राजेश बोबडे
‘साधुसंत आपल्या जातीत किंवा कुळात होऊन गेले म्हणून आम्ही कृतकृत्य झालो, असे चुकूनही समजू नका,’ असे खडे बोल समाजाला सुनावतानाच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कारणही देतात : साधुसंतांची किंवा थोर पुरुषांची खरी जात ओळखण्याची बुद्धी जर तुमच्यात निर्माण झाली असेल तर मात्र – ते जात्याभिमानी नसून शीलाभिमानी होते, ग्रंथाभिमानी नसून तत्त्वाभिमानी होते, कुलाभिमानी नसून अधिकाराभिमानी होते, हे मी न सांगताही आपणास सहज कळून येईल. ही गोष्ट दुबळय़ा मनाच्या माणसांची असते की, आपले वैगुण्य ते आपल्या जातीतील थोर माणसाच्या नावानेच लपवितात व आपले वैभव (?) त्यांच्या कीर्तीवरच खपवितात; परंतु अंगांत तर त्यांचे एक वचन पाळण्याचीही शक्ती नसते.
साधुसंतांच्या जातीयतेचा आपल्यांत अभिमानच नसावा असे मला सांगावयाचे नाही, परंतु असलाच तर ‘त्यांचे सद्गुण आपल्यात का असू नयेत?’ या गोष्टीचाही विचार अवश्य असावयास पाहिजे. लोक म्हणतात- ‘‘आम्ही आता काय करू शकतो? काय केलं ते आमच्या पूर्वजांनीच करून ठेवलं आहे. जुनं सोडू नये, नवं जोडू नये. आमचा उद्धार केव्हाच झाला आहे संतांच्या कृपेने!’’ परंतु असे क्रियेविण समजणे हे केवळ दुबळेपणाने जन्म फुकट घालवण्याप्रमाणेच असते. ही वाटच मुळी चुकीची आहे. मी असें म्हणेन की- साधुसंताचे वर्णन करणारेच काय पण ‘आमच्या रामाने असे केले, कृष्णाने तसे केले, असे फक्त श्रवणकथन केल्यानेच आमचे बरे होईल’ असे म्हणणारे लोकही आपली उन्नती पूर्णत्वाला पोहोचवू शकत नाहीत. गेले ते तर सोडाच, पण आज जे हयातीत असतील अशा सत्पुरुषांची केवळ संगतीच केली, आणि ‘त्यांचे गुण आपल्यात येवोत की न येवोत परंतु आपणास मुक्ती मिळेलच!’ असे समजून आंधळेपणाने वागले, तर उगाच अभिमान हृदयांत वाढत जाईल परंतु अधिकाराचा पत्ताच नसणार! मला ही गोष्ट सांगत असताना काही मठांतील विचित्र पद्धतींची आठवण करून द्यावीशी वाटते. बऱ्याच ठिकाणी मी पाहिले आहे की, बाप संत होते म्हणून मुलालाही गुरू समजलेच पाहिजे किंवा नातवाला परंपरेने त्यांची गादी मिळालीच पाहिजे. मग तो व्यसनाधीन का असेना – तरी चालेल, परंतु त्यांच्या अधिकारी शिष्याला मात्र ती जागा दिली जाणार नाही. ही आंधळी तत्त्वशून्य परंपरा लोकांचे इतके पतन करीत आहे की त्याला सुमारच नाही. मठातील धनाच्या मालकीकरिता साधूंच्या परंपरेस हवी ती काळिमा लावावयास, कोर्टकचेऱ्या करावयास लोक मागेपुढे पाहात नाहीत. मला उगीच त्यांची हेटाळणी करावयाची नाही, पण ज्यांना ‘आपणास तो अधिकार मिळावा’ असे वाटत असेल त्यांनी आपल्यात त्या स्थानाचे महत्त्व समजण्याएवढा व राखण्याएवढा अधिकार मिळविण्याची तरी काही उपासना ठेवावयास पाहिजे की नको?
महाराज ग्रामगीतेमध्ये लिहितात :
व्यक्तिस्वार्थ बोकाळला।
जो तो मनाचा राजा झाला।
वेगवेगळय़ा प्रलोभनी गुंतला। समाज सारा।।
rajesh772@gmail.com