रवींद्र माधव साठे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्मातील अनिष्ट रूढींवर प्रहार केले, मात्र त्याच वेळी या धर्माचा गौरवही केला. ‘स्वामीजींच्या विचारांचं विकृतीकरण कोण करतंय?’ या (१६ जुलै) लेखाचा प्रतिवाद..

भारतीय राजकारण, समाजकारणाची दिशा  २०१४ नंतर बदलली. हिंदू, हिंदूत्व या शब्दांना प्रतिष्ठा प्राप्त घेऊ लागली. सांस्कृतिक राष्ट्रवाद प्रबळ झाला. काही विचारवंतांना हिंदूत्ववाद्यांचे हे यश सहन झाले नाही. धर्मनिरपेक्षता, पुरोगामित्व अशा शब्दांच्या रूढ अर्थाना सुरुंग लागला. परिणामत: गेल्या आठ-नऊ वर्षांत स्वामी विवेकानंदांच्या मूळ हिंदूत्ववादी विचारांची पुरोगामी अभिजनांकडून मोडतोड करण्याची योजनाबद्ध मोहीम सुरू झाली. गेल्या पंधरवडय़ात योगेंद्र यादव यांचे स्वामीजींवरील दोन लेख आणि दत्तप्रसाद दाभोलकर यांचा, १६ जुलैच्या ‘लोकसत्ता’तील ‘स्वामीजींच्या विचारांचे विकृतीकरण कोण करतंय?’ हा लेख त्याच मोहिमेचा एक भाग आहे.

दाभोलकरांसारख्या विचारवंतांची समस्या ही आहे की स्वामीजींनी हिंदू समाजाला व हिंदूत्वाला केवळ वैचारिक अधिष्ठानच दिले नाही तर हा विचार वैश्विक आहे आणि हिंदू समाज व धर्म सर्वाधिक सर्वसमावेशक धर्म असल्याचेही जगाला पटवून दिले. हिंदू संस्कृतीचा पाया भक्कम असल्याने इस्लामचे आक्रमण आणि ब्रिटिशांच्या राजवटीतही येथील संस्कृती नष्ट झाली नाही. हाच विजिगीषू विचार विवेकानंद आणि योगी अरिवद यांनी पुन:पुन्हा मांडला. रा. स्व. संघ हेच कार्य १९२५ पासून करत आहे.

दाभोलकर यांच्या लेखात स्वामीजींबद्दलचे काही अर्धवट दाखले आहेत. लेखक अरिवद गोखले यांनी दाभोलकरांच्या टिळकांसंदर्भातील एका लेखात असत्य माहिती दिल्याचे निदर्शनास आणून देऊन त्यांच्या संशोधनास आव्हान दिले होते (संदर्भ: स्वामीजी, लोकमान्य आणि स्वातंत्र्यवीर या पुस्तकातील प्रस्तावना, लेखक- डॉ. अशोक मोडक, पृष्ठ ३८-३९). दत्तप्रसाद दाभोलकर यांनी ‘शोध विवेकानंदांचा’ या पुस्तकात विवेकानंद समाजवादी होते असे म्हटले आहे. त्या पुस्तकाच्या मलपृष्ठावर ‘आधुनिक हिंदू धर्म म्हणजे सैतानांचा बाजार’ हे स्वामीजींचे अवतरण दिले आहे. पुस्तकात स्वामीजींनी हिंदू धर्माचे जे दोष दिग्दर्शन केले त्याचे दाखले आहेत. परंतु त्यांनी हिंदू धर्माचा भरभरून गौरव केलेला आहे ती अवतरणे मात्र पुस्तकातून गायब आहेत. दाभोळकर यांनी स्वामीजींच्या इस्लाम व ख्रिस्ती धर्माबद्दलच्या काही विधानांची मोडतोड केली. ते म्हणतात, ‘‘या देशातील धर्मातरे मुसलमान वा ख्रिश्चनांनी तलवारीच्या वा पैशांच्या जोरावर केली नाहीत, तर ती उच्चवर्णीयांनी बहुजन समाजावर केलेल्या पाशवी अत्याचारांमुळे झाली,’’ असे विवेकानंद म्हणत. विवेकानंदांनी हे वाक्य कधी म्हटले, याचा उल्लेख मात्र दाभोलकर करत नाहीत. विवेकानंदांनी हिंदू धर्माची भरभरून स्तुतीही केली आहे. इस्लामचे अत्याचार व जबरदस्तीने केलेल्या धर्मातरावर स्वामीजींनी कोरडे ओढल्याचे ढीगभर पुरावे आहेत. रामकृष्ण मठ, नागपूर यांनी विवेकानंद ग्रंथावली प्रकाशित केली आहे. त्यातील खंड २, ४, ७, ८ आणि १० मध्ये हे दाखले सापडतात. वानगीदाखल पुढील उदाहरण.

१८८१ च्या एप्रिलमध्ये ‘प्रबुद्ध भारत’ मासिकात स्वामीजींची मुलाखत प्रसिद्ध झाली होती. त्यात ते म्हणतात, ‘‘धर्मातर केलेल्यांना अवश्य परत घ्यावे, न घेतल्यास हिंदूंची संख्या कमी होते. सांप्रत मुसलमानी किंवा ख्रिस्ती यांनी पूर्वीच्या काळी तलवारीच्या भयाने परधर्म स्वीकारला होता,’’ हे विधान दाभोलकरांच्या शोधास छेद देणारे आहे. 

विवेकानंदांनी परखड शब्दांत मोगलांच्या व इस्लामच्या आसुरी कारवायांचा पंचनामा केला आहे. खालील उतारे खूप बोलके आहेत. (‘द फ्युचर ऑफ इंडिया’ या शीर्षकाचे भाषण, सिलेक्शन्स ऑफ विवेकानंद, पृष्ठ २८०)

अ) भूतकाळात आपल्या संस्कृतीवर ‘अल्ला हो अकबर’ या घोषणेच्या प्रकाशात तलवारी घेऊन हल्ले झाले आहेत. पण तरी आपले राष्ट्र जिवंत राहिले आहे. आ) मुस्लीम भारतात आले तेव्हापासून हिंदूंची संख्या सतत कमी होत आली. असेच होत राहिल्यास अद्वैताचे प्रतिनिधी म्हणून कोण उरेल?’’ इ) ‘‘विदेशी आक्रमकांनी भारतातली कैक देवळे धुळीस मिळविली, पण हिंदूंनी ती पुन्हा उभारली.’’ ई) ‘‘मी रामकृष्ण परमहंसांचा म्हणजे एका सर्वोत्तम संन्याशाचा शिष्य आहे. त्यांनी कोणत्याही धर्माविषयी टीकात्मक अथवा निषेधात्मक दृष्टिकोन बाळगला नाही. उलटपक्षी इतर धर्माकडून आपण काय शिकले पाहिजे असा भावात्मक उपदेश केला आहे. मुस्लिमांनी मात्र खून आणि कत्तली केल्या. ते इथे येईपर्यंत भारतात शांतता नांदली.’’

स्वामीजींनी १ मे १८९७ रोजी ‘रामकृष्ण मिशन’ची स्थापना केली. मिशनचा नियम क्र. २० पुढीलप्रमाणे- ‘मुस्लीम आणि ख्रिस्तींनादेखील हिंदू समाजात आणण्याचे महत्प्रयास केले पाहिजेत. परंतु, काही काळापुरते त्यांना उपनयन संस्कार देण्याची आवश्यकता नाही.’  स्वामीजींनी हिंदू धर्मातील दोषांवर सडकून टीका करतानाच या धर्माविषयी गौरवोद्गारही काढले. हिंदू असण्याची ज्यांना लाज वाटते त्यांनी स्वामीजींचे पुढील विचार ध्यानी घ्यावे.

(१) बौद्ध धर्म हे हिंदू धर्माचे बंडखोर अपत्य आहे. बुद्धाचा शून्यवाद आणि जैनांचा निरीश्वरवाद यांनाही हिंदू धर्मात स्थान आहे. (२) आमचा एकच धर्म व्यक्तीऐवजी तत्त्वांवर अधिष्ठित आहे. (३) या धर्मात आचार- विचारांचे अमर्याद स्वातंत्र्य आहे. (४) हिंदू हा कोणत्याही भाषेत आढळणार नाही असा हा अत्युच्च शब्द आहे. (५) जेव्हा मनुष्याला आपल्या पूर्वजांची लाज वाटू लागते, तेव्हा त्याचा शेवट जवळ आला आहे, असे समजावे. मला स्वत:ला हिंदू म्हणवून घेण्यात गर्व वाटतो. (हिंदूत्व: भारतीय राष्ट्राचा मूलाधार, डॉ. ब. ल. वष्ट, पृष्ठ ६४). आता इस्लाममधील समतेबद्दल. दाभोलकरांनी लेखात स्वामीजींनी सर्फराझला पाठवलेल्या पत्रात समतेचा संदेश इस्लामने आणला असा उल्लेख केल्याचे म्हटले आहे, मात्र स्वामीजींनी इस्लाम व ख्रिस्ती धर्माला अभिप्रेत समता व बंधुता त्यांच्या धर्मातील अनुयायांपुरती मर्यादित असते, असेही प्रतिपादन केले आहे (सिलेक्शन्स फ्रॉम विवेकानंद). मात्र हे मत दाभोलकरांनी दडवून ठेवले आहे.

विवेकानंदांना स्वतला हिंदू धर्माचे प्रतिनिधी मानूनच सर्वधर्मपरिषदेला गेले होते. त्यांचे वाक्य ‘‘नाना धर्माचे उगमस्थान जो सनातन हिंदू धर्म त्याचा प्रतिनिधी या नात्याने मी तुम्हास धन्यवाद देत आहे..’’ (स्वामी विवेकानंद ग्रंथावली, खंड १ -पृष्ठ क्र. ३). भारतातील पांबन येथे रामनादच्या राजेसाहेबांनी केलेल्या स्वामीजींच्या स्वागताचे वर्णन याच खंडात पृष्ठ ४७ वर आहे. कोलंबो, पांबन, रामेश्वर, रामनद, परमकुडी, शिवगंगा, मानमदुरा, मदुरा, कुंभकोणम, मद्रास व अल्मोरा येथे विवेकानंदांनी केलेली स्वागताच्या स्वीकाराची भाषणे खंड ५ च्या प्रारंभी आहेत.

आता ‘अवकळाप्राप्त बौद्ध धर्म’ वगैरेंबद्दल. बौद्ध धर्माच्या अवनतीवर विवेकानंदांनी सविस्तर भाष्य केले आहे. त्याचा सारांश पाचव्या खंडात पृष्ठ ४८ वर सापडेल. ‘‘बौद्ध धर्माची ही अवदशा झाली त्यांच्या अनुयायांच्या दोषांमुळे. तत्त्वज्ञानाचा अत्याधिक विचार करून – करून ते तर्ककर्कश झाले व त्यांची उदार सहृदयता लोपली. नंतर वामाचारातील व्यभिचाराने त्या धर्मात प्रवेश केला व अखेर बौद्ध धर्म गारद झाला!’’ वगैरे.

दाभोळकर यांनी विवेकानंदानी अलासिंगा पेरुमल व सर्फराज हुसेन यांना पाठवलेल्या पत्रांचा संदर्भ दिला आहे. परंतु दाभोलकरांनी सोयीस्कर व अर्धवट मजकूर देत दिशाभूल केली आहे. सर्फराजच्या पत्रात समारोपात स्वामी म्हणतात- ‘‘आपल्या मातृभूमीच्या भल्यासाठी वेदांती मेंदू आणि इस्लामी देह यांचा संगम झाला पाहिजे.’’ यात स्वामी वेदांताचा उल्लेख करतात, कुराणाचा नाही. स्वामी पुढे म्हणतात, ‘‘भारतीय नागरिकांनी स्वत:च्या मेंदूत वेदांत साठवावा व मुस्लिमांप्रमाणे संघटित व्हावे.’’ गोळवलकर गुरुजींनी विवेकानंदांचे गुरुबंधू अखंडानंद स्वामींकडून दीक्षा घेतली होती. रामकृष्ण मिशनने रा. स्व. संघाच्या कामास कायम प्रोत्साहन दिले आहे.

दाभोलकर म्हणतात, विवेकानंद पोहत त्या खडकावर गेले होते का, याबद्दल वाद आहेत, परंतु हा काही संघवाल्यांचा शोध नाही. शिला स्मारकाच्या जागी कधी क्रॉस नव्हताच हे जगजाहीर आहे. विवेकानंदानी हिंदू समाजात रुजलेल्या रूढी मोडून खऱ्या हिंदू धर्माचे वेदकाळाशी नाते जोडण्याचे आवाहन केले. 

स्वामीजींच्या मृत्यूनंतर लोकमान्य टिळक लिहितात, ‘‘सर्व जगातील देशांत अद्वैत मताची पताका फडकत ठेवून हिंदू धर्माची अर्थात हिंदू लोकांची महती सर्व जगभर करून धर्म संस्थापना करण्याचे काम श्रीमत विवेकानंदांनी हाती घेतले होते व त्या कामाचा पाया त्यांनी भक्कम घातला होता.. अशा प्रकारचा धर्म आजच्या देशात झाला हेच आमचे अमूल्य धन व बळ आणि त्याचा जगभर प्रसार करणे हेच आमचे कर्तव्य असे केवळ बोलणारे नव्हे तर जगास सिद्ध करून दाखवणारे सत्पुरुष हजार-बाराशे वर्षांपूर्वी एक शंकराचार्य होऊन गेले आणि एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस स्वामी विवेकानंद झाले.’’ (केसरी, ८ जुलै १९०२) लोकमान्यांसारख्या सूर्यनारायणानेही स्वामीजींचा गौरव केला होता.

लेखक महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे सभापती आणि सावरकर दर्शन प्रतिष्ठानचे सचिव आहेत.

ravisathe64@gmail.com

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravindra madhav sathe article on swami vivekananda hindutva view zws
Show comments