‘पडलेल्या पुतळ्याचा प्रश्न!’ हे संपादकीय (२८ ऑगस्ट) वाचले. शिवाजी महाराजांचा पुतळा पडणे ही केवळ एक घटना नाही, तर ते एक प्रतीक आहे, आपल्या राजकीय व्यवस्थेतील घाईगडबडीचे, गुणवत्तेच्या अभावाचे आणि इतिहास आणि संस्कृती यांच्याबद्दलच्या अनास्थेचे. महाराजांचा पुतळा उभारण्याची घाई होती, पण त्याची गुणवत्ता सुनिश्चित करण्याची काळजी नव्हती. त्यामुळेच हा पुतळा अवघ्या काही महिन्यांत कोसळला.
आपल्याला या घटनेतून काही शिकायचे असेल तर व्यवस्थेत काही मूलभूत बदल करावे लागतील. गुणवत्ता ही आपली प्राथमिकता असली पाहिजे. कोणतेही काम करण्यापूर्वी त्याची गुणवत्ता सुनिश्चित करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. तसेच, आपल्या इतिहास आणि संस्कृतीबद्दल आदर बाळगणला पाहिजे. हा एक दुर्दैवी प्रसंग आहे. पण या प्रसंगातून आपण एक धडा घेण्याची गरज आहे. स्वत:त आणि व्यवस्थेत सुधारणा करणे आवश्यक आहे. आपण जर या संधीचा योग्य उपयोग केला तर शिवाजी महाराजांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने आपण एक पाऊल पुढे जाऊ शकतो.
–अजित लक्ष्मणराव तरवटे, वाडीदमई (परभणी)
संरक्षण दलांना यात ओढू नका
‘पडलेल्या पुतळ्याचा प्रश्न’ हा संपादकीय लेख (२८ ऑगस्ट) वाचला. मुख्यमंत्री महोदयांनी घटनेची जबाबदारी नौदलावर ढकलणे आक्षेपार्ह आहे. तसेच शिक्षणमंत्र्यांनी यातून काही अधिक चांगले घडण्याची वर्तवलेली भविष्यवाणी हा कोडगेपणाचा कळस आहे. महाराजांचा पुतळा, त्यासाठी लागणारी जागा आणि इतर आवश्यक बाबी जर सरकारने निश्चित केल्या असतील तर नौदल कसे दोषी? नौदल दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन राजकोट किल्ला परिसरात करण्याची जबाबदारी नौदलाची होती ती त्यांनी यशस्वीपणे पार पाडली असे त्यामध्ये सहभागी माजी नौसैनिकांचे म्हणणे आहे. स्वातंत्र्यानंतर भारताच्या सागरी किनाऱ्यावर नौदलाने काही इमारती, कोस्टल बॅटरीज (तोफा), टेहळणीसाठी मनोरे, कारवारनजीक आशिया खंडातील सर्वांत मोठा नौदल तळ आणि १९७१ युद्धात जलसमाधी मिळालेल्या खुखरी जहाजाचे दीव येथील स्मारक असे विविध प्रकल्प उभारले. सागर किनारी ४५ किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणारे वारे हे अगदी सामान्य आणि नियमित आहेत. वर्षानुवर्षे ही बांधकामे सागरी लाटा आणि वादळवारे झेलत दिमाखात उभी आहेत. नौदलाकडे ओशनोग्राफी, हैड्रोग्राफी आणि हवामान खात्याचे तज्ज्ञ आहेत त्यांचाही सल्ला घेतला होता का? सैन्यदलांसाठी इमारतींचे बांधकाम मिलिटरी इंजिनीअरिंग सर्व्हिसतर्फे केले जाते. आतापर्यंत उपलब्ध माहितीवरून केवळ मी आणि माझ्याहस्ते या अट्टहासापायी राज्य सरकारने घाईगडबडीत मिळेल तो मर्जीतील शिल्पकार आणि बांधकाम कंत्राटदार यांच्याकडून एक तकलादू स्मारक निर्माण केले. किमान संरक्षण दलांना यात ओढू नका.
–अॅड. वसंत नलावडे, सातारा (माजी नौसैनिक)
हेही वाचा : लोकमानस: निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरील अगतिकता
अल्प अनुभव, त्यात दुर्लक्ष
देखणी आणि चिरकाल टिकणारी कोणतीही शिल्पकृती अस्तित्वात येण्यासाठी सर्व बाबींचा विचार करावा लागतो. त्यासाठी पुरेसा वेळ द्यावा लागतो. प्रसिद्ध शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर ऊर्फ नानासाहेब करमरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास सात वर्षे काम केल्यानंतर १९२८ रोजी माझगाव डॉक येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा धातूचा पुतळा उभारण्यात आला. हा पुतळा देखणा आणि शौर्यभान जागे करणारा आहे. मालवण येथील पुतळा हा मात्र तीन महिन्यांत उभारण्यात आला. अनुभव अल्प असलेल्या मूर्तिकाराला ही जबाबदारी घेताना संबंधित सर्व गोष्टींचा विचार होणे आणि यथायोग्य वेळ घेऊनच कार्य सिद्धीस नेले जाणे अत्यावश्यक होते पण ते झाले नाही. शेकडो, हजारो कोटींचे पुतळे उभारण्याची कंत्राटे द्यायची आणि आम्हीच अस्मिता जपणारे, असा आविर्भाव आणून प्रत्येक गोष्टीचे बाजारीकरण करून आपले प्रतिमासंवर्धन करायचे यापलीकडच्या विचारांचा अभाव विद्यामान सत्ताधाऱ्यांमध्ये पदोपदी दिसला.
–परेश संगीता प्रमोद बंग, मूर्तिजापूर (अकोला)
रयतेचे नसलेले आधुनिक राजे
‘पडलेल्या पुतळ्याचा प्रश्न!’ हा अग्रलेख (२८ ऑगस्ट) वाचला. छत्रपती हे रयतेचे राजे होते. त्यांनी समाजातील अठरापगड जातींच्या लोकांना बरोबर घेऊन स्वराज्याचे स्वप्न पूर्ण केले. स्वराज्याचे रूपांतर सुराज्यात केले. कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेतली. महिलांना विशेष मान दिला. आजचे सर्वपक्षीय नेते महाराजांचे नाव उठताबसता घेतात, पण कुणाच्याही वर्तनात, कार्यपद्धतीत महाराजांचा एकही गुण दिसत नाही. स्वातंत्र्यानंतर संस्थाने खालसा झाली. देशात लोकशाही अवतरली. खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य स्थापन होईल अशी अपेक्षा होती; परंतु आज रयतेला पाच वर्षांतून एकदाच मान मिळतो.
लोकशाहीअंतर्गत नवीन प्रकारची राजेशाही सुरू झाली. सर्व काही नवीन राजे आणि त्यांचे बगलबच्चे व वारसदार यांनाच मिळावेत यासाठी आटापिटा सुरू आहे. गरज नसताना नवीन कामे काढली जातात, त्यांचा ठेका या ‘राजां’कडेच राहील याची काळजी घेतली जाते. टक्केवारी निश्चित होते. असे असताना कामाचा दर्जा सुमार असल्यास नवल ते काय? महिलांवरच्या अत्याचाराचेदेखील सोयीनुसार राजकारण केले जाते. महाराजांनी रयतेच्या पैशांची अशी उधळपट्टी करणाऱ्यांना किंवा महिलांकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना शासन केले असते. पडलेल्या पुतळ्यांमागे ‘मी’पणा हे कारण आहे, तसेच खोलवर मुरलेली भ्रष्टाचाराची कीड हेदेखील तेवढेच सबळ कारण आहे.
–निशिकांत मुपीड, कांदिवली (मुंबई)
हेही वाचा : व्यक्तिवेध: स्वेन गोरान एरिकसन
अन्यथा भविष्य अंधकारमय!
‘घागर उताणी रे’ हा लेख (२४ ऑगस्ट) वाचला. गेली कित्येक वर्षे आपण महाराष्ट्राबद्दल त्याच त्या गोष्टी ऐकत आलो आहोत. आपली मुले यूपीएससीत चमकत नाहीत, आपण उद्याोग- व्यवसायांत मागे असतो इत्यादी. त्यात आता माहाराष्ट्रातील व्यवसाय अन्य राज्यांत चालले आहेत, ही आणखी एक भर पडली आहे. यातील राजकारणाचा भाग सोडला तरी आपल्यासुद्धा काही चुका असतीलच. त्याविषयी आपण आत्मपरीक्षण कधी करणार? एकेकाळी आणि काही अंशी आजसुद्धा औद्याोगिक आणि वैचारिकदृष्ट्याही देशातील सर्वांत प्रगत राज्यांमधील एक अशी महाराष्ट्राची ओळख होती आणि आहे. महाराष्ट्र आज तसा राहिला आहे, असे वाटत नाही. मात्र बऱ्याच अंशी याला राजकारणी जबाबदार आहेत, असे म्हणण्यास भरपूर वाव आहे. ते फक्त कुरघोडीचे राजकारण करत आहेत. राज्याच्या भवितव्याबद्दल त्यांना काही वाटत नाही. एकूण सध्या महाराष्ट्रात राजकीय पटलावर पूर्णपणे गोंधळाचे वातावरण आहे. या सर्व गोष्टींवर लवकरात लवकर विचार करून त्यावर योग्य त्या उपाययोजना सर्वपक्षीयांनी आणि विविध संघटना, सामान्य नागरिक यांनी कराव्यात. अन्यथा महाराष्ट्राचा भविष्यकाळ फारसा आशादायक वाटत नाही.
–सुनीता गोसावी, पुणे</strong>
शिंदेंना असा विश्वास का वाटतो?
‘महायुतीच विधानसभेची हंडी फोडणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास,’ ही बातमी (लोकसत्ता- २८ ऑगस्ट) वाचून नवल वाटले. शिंदे हे कशाच्या जोरावर सांगत आहेत, असा प्रश्न पडतो. अतिआत्मविश्वास कधी जमिनीवर आणेल, सांगता येत नाही. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांत याचा ताजा अनुभव भाजपला आला. ‘अबकी बार चारसो पार’ची भाषा करणाऱ्यांना, मतदारांनी धडा शिकवला. शेवटी नाइलाजाने भाजपला एनडीएबरोबर सत्ता स्थापन करावी लागली.
हेही वाचा : संविधानभान: राष्ट्रपतींचा अध्यादेश
या वेळेस विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठी, सत्ताधाऱ्यांनी एक नवा मर्ग शोधून काढला आहे. ‘माझी लाडकी बहीण,’ या गोंडस नावाखाली एक योजना राबवली आहे. बहिणींना पैसे देऊन, त्या मोबदल्यात मते विकत घेण्याचा हा प्रकार आहे. अर्थात महिलांनीदेखील, या योजनेला भुलून, अंधपणे मतदान करणे घातक ठरू शकते. दुसरीकडे फडणवीस ‘अडीच वर्षांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आम्ही, पापाची हंडी फोडून, राज्यात एक पुण्याची हंडी उभारली,’ असे म्हणाले होते. ठाकरे सरकारचा कारभार सुरळीत सुरू असताना, फडणवीस यांनी ठाकरे गटातील एकनाथ शिंदे तसेच राष्ट्रवादीतील अजित पवार व इतर काहीजणांना फोडून, गैरमार्गाने सत्ता स्थापन केली. वरून पक्ष आमचा, चिन्हही आमचेच अशी दादागिरी केली. अर्थात त्याला निवडणूक आयोगानेदेखील साथ दिली. याला पुण्य समजायचे की पाप?
–गुरुनाथ वसंत मराठे, बोरिवली (मुंबई)