राजेश बोबडे

‘‘विजयादशमी या दिवसाला इतिहासाची जोड व साक्ष आहे. म्हणूनच श्रीगुरुदेव सेवा मंडळाने स्नेहसंमेलन दिवस म्हणून आपल्या पंचमहोत्सवात विजयादशमीला स्थान दिले आहे,’’ असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात. ते म्हणतात, ‘‘विजयाचा पाया आहे स्नेह! कधी हे स्नेहसंमेलन देशाच्या अत्यंत मोठय़ा व उज्ज्वल अशा कामासाठी सेनेच्या स्वरूपात तयार होऊ शकेल, कधी प्रचारकांच्या प्रचारकार्यासाठी उभे राहू शकेल आणि कधी देशात ज्या कार्याची गरज दिसून येईल त्याला प्रोत्साहन व सहकार्य देण्यासाठीही याचा उपयोग होऊ शकेल! स्नेह कशासाठी? कोणत्या कार्यासाठी? ‘एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ’ हीच त्या स्नेहाची विजयपताका आहे.’’

हेही वाचा >>> चिंतनधारा: भारताच्या नवनिर्माणासाठी ‘समयदानयज्ञ’

‘‘गुरा-ढोरांचा स्नेह विषयासाठी असेल, मूर्ख व ढोंगी लोकांचा स्नेह स्वार्थासाठी असेल, तर एखाद्या वीरपुरुषाचा स्नेह त्यागासाठी, अन्यायाशी झुंजण्यासाठी असू शकतो. देवभक्ताचा स्नेह भगवंताच्या तादात्म्यतेसाठी तर देशभक्ताचा स्नेह देशातील उणिवा भरून काढण्यासाठी असू शकतो. यासाठीच ते मित्रांना एकत्र करतात. या देशामध्ये विजयादशमीच्या दिवशी जो जो संकल्प महापुरुषांनी केला तो व्यक्तिगत नव्हता. त्याचा संबंध संपूर्ण भारतवर्षांशी व त्याच्या संस्कृतीशी आहे. कोणी आपल्या देशाला अन्याय्य राजवटीतून सोडविण्यासाठी आजच्या दिवशी संकल्प करून दुष्टांवर विजय मिळविला, तर कोणी आपल्या विकारांवर विजय मिळवून साऱ्या देशाला ज्ञानाचा मार्ग दाखविला. इतिहास केवळ वाचून आपण काय करणार? त्या इतिहासाचा संबंध लोकांच्या जीवनाशी, हृदयाशी, कर्तव्याशी जुळला पाहिजे. आपले कर्तव्य खालच्या थराला जात आहे, पूर्वजांचे कर्तव्य स्वर्गाला टेकले आहे, तर मेळ कसा बसणार? आम्हाला त्यांच्यासारखाच थोर संकल्प केला पाहिजे.’’

हेही वाचा >>> अन्यथा : ढेकूण फार झालेत..

‘‘विजयादशमीच्या मुहूर्तावर अंत:करणापासून असा दृढनिश्चय केला पाहिजे की, आम्ही आजपासून आमच्या जीवनाला नवीन उजाळा देऊ; शत्रुत्वाचे विचार नष्ट करू; देशातील प्रत्येक बांधव माझा व मी त्याचा अशी निष्ठा ठेवू आणि लोकांच्या अंत:करणातून लय पावू लागलेली देश-धर्म संस्कृतीची धारणा पुन्हा जागृत करण्याचा प्रयत्न करू! अर्थात या संकल्पाच्या पूर्ततेसाठी आम्हाला साधनयुक्त व्हावे लागेल; आपली दिनचर्या सुधारावी लागेल आणि आपल्या मनापासून, घरापासून, मित्रांपासून व गावापासून तयारी सुरू करावी लागेल. इतके झाल्यावरच आपण लोकांना सांगू शकू की, या विजयादशमीपासून आम्ही आमच्या घरात असा नियम सुरू केला आहे; आम्ही आमच्या गावात असा उपक्रम आरंभिला आहे आणि आम्ही भोवतालच्या परिसरात अशी सुंदर योजना उभी केली आहे, की ज्यायोगे आम्ही हेवेदावे विसरून कर्तव्यशीलतेची भावना जागृत करू शकलो; नवा इतिहास घडवू शकलो! अशी काही कर्तव्यनिष्ठा जर आजच्या दिवशी आपण दाखवू शकलो तर पूर्वजांनी केलेल्या महान संकल्पाची आठवण जोपासली, असे म्हणता येईल.

rajesh772@gmail.com

Story img Loader