डॉ. आंबेडकरांनी आपल्या कर्तृत्वाने दलितांच्या मनातील अस्पृश्यतेची व न्यूनगंडाची भावना दूर केली, तर डॉ. हेडगेवारांनी सामाजिक समरसतेचे पालन करणारे लक्षावधी स्वयंसेवक निर्माण केले..

रवींद्र माधव साठे

मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Nagpur people excited about New Year house party
नववर्षाच्या ‘हाऊस पार्टी’ची नागपूरकरांना हौस…
Yatra of Yallama Devi begins in Jat
यल्लमा देवीच्या यात्रेस जतमध्ये प्रारंभ
Special local trains on New Year Local trains will run at night on Central and Western Railways
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विशेष लोकल; मध्य, पश्चिम रेल्वेवरून रात्री धावणार लोकल
Manisha Khatri as Commissioner of Nashik Municipal Corporation
नाशिक महानगरपालिका आयुक्तांचे बदलीनाट्य, आता मनिषा खत्री यांची नियुक्ती
yogita chavan troll for celebrating christmas
ख्रिसमस सेलिब्रेशनमुळे योगिता चव्हाण ट्रोल; पती सौरभ सडेतोड उत्तर देत म्हणाला, “मराठी भाषेचा, संस्कृतीचा प्रचार…”
Shegaon Gajanan Maharaj temple , Shegaon,
अवघी दुमदुमली संतनगरी! विदर्भ पंढरीत पाऊण लाख भाविकांची मंदियाळी…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार ही भारतीय इतिहासातील दोन थोर व्यक्तिमत्त्वे होती. भारताचे ऐतिहासिक उत्थान करणे हे त्यांचे समान उद्दिष्ट होते. दोघांनी सामाजिक समस्यांचे केवळ अचूक निदान केले नाही तर त्यांच्या निराकरणाचे समुचित उपायसुद्धा शोधून काढले. फरक इतकाच की त्यांचे मार्ग वेगवेगळे होते.

डॉ. आंबेडकरांनी जी चळवळ सुरू केली तिचे लक्ष्य समाजातील अस्पृश्यतेचे निर्मूलन करून त्यास एकात्म करणे हे होते. डॉ. हेडगेवार यांनीही ‘हिंदू सारा एक’ या भावनेतून जातीविरहित हिंदू समाज संघटनेचे कार्य उभे केले. डॉ. आंबेडकरांनी हिंदू समाज व हिंदू धर्म यांच्यावर टीकेचे अत्यंत कठोर प्रहार केले, परंतु त्यांच्या कठोर उद्गारांचे चिंतन केले, तर आढळते- त्यांचा हेतू हिंदू समाजात सुधारणा घडून यावी, हा होता. हिंदू समाजाचा विनाश त्यांना अभिप्रेत नव्हता. आपण हिंदू संस्कृतीच्या परिघाबाहेर पडावे, असेही त्यांना कधी वाटले नाही.

हिंदू समाजात विषमता होती आणि त्याचे चटके दलित समाजास बसत होते. ज्या जलाशयाचे पाणी जनावरेही पिऊ शकत होती, हिंदू नसलेले लोकही पिऊ शकत होते, त्या जलाशयाचे पाणी पिण्यास विशिष्ट जातीच्या व्यक्तींना मनाई होती. ज्या देवाची आपण पूजा करतो त्याच्या मंदिरात जायला जर धर्मच आडकाठी करीत असेल, तर त्या धर्माविषयी कुणाला प्रेम वाटेल? त्यामुळे, ‘दुर्भाग्याने, मी हिंदू म्हणून जन्मलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही,’ असे जे बाबासाहेबांनी म्हटले, त्यात अनैसर्गिक असे काहीही नव्हते.

धर्मपरिवर्तनाचा निश्चय झाल्यावर, बाबासाहेब प्रथम शीख धर्माकडे का वळले याचे स्पष्टीकरण त्यांनी २४ जुलै १९३६ रोजी एका वर्तमानपत्रात दिले. ते लिहितात, ‘‘हिंदूंच्या दृष्टिकोनातून या विभिन्न धर्ममतांकडे बघता प्रश्न असा उत्पन्न होतो की कोणते धर्ममत स्वीकारणे योग्य राहील? इस्लाम, ख्रिस्ती की शीख? उघडच आहे की शीख धर्मच योग्य आहे. दलित समाजाने इस्लामचा किंवा ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला, तर ते केवळ हिंदू धर्माच्याच बाहेर जात नाहीत, तर हिंदू संस्कृतीच्याही बाहेर जातात. उलट त्यांनी शीख धर्म स्वीकारला तर ते हिंदू संस्कृतीत राहतात. हिंदूंच्या दृष्टीने हा लहानसहान लाभ नव्हे.’’ ते पुढे म्हणाले, ‘‘धर्मातराचे परिणाम काय होतील. याचा अवश्य विचार केला पाहिजे. इस्लाम किंवा ख्रिस्ती धर्माच्या स्वीकाराने दलित समाज अ-राष्ट्रीय होईल. त्यांनी इस्लामचा स्वीकार केला तर मुसलमानांची संख्या दुप्पट होईल आणि मुसलमानांच्या वर्चस्वाचा धोका प्रत्यक्षात अवतरेल. जर त्यांनी ख्रिस्ती धर्मात प्रवेश केला, तर ख्रिस्तींची लोकसंख्या पाच ते सहा कोटींच्या घरात जाईल. त्यामुळे ब्रिटनच्या हिंदूस्थानावरील सत्तेला अधिक बळकटी मिळेल. परंतु त्यांनी शीख धर्म स्वीकारला तर ते या देशाच्या भवितव्याचे नुकसान तर करणार नाहीत, ते मदतही करतील आणि अराष्ट्रीय होणार नाहीत. देशाच्या राजकीय प्रगतीला ते साहाय्यभूत ठरतील. दलितांना धर्मातर करायचेच असेल तर, त्यांनी शीख धर्माचा स्वीकार करणे हेच देशहिताचे आहे.’’

पुढे ते शीख धर्माऐवजी बौद्ध धर्माकडे वळले. या धर्माची नाळही याच देशाशी जोडली आहे व व्यापक हिंदूत्वाचा तो एक भाग आहे. अमानुष अन्यायाचे शिकार झाल्यानंतरही त्यांनी राष्ट्राचे हित कायम जपले. हिंदू तत्त्वज्ञानाची उदात्त तत्त्वे आणि व्यवहार यांमधील विसंगतीवर डॉ. हेडगेवार आणि डॉ. आंबेडकर यांनी सारखेच आघात केले. तत्त्वज्ञान आणि व्यवहार यांत तफावत असेल तर व्यवहार तत्त्वज्ञानाशी अनुकूल केला पाहिजे अशी लोकमान्यांची भूमिका होती तिचाच बाबासाहेबांनी पुरस्कार केला. बाबासाहेबांनी द्वेषाचे राजकारण केले नाही. ते म्हणाले, ‘‘माझे मन द्वेषाने आणि सूडाने ग्रस्त झाले असते तर केवळ पाच वर्षांच्या आत मी या देशाला आपत्तीच्या खड्डयात लोटून दिले असते.’’  (डॉ. आंबेडकर – एक प्रेरक व्यक्तिमत्त्व: द. बा. ठेंगडी)

त्यांचा ब्राह्मणांना विरोध नव्हता तर ढोंगी ब्राह्मण्याला व धर्ममरतडांना होता. संगमनेरचे आलीम वकील यांनी ‘महात्मा आणि बोधिसत्त्व’ हे पुस्तक लिहिले आहे. १९२४-३५ या काळात बाबासाहेबांनी हिंदू समाज संघटनेचे काम केले, असे आलीम म्हणतात. या काळात बाबासाहेबांनी जे लढे दिले आणि त्यासाठी ज्या संस्था स्थापन केल्या त्यांतही सर्व समाजांचे प्रतिनिधित्व होते.

बाबासाहेब म्हणायचे की, ‘‘आपल्याला असा प्रयत्न करायचा आहे की ज्यामुळे देशात वर्ग संघर्ष आणि वर्गयुद्धासारखी स्थिती निर्माण होणार नाही. संपूर्ण समाजात एकात्मता निर्माण झाल्यावरच सर्व समस्यांचे निराकरण होऊ शकेल.’’ मात्र सवर्णाकडून अपेक्षित असे समर्थन न मिळाल्यामुळे बाबासाहेबांना सरकार व उच्चवर्णीयांविरुद्ध दलित समाजास सांविधानिक संघर्षांसाठी सिद्ध करावे लागले. परंतु त्यांनी राष्ट्रीय एकात्मतेशी तडजोड होऊ दिली नाही. 

डॉ. हेडगेवारांना हिंदूंचे धार्मिक संघटन नव्हे, तर हिंदू समाजाचे राष्ट्रीय संघटन हवे होते. म्हणून त्यांनी संघाचे नाव राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असे ठेवले. भेदांना गाडून हिंदूंना एकाच पातळीवर आणणे हे त्यांचे जीवनकार्य होते. आपले कार्य साऱ्या हिंदू समाजासाठी असल्याने त्याच्या कोणत्याच अंगाची उपेक्षा करून चालणार नाही, असे ते नेहमी स्वयंसेवकांना सांगत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. हेडगेवार यांची ‘धर्म’ या संकल्पनेसंबंधीही समान धारणा होती. अनेकांना हिंदू धर्म म्हणजे जुनाट रूढी, विषमतेने भरलेल्या समाजरचनेचा पुरस्कार, निरर्थक कर्मकांड वाटतो. रूढीवाद व दैववादाने ग्रासलेल्या धर्मास हेडगेवारांना मुक्त करायचे होते आणि खऱ्या धर्माचे आचरण करणाऱ्या व्यक्ती उभ्या करायच्या होत्या. बाबासाहेबांनाही कृतीप्रवण व विषमतेस थारा न देणारा धर्म अपेक्षित होता. बाबासाहेबांचा प्रेरणास्रोत विशुद्ध भारतीय होता. त्यांचे अधिष्ठान ‘धर्म’ होते.

सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी समाजाचे मानस बदलणे अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय कोणतीही सामाजिक सुधारणा स्थायी ठरू शकत नाही. बाबासाहेबांनी त्यासाठी काळाराम मंदिर सत्याग्रह, महाडचा चवदार तळय़ाचा सत्याग्रह, मनुस्मृती-दहन असे संघर्षशील कार्यक्रम हाती घेतले. त्यातून अनिष्ट धार्मिक रूढींसंदर्भात समाजात आत्मचिंतन सुरू झाले. डॉ. हेडगेवारांनी सामाजिक परिवर्तनासाठी संघर्षांचा मार्ग स्वीकारला नाही. त्यांनी व्यक्ती-व्यक्तीवर संस्कार करण्याचा मार्ग स्वीकारला. सर्व हिंदू एक असल्याची अनुभूती त्यांनी स्वयंसेवकांना दिली.

भारत ही आपली माता आहे व आपण तिची लेकरे आहोत, हा भाव त्यांनी निर्माण केला. जातिनिष्ठ हिंदूंना त्यांनी राष्ट्रनिष्ठ हिंदू बनविले. त्यामुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून संपूर्ण देशात ‘हिंदू सारा एक’ हा मंत्र दाही दिशांना घुमत आहे. बाबासाहेबांनी सामाजिक न्याय व समतेसाठी संघर्ष जरूर केला, परंतु दलित समाजात पृथकतेची भावना निर्माण होणार नाही, याचीही काळजी घेतली. नागपूरच्या दीक्षाभूमीवर त्यांनी जे भाषण केले त्यात गौतम बुद्धांनी एकात्मतेसाठी केलेल्या आवाहनाचा उल्लेख होता.

‘‘हे भिख्खूहो, तुम्ही निरनिराळय़ा देशांतून व जातींतून आला आहात. ज्याप्रमाणे आपापल्या प्रदेशातून नद्या वाहतात, तेव्हा त्या पृथक असतात. मात्र त्या सागरास मिळाल्या की, पृथक् राहत नाहीत. त्या एकजीव व समान होतात. बौद्ध संघ हा सागराप्रमाणे आहे. या संघात सर्व सारखे व समान. सागरात गेल्यावर हे गंगेचे पाणी किंवा महानदीचे पाणी ओळखणे शक्य नसते. त्याप्रमाणे बौद्ध संघात आले म्हणजे सर्व जण समान असतात.’’

२५ नोव्हेंबर १९४९- संविधान दिनाच्या आदल्या दिवशी केलेल्या भाषणात बाबासाहेब म्हणाले, ‘‘माझ्या मनाला अतिशय दु:ख होते ते या गोष्टीमुळे की, भारताला यापूर्वी आपले स्वातंत्र्य गमावण्याची वेळ एकदाच येऊन गेली असे नाही. परंतु ते भारताच्या जनतेच्या स्वत:च्याच विश्वासघातामुळे, देशद्रोहीपणामुळेच त्याला गमवावे लागले. जेव्हा महंमद बिन कासीमने सिंधवर स्वारी केली तेव्हा राजा दाहीरच्या सेनापतीने महंमद बिन कासीमच्या मुनीमाकडून लाच खाऊन आपल्या राजाच्या बाजूने लढण्याचे साफ नाकारले. महंमद घोरीला हिंदूस्थानवर स्वारी करून पृथ्वीराजाच्या विरुद्ध लढण्यास आमंत्रण देणारा जयचंद होता. आपल्याला स्वातंत्र्य टिकवायचे असेल तर ही जयचंदी वृत्ती पुन्हा जन्मास येणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे, असे सांगून ते पुढे म्हणतात की, ज्या जातिभेदामुळे सामाजिक जीवनात तट पडले आहेत आणि जातीजातींत मत्सर आणि शत्रुत्व निर्माण झाले आहे, त्या जातिभेदाचा त्याग करून भारतीयांनी सामाजिक आणि भावनिक अर्थाने एक राष्ट्र व्हावे.’’ सामाजिक विषमता संपली आहे असे म्हणता येणार नाही. डॉ. आंबेडकरांनी लक्षावधी दलितांच्या मनातील न्यूनगंडाची भावना काढून टाकली तर डॉ. हेडगेवारांनी संघाच्या कार्यपद्धतीतून सामाजिक समरसतेचे पालन करणारे लक्षावधी स्वयंसेवक निर्माण केले. राष्ट्रीय एकता, राष्ट्रीयता आणि समरसता या गोष्टींचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा या दोनही थोर व्यक्तींचे योगदान महत्त्वपूर्ण ठरते. सामाजिक समरसता आणण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले त्यास अधिक गतिमान करण्याची आज आवश्यकता आहे.

Story img Loader