‘‘अ’ ते ‘नी’!’ हा अग्रलेख, ‘सेबी’ने अनिल अंबानींवर कारवाई का केली?’ हे ‘विश्लेषण’ आणि ‘हेतुपुरस्सर कर्ज बुडवे’ हा लेख (२६ ऑगस्ट) वाचला. ‘सेबी’ने अनिल अंबानींवर केलेली कारवाई अत्यंत अपुरी, केवळ दिखाऊ वाटावी अशी, सौम्य, बोटचेपी आहे, हे उपलब्ध माहितीवरून कोणालाही सहज कळेल. सेबी स्वत:च आपल्या आदेशात म्हणते, की ‘अनिल अंबानी यांनी त्यांच्या पदाचा आणि रिलायन्स होम फायनान्समधील त्यांच्या महत्त्वपूर्ण अप्रत्यक्ष भागधारकतेचा वापर फसवणुकीसाठी केला. कमी मालमत्ता, कमकुवत रोख प्रवाह, निव्वळ संपत्ती किंवा महसूल नसलेल्या कंपन्यांना शेकडो कोटींची कर्जे मंजूर करताना कंपनीचे व्यवस्थापन आणि प्रवर्तक ‘निष्काळजीपणा’ होते.’ यामध्ये, फसवणूक हा फौजदारी गुन्हा आहे, याकडे साफ दुर्लक्ष झालेले / केलेले दिसते. आणि मुळात अशी कर्जे देताना जे काही झाले, ते निष्काळजीतून झाले, हे कोणी सांगितले? मुद्दाम, जाणीवपूर्वक केलेली पैशांची अफरातफर, पैसा कंपनीच्या फायद्यासाठी न वापरता, जिथे तो हमखास बुडेल, अशा ठिकाणी वळवणे ही निष्काळजी नसून, हेतुपूर्वक केलेला गुन्हा आहे. अनिल अंबानी यांनी अशा तऱ्हेने रिलायन्स होम फायनान्सचा अन्यत्र वळवलेला निधी आठ हजार ८०० कोटी रुपयांच्या घरात आहे. हे पैसे त्यांनी किंवा त्यांच्या सग्यासोयऱ्यांनी गिळंकृत केले आहेत, ते त्यांच्याकडून वसूल केले गेले पाहिजेत. वसूल होऊ न शकल्यास त्यांना तुरुंगवास व दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले पाहिजे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा