राजेश बोबडे
‘‘जगाला घडविण्याची व बिघडविण्याची ताकद प्रचारकात असते,’’ असे सांगून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘जो कार्यकर्ता प्रचारकांचे मन ताब्यात घेईल, तोच आपल्या इच्छेनुसार जग घडवू शकतो. प्रचारकांचे मन केवळ बुद्धिवादाने किंवा बहिरंग साधनांनीच वश करता येणे केव्हाही शक्य नाही; त्याला आत्मशक्ती व उज्ज्वल चारित्र्य आवश्यक असते. ज्याची दिनचर्या आदर्श व प्रसंगानुरूप वळणारी अशी आहे; लोकसंग्रही वृत्ती व सतर्क बुद्धी यांचा मिलाप जेथे झालेला आहे आणि ज्याला पुरेपूर राष्ट्रदृष्टी आहे तोच प्रचारकांचे मन आपल्या ताब्यात घेऊ शकतो व राष्ट्राला मार्ग दाखवू शकतो. हे कार्य एकटय़ाने होणारे वा एकटय़ाकरिताच करावयाचे नसल्यामुळे त्याला शाळा, महाविद्यालये, कीर्तने, आश्रम, व्याख्याने इत्यादी साधनांद्वारे ‘सर्वामुखी मंगल’ करावे लागते. नव्या पिढीला शाळांतून किंवा आश्रमांतून सवय लावावी लागते. कीर्तने किंवा व्याख्याने यातून स्फूर्ती व जागृती देण्याची सवय ठेवावी लागते. त्यातल्या त्यात जर महत्त्वाची जबाबदारी कोणावर असेल तर ती आश्रम किंवा शाळा-महाविद्यालयांवरच असते कारण तीच नव्या समाजाची गंगोत्री म्हणावी लागते. कार्यकर्ते तेथूनच प्रत्येक विषयाची योग्य माहिती घेऊन आलेले असतात व यावयास पाहिजेत.’’
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘पूर्वीच्या ऋषींनी मुलांना वयाच्या आठव्या वर्षांपासून २० किंवा अधिक वर्षांपर्यंत आपल्या ताब्यात घेण्याचे ठरविले होते व त्याला राजाचा पूर्ण पािठबा असल्यामुळे आई-वडिलांना तसे करणे भाग पडत होते. हा आधारिबदू जोपर्यंत ऋषींनी आपल्या ताब्यात ठेवला तोपर्यंत राष्ट्राच्या मन:स्थितीत न्यायाने कधी चुकारपणा केला नाही. भोग-प्रवृत्ती व राज्य-लालसा जेव्हापासून हृदयात शिरली तेव्हापासून त्या मार्गाला कीड लागली आणि त्याचा परिणाम आज हा असा भोगावा लागत आहे.’’
‘‘या मार्गातून ज्या लोकांनी आपल्या टोळय़ा अलग काढून काही तत्त्वे त्या टोळय़ांवर बिंबविली ते लोक अनेक दृष्टींनी अपुरे असूनही आज आपल्यावर कुरघोडी करताना दिसतात. सर्वच गोष्टींचा विकास करणारे ऋषी आपल्या सर्व आवश्यक कार्याना मात्र विसरत आल्यामुळे त्यांना आपल्या राष्ट्राला धड सांभाळून ठेवता आले नाही. तसेच वेळोवेळी ज्यांनी समाजाची धारणा टिकविली त्यांनीही तात्पुरती मलमपट्टीच त्या त्या वेळी लावली परंतु समाजाला राष्ट्रीय दृष्टी दिली नाही.’’
rajesh772@gmail.com