राजेश बोबडे
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘सध्या आमच्या देशात वाटेल तसा, कोणत्याही मार्गाने का होईना पैसा जमा करण्याचा छंद जडला आहे. काहींना त्याकरिता दया-माया, शील, इमानदारी काहीही पाहायचे नाही. ते त्यासाठी धर्मकर्म, देवदेवळे, धर्मशाळा, आपली प्रतिष्ठा, माणुसकी सारी विकण्यास तयार आहेत, पण पैसा मिळाला पाहिजे, त्याचा वापर भोगपूर्तीकरिता झाला पाहिजे; पुढच्या मुला- बाळांना ऐशआरामात जगता आले पाहिजे. हा पैसा आपोआप कसा वाढेल याचा मार्ग गवसला पाहिजे, म्हणजे सत्ता मिळण्याकरिता, प्रतिष्ठा राहण्याकरिता आपले वजन गावात, शहरात, साधुसंतांवर, सरकारी लोकांवर ठेवणे शक्य होईल, असा त्यांच्या ध्येयाचा तारा नेहमीच चमकत राहतो. हे मी लाखो धनिकांच्या सहवासात अनुभवले आहे. त्यांचा धर्मजागृती, गुणांचा विकास, जनउन्नती, मागासलेल्या समाजाला आधार, सदाचार, सद्विचार, मानवप्रेम इत्यादींशी काडीमात्र संबंध नसतो.’’
‘‘मला असे म्हणायचे आहे की, त्यांनी आपले खरे वैभव, कीर्ती, मोठेपणा अव्याहत टिकून राहावे, यासाठी प्रयत्न केले, त्या दृष्टिकोनातून व्यवहार केले, तर हे योगभ्रष्ट जरी असले तरी आपले कार्य महान आदर्श म्हणून पुढे जगू शकतील. दैवी संपदेचे धनी होतील, पण तिकडे दृष्टी वळणेच सध्या दुरापास्त झाले आहे. कुसंस्कारी प्रजा आपल्याला मुलगा नसेल तर घरादारासहित नवस करीत साधू, संत, देव, स्मशान, देवता, भुतेखेते सारी पुजून वाटेल ते करून मुलगा व्हावा ही इच्छा करेल, पण मुलगा व्यसनी, दारुडा, आळशी, रोगी, धर्महीन, चारित्र्यहीन होऊ नये, यासाठी मुळीच काळजी करणार नाही. उलट जशी संगती लागेल तशी लागू दे, पण माझ्या कुळातील हा दिवा विझू नये म्हणून त्या मुलाला लहानपणापासून लाडावून ठोंब्या तयार करून ठेवतील. या वृत्तीमुळे धनाचा नाश झाला, कीर्ती गेली, घराणीही नेस्तनाबूत झाली आहेत. पण याची खंत कुणालाही नाही.’’
‘‘काहींची मुले व्यसनांनी गेली. चालरीत बिघडली व जेथे सदावर्त, उत्सव, कीर्तन, भजन चालत होते तिथे तमाशा, नाटके दिसू लागली. ज्या श्रीमंतांच्या घरचे नोकरचाकर संतुष्टपणाने इमानदारीने काम करीत होते त्यांच्या वागणुकीने व विचित्र स्वभावाने नोकरी सोडून परघर धरू लागले आहेत. एकंदरीत अशी ही परंपरा भारतातील सुखी, श्रीमंतांच्या घरी पोहोचली आहे.
याचे कारण विचाराल तर एकच की पुढील पिढीवर माता, पिता, गुरू, पुरोहितांचे लक्ष राहिले नाही. मुले ख्रिश्चन शाळेत घातल्याने त्यांना हिंदूू धर्माचेही नाही आणि ख्रिश्चन धर्माचेही शुद्ध तत्त्वज्ञान लाभले नाही, अशी ही मिश्रित संस्कृती आज आपल्यासमोर दिसू लागली आहे. ज्यांना इंद्रियभोगाशिवाय, आत्मस्तुतीशिवाय व सत्तेच्या मानाशिवाय जगात काहीही नाही असे वाटू लागले आहे. ते मिळविण्यासाठी धन, पैसा हा जेवढा संघटित करता येईल तेवढे बरे असे वाटू लागले आहे. आता त्यांच्या गळी चारित्र्य, सदाचार, मानवता, भक्तिभाव या गोष्टी कशा उतरणार हा मोठा प्रश्न आहे.
rajesh772@gmail.com