‘विक्राळ अंतराळ..’ या शनिवारच्या संपादकीयातून (१७ फेब्रुवारी) अंतराळात निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्यासंबंधी कल्पना देण्यात आली आहे. अंतराळातून हेरगिरी करणाऱ्या उपग्रहामुळे जवळपास प्रत्येक देशाची सुरक्षितता धोक्यात आली आहे. उदाहरणार्थ चीनच्या म्हणण्याप्रमाणे चीन देशावरील (आकाशाप्रमाणेच) अंतरिक्षावरही चीनचीच मालकी आहे, त्यामुळे त्या देशाच्या वरल्या अंतराळातून जाणारे अमेरिकेने  हेरगिरी करणारे उपग्रह पाठवू नये. यामध्ये बरेचसे तथ्य आहे. भारतावरूनही अंतरिक्षातून अमेरिकेचे हेरगिरी करणारे उपग्रह जात आहेत त्यामुळे कदाचित, भारताच्या संरक्षण व्यवस्थेची गुप्त माहिती अमेरिकेला, अमेरिकेकडून  पाकिस्तानला (आणि पाकिस्तानकडून चीनलाही) मिळू शकते. हा धोका गंभीर आहे म्हणूनच अंतराळातून दुसऱ्या देशावरून जाणारे हेरगिरी करणारे उपग्रह  पाठविण्याबाबत काहीएक नियम ठरवण्यासाठी, अन्य देशांनी घेतलेल्या आक्षेपांचा आदर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कायदा करण्याची तातडीची गरज आहे. (सध्या तसे करणे तत्त्वत:च गैर मानले जाते परंतु हे तत्त्व कोणीही जुमानत नाही). भारतानेही यासाठी संयुक्त राष्ट्रांत पाठपुरावा करावा. – अरविंद जोशी, पुणे

समस्त देशांनी तयार राहावे.. 

‘विक्राळ अंतराळ ..’ हे शनिवारचे संपादकीय अंतराळातील बेलगाम युद्धाचा धोका अधोरेखित करणारे आहे. आजही सर्वसामान्य जनतेला देशाने उपग्रह अंतराळात सोडले, यान मंगळावर गेले की एक प्रकारचा निरागस आनंद होतो, पण हेच अंतराळातील उपग्रह दुसऱ्या देशाला नुकसान पोहोचवू शकतात ही कल्पनासुद्धा भयावह वाटते. अंतराळ हा सर्वसामान्य माणसाच्या नेणिवेपलीकडील भाग असून तिथल्या हालचालींनी देशात गडबड होणे हे घाबरवून टाकणारे आहे. त्यातच अंतराळात काहीच देश विहरत असल्याने कुठलेच नियम वा सीमा आत्तापर्यंत ठरलेल्या नाहीत. त्यामुळेच या प्रकारच्या हल्ल्यासाठी समस्त देशांनी तयार राहावे किंवा त्याला कसे रोखू शकतो याचा विचार सामंजस्याने करावा. – माया हेमंत भाटकर, चारकोप गाव (मुंबई)

majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Loksatta explained What is the reason for the dissatisfaction of gig workers
‘गिग’ कामगारांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’! त्यांच्या असंतोषाचे कारण काय? सामाजिक सुरक्षेचा लाभ किती?
drones paragliding banned in pune on occasion of pm narendra modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त ड्रोन, पॅराग्लायडर उड्डाणास बंदी; आदेशाचा भंग केल्यास कारवाईचा इशारा
Strategies to Counter Terrorism Amit Shah statement at the conference of National Investigation Agency
दहशतवादाचा सामना करण्याची रणनीती; राष्ट्रीय तपास संस्थेच्या परिषदेत अमित शहा यांचे प्रतिपादन
Jet Airways re flight possibilities end Supreme Court orders liquidation of company
जेट एअरवेजच्या फेर-उड्डाणाची शक्यता संपुष्टात; सर्वोच्च न्यायालयाचा कंपनी अवसायानांत काढण्याचे आदेश
Will the America First Policy Hit Indian Exporters
‘अमेरिका प्रथम’ धोरणाचा भारतीय व्यापाराला फटका? वाहन, वस्त्र, औषध निर्यातदारांना शुल्कवाढीची भीती
Ban on flying drones in city due to PM Narendra Modis meeting security measures by police
पंतप्रधानांच्या सभेमुळे शहरात ड्रोन उडविण्यास बंदी, पोलिसांकडून सुरक्षिततेचे उपाय

हेही वाचा >>> लोकमानस: पक्ष मतदारांना गृहीत धरू शकणार नाहीत

ग्रह- पूर्वग्रहांचे वि-कराल रूप!

‘विक्राळ अंतराळ ’ हे संपादकीय वाचल्यावर विश्वरूपदर्शन वर्णन करणाऱ्या श्लोकातील वरील शब्द आठवले. माणसाच्या बुद्धीचा संहारक उपयोग ‘सर्व जगाचा नाश करू शकणाऱ्या’ काळाचे रूप घेत असल्याचे महाभयंकर (वि-कराल) चित्र डोळय़ासमोर उभे राहिले. ग्रह, उपग्रह यापेक्षाही विविध देशांतील सत्ताधाऱ्यांनी स्वत:बद्दल आणि एकमेकांबद्दल करून घेतलेले ग्रह हे जगाला युद्धाच्या खाईत लोटतात. अमेरिकेला आपण लोकशाहीचे, रशिया व चीन यांना आपण साम्यवादाचे तर भारताला राममंदिराच्या उभारणीनंतर आपण संस्कृतीचे, आध्यात्मिक वारशाचे उद्गाते आहोत असे वाटू लागले आहे. या व अशा समजांचे विविध ग्रह एकमेकांवर आदळत आहेत! याचा बाह्य आविष्कार अंतराळात विक्राळ रूप घेत आहे. – गजानन गुर्जरपाध्ये, दहिसर पूर्व (मुंबई)

बेगडी चेहऱ्यांबद्दल खात्री नाही ?

‘कमळाचे फूल हाच उमेदवार’ या मथळय़ाखालील बातमी (लोकसत्ता-१८ फेब्रु.) वाचली. शेवटी आपल्या जागतिक नेत्याच्या लक्षात आलेच असावे की, आपल्याकडे आलेले आयातवीर बळेच भाजपवासी वा मित्रपक्षवासी झालेले आहेत. अशावेळी आपणच त्यांच्यावर केलेले गंभीर घराणेशाहीचे आरोप कदाचित जनता सहज विसरणे शक्य नाही. तसेच काळय़ा पैशांच्या आरोपाखाली तुरुंगात धाडण्याची केलेली गर्जनाही आपण बाजूला ठेवून काहींची गळाभेट घेतली आहे. ‘न खाऊंगा न खाने दूंगा’, ‘सबका साथ सबका विकास’ अशा आपल्याच घोषवाक्यांची आपणच केलेली पिळवणूक, कार्यकर्त्यांचा (उरलासुरला) आत्मविश्वास तळास नेऊ शकते. तेव्हा अशा विविध बेगडी चेहऱ्यांवर मतांची पुरेशी बेगमी होणे शक्य नाही, हे उमगल्याची कबुलीच ‘कमळाचे फूल हाच उमेदवार’ या चलाखीतून मिळत नाही काय? विजय बापू, सासवड ( जि. पुणे)

फडणवीस यांच्या पक्षनिष्ठेचे कौतुक!  

विरोधकांची मोट बांधून, एकेका बडय़ा नेत्यांना भाजपच्या वळचणीत आणून ठेवण्यात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे. पक्षबांधणीसाठी आपल्या इच्छा-आकांक्षांना बाजूला सारून, प्रसंगी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारूनही मोदींच्या ‘अबकी बार,चारसो पार’चा नारा सार्थक करण्यासाठी, निष्ठा कशी जपावी लागते, याचे धडे विरोधकांना त्यांच्याकडून गिरवावे लागतील.  फडणवीसांनी मोदींचे हात मजबूत करताना एकनिष्ठ असल्याचा जो ठसा उमटविला, त्याचे कौतुक करावेच लागेल. त्याच वेळी आयाराम गयाराम, यांच्या धोकेबाजीचा आलेख, काळाच्या कपाळावर अधोरेखित केला जाणार आहे. राजकीय क्षितिजावर कलंकाचे पडलेले डाग, बदनामीचा बिगुल वाजवत राहतील. आता पश्चिम बंगालमध्ये उन्मादी आणि आक्रमक शब्दांच्या व्यूहात जनमताचे ध्रुवीकरण करण्यात मोदींच्या निष्ठावंतांना किती यश येते, हे कळेल. मोदींच्या कसोटीवर खरा उतरलेले, संघटन चातुर्य असलेले, कडवटपणा टाळून साम, दाम, दंड, भेद नीतीचा पुरेपूर उपयोग करून घेण्यात, फडणवीस यांनी केंद्रातील सत्तेत आपले निर्विवाद स्थान नक्कीच बळकट केले आहे.   -डॉ. नूतनकुमार सी.पाटणी, छ. संभाजीनगर

हेही वाचा >>> लोकमानस : उद्योजकांना सवलती, शेतकऱ्यांच्या हाती धुपाटणे!

नेतृत्वावर निष्ठावंतांचा विश्वास टिको..

‘पक्षाने डावलल्याची भांडारी यांच्या मुलाची खंत’ ही बातमी (लोकसत्ता – १७ फेब्रु.)  वाचली आणि ‘निष्ठावंतांच्या पदरी उपेक्षाच’ याचा प्रत्यय आला. राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून एक नवीन पायंडा पडला आहे. निवडणुकांच्या तोंडावर इतर पक्षातून त्या पक्षाला रामराम ठोकलेले कार्यकर्ते, नेते पक्षप्रवेश करतात त्यांना विधानसभा, विधान परिषद वा राज्यसभेची, लोकसभेची उमेदवारी दिली जाते आणि निवडूनही आणले जाते. त्यामुळे आयुष्यभर पक्षावर निष्ठा ठेवून काम करणाऱ्या निष्ठावंतांना आपलं काही चुकलं का? असे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.ज्यांची ताकद केवळ निष्ठा आहे, ज्यांच्याकडे केवळ प्रामाणिकपणा, सत्य आहे अशांचा पक्षाने किती अंत पाहावा? ज्यांच्यावर व्यक्तिगत, सामाजिक पातळीवर आरोप आहेत, आर्थिक, राजकीय गुन्हे दाखल आहेत. ज्यांचे नाव आर्थिक घोटाळय़ात आहे, त्यांना पक्षात घेऊन स्वच्छ करून त्यांनी आयत्या पिठावर रेघोटय़ा ओढायच्या आणि निष्ठावंतांनी त्यांची हुजरेगिरी करायची का? हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यांनी किती वर्षे सतरंज्या उचलायच्या? आयुष्यभर पक्षाची भूमिका जनमानसात मांडून कार्यकर्ते तयार करून मतदार करायचे आणि त्याचा फायदा मात्र इतरांना द्यायचा ही तळमळ किती दिवस सहन करायची? प्रामाणिकतेच्या परिघाबाहेर जाता येत नाही म्हणून लक्ष्मणरेषा ओलांडायची नाही! अशाने प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा पक्षावरील,नेतृत्वावरील विश्वास उडाला तर? निष्ठावंतांना गृहीत धरणे, त्यांच्या अपेक्षांचा विचार न करणे कोणत्याही पक्षाच्या हितासाठी कधीही योग्य नाही. -प्रदीप जाधव, टेंभवली. (ता. भिवंडी, जि. ठाणे)

पदाचे लाभ न घेता धर्मकार्य करा! 

‘पंतप्रधानांनी पूजा केली तर काय बिघडले ?’  हे पत्र ( लोकमानस – १७ फेब्रुवारी) वाचले. वास्तविक पंतप्रधान हे देशाच्या राजकारणात आहेत, धर्मकारणात नाहीत. पंतप्रधानांचे एकमेव व मुख्य कार्य म्हणजे देशाचा दैनंदिन कारभार पाहणे, हेच होय! जाहीररीत्या पूजा- अर्चा करणे हे त्यांचे कार्य मुळीच नव्हे; ते कार्य त्यांनी खासगीपणे करणे हे मात्र रास्त व योग्य ठरते. अमेरिका- ऑस्ट्रेलिया- युरोप खंडातील बहुसंख्य पंतप्रधान/ राष्ट्राध्यक्ष हे ख्रिश्चन असून रविवारी प्रार्थनेसाठी चर्चमध्ये जातात खरे; परंतु तेथील प्रार्थनेचे संपूर्ण व्यवस्थापन फक्त धर्माधिकाऱ्यांकडेच असते- राजकारण्यांना त्यात काडीमात्र स्थान नसतेच. याशिवाय त्यांच्यासाठी चर्चमध्ये विशेष आसनव्यवस्था तर सोडाच, पण साधी खुर्चीही दिली जात नाही. सर्वसामान्य भाविकांसह साध्या बाकावर बसून तासभर प्रार्थनेत सहभागी होत असतात. राजकारण व धर्मकारण या दोन्ही गोष्टींची सरमिसळ नाहीच; उलट अयोध्येत मात्र पूजापाठात पुजाऱ्यांऐवजी पंतप्रधानच अग्रक्रमाने सहभागी होतात, ही बाब विशेषत्वाने खटकणारी ठरली, आणि म्हणूनच मोठा गहजब माजला! -बेंजामिन केदारकर, नंदाखाल (विरार)

निर्णय कुणाविरुद्ध, कारवाई कुणावर?

काँग्रेस पक्षाची सर्व बँक खाती सील झाली! म्हणजे आता निवडणूक लढण्यास त्यांच्यात काहीच ताकद राहणार नाही. वा! वास्तविक ज्या भाजपच्या खिशात निवडणूक रोख्यांचे लाखो कोटय़वधी रुपये आले आहेत त्यांच्या व्यवहारांची आणि निर्णयांची कसून तपासणी होणे अपेक्षित आहे. पण सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एवढय़ा मोठय़ा निर्णयानंतरसुद्धा केंद्रीय अर्थ खाते, माहिती खाते आणि पंतप्रधान त्याबद्दल अवाक्षर काढत नाहीत; जणू ते सांगत आहेत ‘आमच्याकडे त्याच ‘खोक्यां’च्या शक्तीवर आणि ईव्हीएमच्या जादूने लोकसभेमध्ये बहुमत आहे! तुम्ही आमचे काहीच वाकडे करू शकत नाही!’मायकल जी., वसई

राजकीय गुन्हेगारीमुळे तरुण बिघडतील.. 

भाजप नेते नीलेश राणे व शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या समर्थकांत चिपळूण येथे राडा झाल्याची घटना ताजी असताना नांदेड येथे काँग्रेसचे आमदार मोहन हंबर्डे यांची गाडी फोडण्यात आली. आगामी लोकसभा निवडणुकीत फायदा घेण्यासाठी सध्या सर्वच पक्षांत श्रेयवादाचे राजकारण रंगले आहे. मी केले, माझ्यामुळे झाले, मीच करू शकतो हे दाखवण्यासाठी सध्या नेत्यांचीच स्पर्धा लागली आहे. यातूनच गुन्हेगारीच्या घटना जोर धरत आहेत. यामुळे राज्यात सत्ताधारी नेत्यांची आणि गुंडांची जवळीक वाढली असल्याची जोरदार टीका होत आहे. राजकीय क्षेत्रातील वाढत्या गुन्हेगारीचे दुष्परिणाम नकळत समाजातील तरुण पिढीवर होऊ शकतात. यासाठी राजकीय क्षेत्रातील वाढत्या गुन्हेगारीला वेळीच वेसण घालणे अत्यावश्यक झाले आहे. –सुधीर कनगुटकर, वांगणी पूर्व (जि. ठाणे)