृष्णांनी पूर्वीच सांगितलेली आहे. महंमद पैगंबरानेदेखील खुदाच्या जागेवर कोणीही बसू शकणार नाही असेच सांगितले आहे. इस्लाम धर्मात पैगंबरास खुदाचा दूत म्हणतात. ख्रिश्चन धर्मातही येशूस परमेश्वराचा लाडका मुलगा मानतात. जसे इस्लाम धर्मात सर्व अधिकारी लोकांना मान देतील पण खुदा कोणीच नाही वा ख्रिश्चन धर्मात सर्व संतांना आदरणीय समजले तरी कोणालाही ईश्वर मानणार नाहीत. आपल्या संस्कृतीतही पुरातन तत्त्व हेच आहे, की परमेश्वर एकच आहे व हे ओळखूनच आम्ही असे ठरविले आहे की आमचे अधिष्ठानावर व्यक्ती न राहता ‘गुरुदेव’ शक्ती राहील.’’

हेही वाचा >>> चिंतनधारा : व्यक्तिपूजेचे बंड दूर करायचे आहे

‘‘आमचा देव एकच राहील. त्यात आम्हाला फरक करायचा नाही. एकाच सर्वव्यापी शक्तीला आम्ही गुरुदेव म्हणतो. सर्व साधु-संतांना आम्ही मान दिला तरी गुरुशक्तीचे स्थान निराळे व तेच आमचे अधिष्ठान होय. ते कोणत्याही व्यक्तीचे नाही. सर्व धर्माच्या व पंथांच्या बुवांना आम्ही आदर देऊ. पण बुवा म्हणूनच. देव म्हणून नव्हे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात- मी सर्व ठिकाणी आहे. याचा अर्थ श्रीकृष्णाचे शरीर सर्व ठिकाणी आहे, असा नसून त्यांची आत्मशक्ती सर्व ठिकाणी आहे असा आहे. ज्या वस्तूने श्रीकृष्णाला श्रीकृष्ण ठरविले ती वस्तू श्रीकृष्ण नसून त्याच्या आतील चेतनाशक्ती होय. असे नसते तर ‘मी हे परंपरागत ज्ञान देतो’ असे म्हणण्याचे कारणच नव्हते. संत व अवतार हे शब्द देहाची अवस्था दर्शविण्यासाठी नसून शक्तीची अवस्था दाखविण्यासाठी आहेत. ही भावना मला समाजात रूढ करायची आहे. देव कसे तयार होतात, याबाबत महाराज म्हणतात, समाजात आज देव परंपरेने बनतात. मग काय सर्व परंपरांतील बुवांना देवच म्हणायचे? ही भावनाच मुळात बरोबर नाही. देव एकच असतो. संप्रदायाचे लोक म्हणतात की आमचा संप्रदाय श्रेष्ठ व आमचा बुवाच देव. असे जर असते तर तुकारामास विठ्ठलाचे नाव घेऊन वारकरी संप्रदाय काढण्याची गरजच काय होती? श्रीकृष्ण तर पूर्वीच होऊन गेले होते. मग याची भिन्नत्वाने काय गरज होती? यामुळेच जातीयतेसारखा याही भेदांनी विश्वबंधुत्वास धक्का दिलेला आहे.’’

हेही वाचा >>> चिंतनधारा : व्यक्तिपूजक नव्हे तत्त्वपूजक व्हा!

‘‘यासाठी आम्ही म्हणतो, की देवशक्ती एकच आहे, मग अनेक देव कसे झाले? प्रत्येक अवतार निरनिराळय़ा दृष्टिकोनातून देवाचे चरित्र गातात म्हणून. देवाचा (विठोबाचा) ही देव हा गुरुदेव आहे. तो वस्तुरूपाने नसून शक्तिरूपाने असलेला देवांचाही देव आहे. कोणतीही विशिष्ट मूर्ती मांडून एका मर्यादित कक्षेत आम्हाला यावयाचे नाही, तर आकाशात जसा पक्षी गंभीरतेने उडतो तसेच शक्तीच्या अवकाशात भरारी घेण्यासाठी आम्हास आत्मचिंतन करायचे आहे. दुसऱ्या दृष्टीने पाहता सर्वागसंपूर्ण असा आदर्श पुरुष मिळणे दुर्लभ आहे.’’

rajesh772@gmail.com

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rashtrasant tukdoji maharaj talk about background of making gurudev seva mandal zws
Show comments