राजेश बोबडे
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘भारताच्या देशभक्तांनी, परिश्रमाने व तपश्चर्येने या देशाला स्वराज्य दिले. विदेशी राजवटीचा वृक्ष गळून पडला आहे, पण त्याचे जीवन नष्ट न झाल्यामुळे त्याला पुन्हा पुन्हा अंकुर फुटत आहेत. आजची जातीयता, पंथीयता, धर्मीयता व व्यक्तीयताही नष्ट न होता पुन्हा जोराने अंकुरित होऊ लागली आहे. ती भारताच्या अवनतीला कारण होत आहे. ती समूळ नष्ट करण्याचे सामर्थ्य आजच्या सत्तारूढ व्यक्तींत असेल, असे मला वाटत नाही. कारण त्यांनी अस्पृश्यता निवारणाची जाहिरात केली असली, तरी जातीयता नष्ट झालेली आढळत नाही. उलट प्रत्येक जातीत निवडणुकीचे वारे शिरून तिला पोषण दिले जात आहे, हे देशाला मोठे भय आहे. तसाच याचा शोषणवाद एवढा बळावला आहे की समाजवाद ही जवळजवळ थट्टाच झाली आहे. एका बाजूने सामान्य माणूस गरिबीने त्रस्त आहे तर दुसरा धनिक अधिक धनवान होऊन घुसखोरी, काळाबाजाराला प्रवृत्त होत आहे व हा माणूस आपले घर, आपली मुलेबाळे यांच्यात सुधारणा घडवून आणण्याच्या मार्गाला अद्याप लागलेला नाही. या आळसाचा लाभ विधर्मी, विदेशी भरमसाट घेऊ लागले आहेत, याची चर्चा मात्र आता लोक घराघरांतून करू लागलेले दिसतात.’’
‘‘लोक मला म्हणतात, महाराज कसे होईल आपल्या हिंदू धर्माचे? हळूहळू हा धर्म नष्टप्राय होऊ लागलेला दिसत आहे. कुटुंबनियोजन या धर्माकरिता, विधर्मात जाण्याची योजना या धर्माकरिता व नास्तिकवादही याच धर्माकरिता वाढू लागला आहे. मी त्यांना म्हणत असतो, बाबांनो, तुमच्या मनातील ही तळमळ जेव्हा क्रांतीचे रूप धारण करेल तेव्हाच काही सुधारणेची आशा आहे. तुम्ही जोवर निर्भय नाही, तुम्हाला तुमचा देश, तुमचा धर्म, तुमच्या पूर्वजांची परंपरा- या गोष्टी राखण्याची भावना उन्नत होणार नाही तोवर कोणतेही सरकार, कोणताही साधुसंत आजची ही तुमच्या अवनतीची कोंडी फोडू शकणार नाही आणि म्हणून मित्रहो, तुमची धन-दौलत, तुमची संतान आहे त्यांना सद्गुणी करा, निव्र्यसनी करा. त्यांच्यावर धर्माचे, इमानदारीचे, प्रामाणिकपणाचे संस्कार करा. सत्कार्यावर त्यांची श्रद्धा वाढवा व त्यांना भारतीयांबद्दल अत्यंत अभिमान वाटू द्या. त्यांचे आप्त- गणगोत भारतीय आहेत असे त्यांच्या गळी उतरवा. उद्योगी, श्रमजीवी, बुद्धिमान, विनयशीलतेची शिकवण द्या. त्याकरिता तन- मन- धन कामी लावा. हीच खरी संपत्ती आहे. तुमची कीर्ती आहे व यानेच तुमचे घराणे लोकप्रिय राहील. वाईट मार्गाने पैसा कमवून, जनमत बिघडवून आजच्या काळात काहीही साधणार नाही. तुमचे मोठेपण लोक धूळ -मातीप्रमाणे उधळून लावतील, हे विसरू नका. आता मागासलेल्या दलित समाजाच्या मनात हे येऊ लागले आहे व हे देशाचे भाग्य आहे. आपण सर्व समाजांनी हीच प्रथा कायम ठेवून आपले वैभव भारतीयत्वाच्या भावनेने वाढविले पाहिजे.
rajesh772@gmail.com