‘श्रद्धा निर्मूलन!’ हा अग्रलेख (१३ मे) वाचला. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी दिलेल्या निकालपत्राच्या पान क्र. १६६ वर न्यायाधीशांनी ‘हत्येच्या सूत्रधाराला शोधण्यात पुणे पोलीस तसेच सीबीआय अपयशी ठरले आहेत. हे त्यांचे अपयश आहे की सत्तेतील एखाद्या व्यक्तीच्या प्रभावामुळे ते जाणूनबुजून निष्क्रिय झाले याचे आत्मपरीक्षण त्यांनी केले पाहिजे.’ असे मत मांडले आहे ते पुरेसे बोलके आहे. यावर ‘लोकसत्ता’मध्ये आलेल्या सुरुवातीच्या बातम्यांचे अवलोकन केल्यास काय दिसते? ‘दाभोलकर प्रकरणात तावडेच मुख्य सूत्रधार?’ (लोकसत्ता – १४ जून २०१६) या बातमीत ‘…सबळ पुराव्याच्या आधारे तावडे हाच मुख्य सूत्रधार असल्याचे सिद्ध करण्यात येईल’ असे सीबीआय अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’स सांगितले होते. शिवाय ‘तावडेमागील सूत्रधाराचा शोध’ (लोकसत्ता- १८ जून २०१६) देखील सीबीआय अधिकारी घेत होते. परंतु निकालाच्या वेळी मात्र सबळ पुराव्याच्या अभावी मुख्य संशयित सूत्रधार निर्दोष कसा काय सुटतो आणि तपास यंत्रणा ढिल्या का पडतात याचे उत्तर त्या आधी काही दिवस म्हणजे दिनांक ११ जून २०१४ रोजीच्या ‘लोकसता’त वीरेन्द्र तावडे याची ‘संघाशी जवळीक?’ असल्याच्या वृत्तात तर नाही ना असा संशय येतो आणि न्यायालयाच्या मताची अप्रत्यक्षपणे पुष्टी होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

● उत्तम जोगदंडकल्याण

ताशेऱ्यांचे गांभीर्य सरकारने ओळखावे

श्रद्धा निर्मूलन!’ हा संपादकीय लेख वाचला. डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटल्याच्या निकालात न्यायाधीशांनी ओढलेले ताशेरे फार गंभीर आहेत. तपास यंत्रणांनी अंतर्मुख होऊन पुन्हा या प्रकरणाचा तपास करण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील सरकारला अद्याप जर थोडीफार लाज असेल तर या प्रकरणी उच्च न्यायालयात सरकारने जावे आणि अतिशय निष्पक्षपातीपणे तपास पूर्ण क्षमतेने केला जावा. या संपादकीय लेखाने अनेकांचे डोळे उघडावेत ही अपेक्षा.

● संजय बनसोडे, इस्लामपूर

हेही वाचा >>> लोकमानस: मोदींसाठी ‘अपवादात्मक परिस्थिती’?

अशा कुटिलांचे समर्थन हा महाराष्ट्रदोह

श्रद्धा निर्मूलन!’ हा अग्रलेख (१३ मे ) वाचला. जातिभेद, लिंगभेद आणि अनिष्ट प्रथा परंपरांना विरोध करणाऱ्या महात्मा बसवेश्वरांच्या जन्मदिनी डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाच्या खटल्याचा निकाल लागला. या खटल्याकडे इतर खुनांच्या खटल्यांसारखे पाहता येत नाही, कोणी पाहूही नये. राज्यात जादूटोणाविरोधी कायदा संमत होण्यासाठी दाभोलकर यांचे प्राण जावे लागले. खरा धर्म जादूटोणा, भुतेखेते, जारणमारण, नवससायास… यांत नाही; हेच महाराष्ट्रातील संतपरंपरा सांगते. दाभोलकर यांना लक्ष्य करून मारणारे हे धर्मचक्र उलटे फिरवत आहेत. जे अशा कुटिलांच्या मागे छुप्या किंवा उघड रीतीने उभे आहेत किंवा त्यांचे प्रच्छन्न समर्थन करत आहेत; ते महाराष्ट्राशी नि:संशय द्रोह करीत आहेत.

● प्रभाकर दगाजी वारुळेमालेगाव (जि. नाशिक)

कोणत्या शक्ती हस्तक्षेप करतात?

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासासारख्या प्रकरणांत कोणत्या शक्ती हस्तक्षेप करतात आणि त्यांचे हेतू काय असतात हे उघड होणे महत्त्वाचे आहे. तपासात उणिवा जाणीवपूर्वक राहू दिल्या जात असतील तर पूर्ण न्याय तरी कसा मिळेल ? येणाऱ्या काळात या हत्येमागील हेतू, कट रचणारे मास्टर माईंड कोण हे समोर आले तरच या प्रकरणात न्यायाचे वर्तुळ पूर्ण होईल.

● अनिरुद्ध कांबळेनागपूर

हत्यासत्रामागील अदृश्य महाशक्ती

श्रद्धा निर्मूलन!’ (लोकसत्ता १३.५.२४) या अग्रलेखातून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खून खटल्याच्या निकालावर असमाधान व्यक्त करताना विवेकवादाबरोबरच श्रद्धेचे निर्मूलन होण्याचा धोका व्यक्त केला आहे. रस्त्यावरून चालणाऱ्या माणसावर अनाहूतपणे हल्ला करून ठार करणाऱ्या एखाद्या माथेफिरूप्रमाणे या गुन्हेगारांकडे पाहणे खेदजनक आहे. येथे दाभोलकरांप्रमाणेच एकामागोमाग अन्य तीन बुद्धिवाद्यांच्या हत्या झाल्या. व्यापक कटाशिवाय हे शक्यच नाही. या सर्व खटल्यांच्या कामकाजातील चालढकल, दिरंगाई, तपासातील त्रुटी आणि निकाल पाहता; हत्यासत्रामागील अदृश्य महाशक्तीच आरोपींनाही वाचवण्यासाठी कार्यरत असल्याचे प्रकर्षाने जाणवल्याशिवाय राहात नाही.

● किशोर बाजीराव थोरातनाशिक

केवळ निषेध पुरेसा नाही…

नरेंद्र दाभोलकरांचे सर्व विचार आपणाला पटोत ना पटोत, पण विरोधात बोलणाऱ्यांचा त्यांची हिंसा करून आवाज बंद करण्याच्या प्रवृत्तीचा बंदोबस्त करणे यासाठी आपण सरकारवर दबाव टाकला पाहिजेच. परंतु त्याहीआधी आपण सर्वांनीच समाजातील अशा घटकांना एकाकी पाडले पाहिजे. विचार आणि उच्चार स्वातंत्र्य हा लोकशाहीचा पाया आहे. नरेंद्र दाभोलकरांची जेव्हा हत्या होते, तेव्हा हे आपले सर्वांचे मूलभूत स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न असतो. तो ओळखून अशा प्रवृत्तींचा नुसता निषेध नव्हे, तर त्यांना एकाकी पाडणे हे आपल्याच हितासाठी आपण केले पाहिजे.

● पंकज लोंढेसातारा

गृहीतकांची चिकित्सा होत राहाणे गरजेचे

श्रद्धा निर्मूलन!’ हा अग्रलेख (१३ मे) वाचला. बचावपक्षाच्या वकिलांनी थेट न्यायालयात हत्येचेच प्रत्यक्ष समर्थन करण्याचे धाडस दाखवले (ज्यावर न्यायमूर्तींनी निकालपत्रात ताशेरे ओढले आहेतच), ज्यातून समाजातील एक भीषण वास्तव समोर आले. त्याआधीही अनेक तथाकथित सुशिक्षितांनी समाजमाध्यमांवरील, दिवाणखान्यांतील खाजगी म्हणता येतील अशा चर्चांत हत्येचे अप्रत्यक्ष समर्थन केले होतेच. दाभोलकरांविषयी सहानुभूती व्यक्त करतानाच दाभोलकरांनीच असे (प्रबोधनाचे काम) करायला नको होते असा त्या चर्चांचा सूर होता. कुणाचे कितीही शोषण झालेले चालेल, अगदी कुणाची हत्या झाली तरी चालेल पण देवाधर्माची चिकित्सा केलेली चालणार नाही, हे चुकीचे सामाजिक गृहीतक यातून अधोरेखित होत होते. खरे तर सर्व सामाजिक, भौतिक प्रगती गृहीतकांची चिकित्सा करूनच झाली आहे.

तसेही खरे तर दाभोलकरांनी कधीही श्रद्धेला, देवाधर्माला विरोध केला नाही, त्यांचा विरोध अंधश्रद्धांना, देवधर्मातील अनिष्ट रुढींना, त्याच्या नावाने होणाऱ्या शोषणाला होता. अनिष्ट सामाजिक गृहीतकांना आव्हान देण्याचे धैर्य समाजाच्या वतीने दाखवत ते समाजाच्या एकत्रित उन्नतीचा मार्ग शोधत होते. सामाजिक प्रगतीचा मार्ग प्रशस्त झाला की लोकांच्या अडचणी कमी झाल्याने देवाधर्माच्या दांभिक ठेकेदारांच्या जाळ्यात ते सहजासहजी ओढले जाण्याची शक्यता शेकडो पटीने कमी होते ही सनातन्यांची खरी अडचण अगदी तुकारामांच्या काळापासून आहे (आणि आजही हे आपले दुर्दैवी सामाजिक वास्तव आहे). सनातन्यांच्या पोलादी पकडीतून आपल्या उदात्त धर्माला सोडवून, त्यांनी स्वत:च्या स्वार्थासाठी उभारलेल्या कर्मकांडाच्या भिंती फोडून, धर्माच्या खऱ्या विचारांना त्यांनी पसरवलेल्या विषारी आणि विखारी जळमटांपासून मुक्त करण्याचा संकल्प (आणि संघर्ष) केल्यानेच दाभोलकरांच्या विचारांचा वारसा समाज म्हणून आपल्याला पुढे नेता येईल असे वाटते. लेखात गेल्या काही वर्षांत पसरलेल्या विखारी वातावरणात दाभोलकरांसारख्यांचे काही खरे नव्हतेच अशा आशयाचे वाक्य आले आहे, जे एका अर्थाने खरेच आहे, पण दुसऱ्या बाजूने समाजप्रबोधनासाठी आपले आयुष्य वेचून, प्रसंगी जिवाची बाजी लावताना मागेपुढे न पाहणारे अनेक दाभोलकर निर्माण होईपर्यंत दीर्घकालात समाजाचेच काही खरे नाही हे त्याहूनही मोठे सत्य आहे.

● प्रवीण नेरुरकरमाहीम (मुंबई)

सुधांशू त्रिवेदी म्हणतात त्याप्रमाणे…

आपच्या गुगली’ अन् ‘गॅरंटी’मुळे भाजपची कोंडी’ ही बातमी (लोकसत्ता- १३ मे) वाचली. केजरीवालांचा ‘७५ नंतर निवृत्तीचा मुद्दा’, निवडणूक मुद्दा म्हणून जरी ठीक असला तरी त्यामुळे भाजपची कोंडी कशी काय होऊ शकते? या मुद्द्याला शहा आणि सुधांशू त्रिवेदींनी योग्य उत्तर दिले आहे. हे सवाल-जबाब ४ जूनपर्यंत चालूच राहणार आहेत, परंतु यातून एक बाब स्पष्ट होत आहे ती म्हणजे, मोदींना पर्याय नाही. त्रिवेदी म्हणतात त्याप्रमाणे, ४ जूनला मोदीच निवडून येणार, हे अप्रत्यक्षपणे केजरीवालांनी मान्य केले नाही का? ● मधुकर पानट, तळेगाव दाभाडे

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Readers comments on loksatta editorial readers reaction on loksatta articles zws 70
Show comments