‘अ-पक्षांचा जयो झाला…’ हा संपादकीय लेख (९ ऑक्टोबर) वाचला. काश्मीर व हरियाणा या दोन्ही राज्यांतील निवडणूक निकाल धक्कादायक लागले. विशेषत: हरियाणात भाजपविरोधी वातावरण दिसत असूनही त्या पक्षाने धीर न सोडता विजय खेचून आणला. उलट, जवळपास जिंकलेली लढाई हरण्याचे काँग्रेसचे ‘कसब’ राजस्थान व छत्तीसगडप्रमाणेच हरियाणातही पुन्हा एकदा दिसले. केवळ जाटकेंद्री व हुड्डाप्रभावित राजकारण, अतिआत्मविश्वास व स्वपक्षीयांतील टोकाचे संघर्ष ही याची प्रमुख कारणे असली तरी निदान उत्तर भारतात काँग्रेस भाजपला अजूनही एकट्याने पराभूत करू शकत नाही हे यामुळे अधोरेखित झाले. कदाचित याच्या मुळाशी भाजप व काँग्रेस यांच्यातील एक महत्त्वाचा फरक असावा. रावत, हुड्डा, गहलोत, कमलनाथ आदी प्रांतोप्रांतींच्या जुन्याजाणत्या व प्रसंगी केंद्रीय नेतृत्वालाही न जुमानणाऱ्या पक्षहानीकारक सुभेदारांना निवृत्त करत, नव्यांना वाव देत पक्षाचा प्रभाव कसा वाढवायचा या यक्षप्रश्नाचे उत्तर कित्येक निवडणुका हरल्यानंतरही राहुल गांधींना अद्याप मिळालेले नाही; उलट, मोदी-शहांनी मात्र अडवाणींपासून ते वसुंधरा राजेंपर्यंत अनेकांना अनेक निवडणुका जिंकल्यानंतरही निर्ममतेने दूर करून पक्षाला मनाप्रमाणे आकार दिला. असो. शेवटी, सर्व राजकीय पक्षांचे, विश्लेषकांचे व कलचाचण्यांचे होरे भुईसपाट करणाऱ्या या निकालांनी लोकशाहीत मतदारांना गृहीत धरता येत नाही हा धडा पुन्हा एकदा शिकवला आहे हे निश्चित. – अरुण जोगदेव, दापोली
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा