रवींद्र माधव साठे

धर्म हाच आपल्या राष्ट्रजीवनाचा आधार आहे आणि भारत हे हिंदूराष्ट्र आहे; ख्रिश्चन आणि इस्लाम या दोन्ही धर्माचा वैश्विक बंधुतेचा दावा फोल आहे, असे स्वामी विवेकानंद यांचे ठाम मत होते. ‘असे स्वामीजी स्वीकारणार का?’ या ‘देशकाल’ सदरातील लेखाचा (७ जुलै) प्रतिवाद..

Siddheshwar Yatra Festival
Siddheshwar Yatra : सोलापुरात नंदीध्वजांच्या मिरवणुकीने सिद्धेश्वर यात्रेला प्रारंभ
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Article about large religious conference in marathi
तर्कतीर्थ विचार :  वेदांचे पावित्र्य माझ्या हृदयात
स्वामी विवेकानंद यांनी पाश्चिमात्य देशांना हिंदू धर्माची ओळख कशी करून दिली? (फोटो सौजन्य इंडियन एक्स्प्रेस)
स्वामी विवेकानंद यांनी पाश्चिमात्य देशांना हिंदू तत्वज्ञानाची ओळख कशी करून दिली?
Special article on occasion of Swami Vivekanandas birth anniversary
धर्म, अस्मिता आणि हिंदू!
woman decomposed body in fridge
श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती! विवाहित व्यक्तीकडून लिव्ह-इन पार्टनरची हत्या, ८ महिने मृतदेह फ्रिजमध्ये
Religious Reformation Work and Thought
तर्कतीर्थ विचार: धर्मसुधारणा : कार्य आणि विचार
Image Of Zeenat Tigress
‘झीनत’मुळे का सुरू आहे पश्चिम बंगाल-ओडिशामध्ये वाद? एका वाघीणीमुळे दोन राज्यांमध्ये राजकीय तणाव!

ग्रीक पुराणात एक प्रसिद्ध कथा आहे. प्रोक्रस्टस नावाचा एक ग्रीक दरोडेखोर होता. त्याने एक लोखंडी पलंग तयार केला होता. त्याच्या वाटेवरून जाणाऱ्या वाटसरूला तो अडवत असे व त्या पलंगावर झोपवत असे. त्या पलंगापेक्षा वाटसरूचे पाय लांब असतील तर तो ते कापत असे आणि पलंगाच्या मापापेक्षा वाटसरूची लांबी कमी असेल तर तो बळजबरीने त्याचे हात-पाय खेचून त्या पलंगाच्या मापापर्यंत नेण्याचा प्रयत्न करत असे. यावरून ‘प्रोक्रस्टियन बेड’ ही कल्पना रूढ झाली. शुक्रवार, ७ जुलै रोजी ‘लोकसत्ता’त योगेंद्र यादव लिखित ‘असे स्वामीजी स्वीकारणार का?’ हा लेख प्रोक्रस्टियन बेड याच धाटणीचा आहे. यादव यांनी निष्कर्ष आधीच काढून ठेवला आहे. आणि तो सिद्ध करण्यासाठी स्वामीजींच्या मूळ विचारांची सोयीस्करपणे काट-छाट करून वाचकांना दिग:भ्रमित करण्याचा प्रयत्न केला आहे.

योगेंद्र यादव यांनी काढलेले निष्कर्ष असे- १) संघ – भाजप स्वामी विवेकानंदांवर सांगतो तो दावा म्हणजे अवैध विनियोगाची राजकीय कृती. २) स्वामीजी हिंदू धर्माभिमानी होते पण हिंदू वर्चस्ववादी नव्हते. ३) भारतीय संस्कृतीच्या अध:पतनास मुस्लीम आक्रमकांना किंवा वसाहतवाद्यांना जबाबदार धरता येणार नाही. मोहम्मदाचे भारतावरील आक्रमण हे खरे तर दीन-दलितांचा उद्धार करणारे ठरले. ४) इस्लामची समता व बंधुतेचे तत्त्वज्ञान तसेच येशू ख्रिस्ताची स्वामीजींनी प्रशंसा केली आहे इत्यादी.

स्वामी विवेकानंदांचे भारतात अवतरण झाले त्या वेळी हिंदू धर्माच्या अस्तित्वावर गुलामी आणि धर्माच्या ठेकेदारांचे संकट होते. म्हणून स्वामीजींनी हिंदू धर्म व हिंदूत्वाची ध्वजा अखिल विश्वात फडकावली. स्वामी विवेकानंद राष्ट्रवादाचे खंदे समर्थक होते. ‘गर्व से कहो हम हिंदू है’ हे वाक्य मूळ विवेकानंदांचे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काँग्रेसप्रणीत प्रादेशिक राष्ट्रवाद अमान्य केला आणि सांस्कृतिक व आध्यात्मिक राष्ट्रवादाचा पुरस्कार केला, त्याची बीजे स्वामी विवेकानंदांनी लाहोर मुक्कामी १० नोव्हेंबर १८९७ या दिवशी केलेल्या भाषणात आढळतात. त्या भाषणात स्वामीजी म्हणाले, ‘‘ज्यांच्या हृदयात आध्यात्मिक विचारांचे स्पंदन सुरू आहे, अशांच्या ऐक्यातूनच भारतीय राष्ट्र साकारले आहे.’’ स्वामी विवेकानंदांनी भारत हे हिंदूराष्ट्र आहे, असे ठाम प्रतिपादन केले होते. त्यांनी कोलंबो ते अल्मोडा प्रवासात सर्वत्र हिंदूराष्ट्र अधिक एकात्म व्हावे, समृद्ध व्हावे, याच उद्दिष्टपूर्तीसाठी शिफारशी केल्या. मद्रास येथे केलेल्या भाषणात स्वामीजी म्हणाले, ‘‘धर्म हाच आपल्या राष्ट्रजीवनाचा आधार आहे व म्हणूनच परक्या आक्रमकांनी मंदिरे पाडली आणि आपल्या पूर्वजांनी त्यांचा जीर्णोद्धार केला.’’ १२ नोव्हेंबर १८९७च्या लाहोरमधील भाषणात ते म्हणतात, ‘‘वायव्येकडून जी आक्रमणे झाली, त्यांचे पहिले घाव पंजाब प्रांतानेच झेलले.’’ मद्रास येथे त्यांनी आर्य विरुद्ध द्रविड हा वितंडवाद निरर्थक आहे, असा उल्लेख करून हिंदूराष्ट्राची एकात्मता अधोरेखित केली. संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांनी स्वामीजींचे हेच विचार पुढे नेले. ही अवैध विनियोगाची राजकीय कृती कशी ठरेल?

विवेकानंदांनी ख्रिश्चन आणि इस्लाम या धर्माचा अभ्यास केला होता. ते म्हणतात, या दोन्ही पंथांचा वैश्विक बंधुतेचा दावा फोल आहे, कारण हे दोन्ही पंथ इतर पंथांना वधार्ह मानतात. १० जून १८९४ रोजी अल्मोडा येथून सरफराझ मोहम्मद यांना पाठविलेल्या पत्रात ते म्हणतात, ‘‘हिंदू आणि मुस्लीम यांची एकी व्हावी अशी माझी इच्छा आहे, परंतु त्यासाठी वैदिक मेंदू आणि इस्लामी शरीर याची साम्यजोड व्हायला हवी!’’ स्वामी विवेकानंद यांनी स्पष्ट शब्दांत मुस्लिमांना आवाहन केले होते- ‘‘हिंदू जात्याच सर्वसमावेशक असतात. सत्याच्या सर्व आविष्कारांचे ते हार्दिक स्वागत करतात; हीच धारणा इस्लाम व ख्रिश्चन या अब्राहमिक पंथीयांनीही आत्मसात करावी, त्यामुळे एकी मजबूत होईल.’ (सिलेक्शन्स ऑफ स्वामी विवेकानंद, पृष्ठ १६०-१६१)

स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘‘आपला धर्म हा वैश्विक धर्म असल्याचा दावा अब्राहमिक पंथीय करतात, पण त्यांचे आचरण वैश्विक नसते, हिंदू मात्र हा दावा करत नाहीत, परंतु त्यांचे आचरण वैश्विक असते.’’ हिंदू ही संज्ञा संस्कृतीची निदर्शक आहे, ती एक जीवनपद्धती आहे, ही भूमिका स्वीकारली तर भारताला आपली मातृभूमी मानणारे आणि ज्यांचे पूर्वज शतकानुशतके याच भूमीत राहात होते ते सर्वच ‘हिंदू’ या संज्ञेला पात्र आहेत असे स्वामीजी म्हणतात. मुस्लिमांच्या बाबतीत संघाची हीच भूमिका आहे.

इतर सर्वानी माझ्याच धर्माचा स्वीकार करावा, असा हट्ट धरणे शंभर टक्के चूक आहे, असे ते म्हणत. ब्रिटिशांनी ख्रिश्चन धर्माचा भारतात प्रसार करण्यासाठी जो उच्छाद मांडला होता, त्यावरही विवेकानंदांनी आसूड ओढले. ‘‘सर्व भारतीयांनी सागराच्या तळाचा चिखल हाती घेतला व पाश्चिमात्य देशांच्या दिशेने फेकला, तरी मिशनऱ्यांनी भारताच्या केलेल्या बदनामीची अंशत:च परतफेड होईल.’’ (२१.०२.१८९४, अमेरिकेतील भाषण) असे ते म्हणत.

आम्हालाच अधिकार

प्राचीन भारताने मशिदी व ख्रिश्चनांसाठी चर्च बांधले, हे विधान विवेकानंदांच्या एका भाषणात आढळते, परंतु त्यांनी हिंदूंच्या घटत्या संख्येबद्दल विषादही व्यक्त केला होता. ते म्हणतात, ‘‘मुस्लीम भारतात आले, तेव्हा इथे ६० कोटी हिंदू होते. आता ही संख्या २० कोटींपर्यंत घसरली आहे. एक हिंदू जेव्हा अहिंदू होतो, तेव्हा शत्रूची संख्या एकाने वाढते. (विवेकानंदांचे पत्र- इन डिफेन्स ऑफ हिंदूइझम). त्याच पत्रात हिंदू धर्माची थोरवी विवेकानंदांनी शब्दबद्ध केली आहे- ‘‘अमेरिकेत येऊन एक वर्ष उलटले आहे. या काळात मी इथल्या समाजाचा पुरेसा अभ्यास केला. मिशनरी सांगतात त्याप्रमाणे आपण राक्षस नाही व तेदेखील स्वत:विषयी दावा करतात त्याप्रमाणे देवदूत नाहीत. नीतिमत्तेच्या बाबतीत तर आम्हीच त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत आणि त्याबाबतीत मान ताठ करून चालण्याचा आम्हालाच अधिकार आहे.’’

स्वामीजींचे संपूर्ण आयुष्य हिंदूराष्ट्राच्या पुनरुत्थानासाठी व्यतीत झाले. रा. स्व. संघासारख्या हिंदूत्वनिष्ठ संघटना स्वामीजींच्या भूमिकेशी पूर्ण सहमत आहेत. हिंदू धर्म खऱ्या अर्थाने वैश्विक धर्म आहे. हा धर्म मूलत: सहिष्णू, क्षमाशील आणि सर्वसमावेशक आहे, पण प्रसंगानुरूप तो जयिष्णू, क्रोधशील आणि कठोर होऊ शकतो. भारत हे हिंदूराष्ट्र आहे व ते प्राचीन काळापासून आध्यात्मिक वाटचाल करीत आहे. भारतीय चिंतन एकात्म, सर्वागीण आणि सर्वसमावेशक आहे, असे स्वामीजींचे ठाम प्रतिपादन होते.

हिंदू चिंतन अतिशय उच्च दर्जाचे आहे, पण हिंदूंचे वर्तन मात्र तिरस्करणीय आहे. उच्चवर्णीय व धनिक क्रमश: निम्नवर्णीयांशी व निर्धनांशी घृणास्पद व्यवहार करतात. कालबाह्य ठरलेल्या अनेक रूढी आपण वर्तमानकाळातही अनुकरणीय मानतो व न्याय आणि माणुसकी या मूल्यांना सुरुंग लावतो. विवेकानंदांनी भारतात परतल्यावर राष्ट्रीय पुनरुत्थानाच्या प्रक्रियेला साकार करण्यासाठी हिंदू समाजाच्या पुनर्बाधणीस अग्रक्रम दिला. यासाठीच त्यांनी कालबाह्य रूढींवर प्रहार केला व हिंदू समाजातील सामाजिक दोषांवर कठोर टीका केली. स्वा. सावरकरांनी हीच भूमिका मांडली होती.

‘‘मानवाच्या श्रेष्ठतेचा उद्घोष एवढय़ा कंठरवाने हिंदू धर्माखेरीज अन्य कोणत्याही धर्माने केलेला नाही आणि दीन-दलितांची धर्माच्या नावाने पिळवणूक करण्याइतकी पराकोटीची हीनताही जगातल्या अन्य कोणत्या धर्माने दाखविलेली नाही. परमेश्वराने मला सांगितले आहे की, धर्म निर्दोष आहे. दोषी आहेत ते धर्माचा व्यापार करणारे दलाल! स्वामीजींनी हिंदू समाजातील दोषांवर टीका केली हे खरे, परंतु इस्लामच्या समतेची व बंधुतेची त्यांनी प्रशंसा केली, हे म्हणणे त्यांच्या नावावर योगेंद्र यादव यांनी खपविले आहे.

स्वामी विवेकानंद हे एक महान बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी धर्मचिकित्सा केली आहे, तशीच राष्ट्रमीमांसा केली आहे. विकास, महिलांचे समाजातील स्थान, दलितोद्धार याबाबतही त्यांचे चिंतन होते. हिंदू धर्म, हिंदूत्व, हिंदू संस्कृती हेच विषय त्यांच्या लेखनाच्या केंद्रस्थानी होते. त्यांच्या समग्र साहित्याचा योगेंद्र यादव यांनी एकात्म विचार केला असता तर त्यांना हेच सत्य उमगले असते.

स्वामी विवेकानंद वैश्विकतेचे उपासक होते, हे निर्विवाद सत्य आहे. पण या वैश्विकतेचे मूळ त्यांच्या हिंदूपणात होते. वैश्विकता व हिंदूपणा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. विवेकानंदांची वैश्विकता विशद करण्यासाठी त्यांची हिंदू धर्मावरची आणि हिंदू राष्ट्रावरची निष्ठा झाकून ठेवणे योग्य नाही. त्यांच्या मूळ विचारांची मोडतोड करून व चुकीचे संदर्भ देऊन त्यांच्या विचारांचे अपहरण करता येणार नाही.

लेखक ‘महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळा’चे सभापती आणि ‘सावरकर दर्शन प्रतिष्ठान’चे सचिव आहेत.

ravisathe64@gmail.com

Story img Loader