‘लालयेत पंचवर्षाणि…’ हा अग्रलेख वाचला. अनुच्छेद ३७० विधानसभेच्या मान्यतेविना अकस्मात रद्द करून व जम्मू-काश्मीरचे द्विभाजन करून तत्कालीन ‘धडाकेबाज’ भाजप सरकारने नेमके काय साध्य केले, याचा आढावा घेणे आवश्यकच आहे. लक्षावधी सैनिकांचा अहोरात्र पहारा असूनही अतिरेक्यांचा बंदोबस्त, शांतता व आर्थिक प्रगतीबरोबरच स्थानिकांचा सहभाग असलेल्या मुक्त व नि:पक्षपाती निवडणुका ही सारी २०१९ प्रमाणेच आजही दिवास्वप्ने वाटतात. काश्मीरपासून वेगळे काढूनही राज्याचा वा सहाव्या अनुसूचीचा दर्जा न दिल्याने लडाख नाराज आहे तर काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन असाध्यच आहे. अनुच्छेद ३७० नाट्यमय रीतीने रद्द करताना भाजप नेतृत्वाकडे काश्मीरबाबत काही निश्चित योजना होती का याविषयी शंका वाटावी एवढा निर्णयक्षमतेचा अभाव जाणवतो. अतिरेक्यांचे कठोरपणे निर्दालन करतानाच इतर सर्व हितसंबंधितांशी (यांत विरोधकही आले!) त्यांना अतिरेकी न समजता चर्चा, वाटाघाटी, विचारविनिमय व शेवटी विधानसभेची निवडणूक यातच या दीर्घकालीन समस्येवरील तोडग्याचा मार्ग असू शकतो. या दृष्टिकोनातून काश्मिरी जनता, नेते व विरोधकांशी ‘मित्रवदाचरेत्’ सर्वसमावेशक वर्तन करण्याची प्रगल्भता एनडीए सरकार व विशेषत: भाजपचे अहंमन्य श्रेष्ठी दाखवतील, की इस्रायलच्या नेतान्याहूंच्या ‘सर्व पॅलेस्टिनी तेवढे अतिरेकी’ छाप धोरणाचे अनुकरण करत अधिकाधिक कठोर वागतील यावर काश्मीरचे भवितव्य ठरेल. अन्यथा कालबाह्य झालेला अनुच्छेद ३७० अचानक रद्द करणे ही निव्वळ सनसनाटी पण अखेर निष्फळ कृती ठरेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा