‘लोकसत्ता’च्या बातम्यात ८ ते १० नोव्हेंबरच्या बातम्यांतून ‘बटेंगे तो कटेंगे’ आणि ‘एक है तो सेफ है’ या अनुक्रमे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभांतील ताज्या घोषणा वाचल्या. वरवर पाहता या दोन्ही घोषणा एकमेकांच्या विरुद्ध आहेत, असे वाटेल. जसा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा समज झाला. पण या दोन्ही घोषणा एकमेकांना पूरक आहेत. ‘बटेंगे तो कटेंगे’ म्हणजे हिंदू जर विभागला गेला तर त्याचा विनाश होईल व मुस्लीम डोक्यावर बसतील; तर ‘एक है तो सेफ है’ ही मोदींची घोषणा म्हणजे जर जातीगणना झाली तर वेगवेगळ्या जाती आपले अधिकार मागतील. त्यामुळे उच्चवर्णीयांना जे मुळात अल्पसंख्य आहेत, ते ह्यअनसेफह्ण होतील, जी संघाला भीती आहे, ती त्यात अनुस्यूत आहे.
त्यामुळे धार्मिक विभाजन भाजपला मान्य आहे, हे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिश्व सरमा यांच्या अब्दुल, अहमद विरुद्ध हिंदू नावे यावरून जाहीर आहे. त्यांच्या इतक्या आगलाव्या भाषणावर निवडणूक आयोग काही करणार नाही, हे मान्य, महाराष्ट्रातील भाजप नेतृत्व गप्प आहे याचा अर्थ काय होतो?
भाजपला हिंदू मतांमधले विभाजन नको आहे, ती त्यांची दुखरी नस आहे आणि नेमकी तीच राहुल गांधी वारंवार दाबून भाजपला हैराण करताहेत. त्यामुळेच ‘काँग्रेसशासित राज्ये शाही परिवाराची एटीएम’ इतक्या खालच्या पातळीवर जाऊन पंतप्रधान टीका करतात. त्यांना का विचारले जात नाही की तुमच्या हातात ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्ससारखी आयुधे असताना ही एटीएम चालत असतील तर तो तुमचा नाकर्तेपणा आहे.
या निवडणुकीत एकच फरक आहे तो म्हणजे ‘मोदी की गॅरंटी’चा थिल्लरपणा बंद झाला आहे.
● सुहास शिवलकर, पुणे
हेही वाचा >>> लोकमानस: धोरणांचा प्रचार झालाच नाही
पंतप्रधानांना कशाची भीती वाटते?
‘एक है, तो सेफ है’ ही घोषणा देशाच्या पंतप्रधानांनी नाशिकच्या विधानसभा मतदारसंघातील प्रचारसभेत दिली. याआधी उ.प्र.च्या मुख्यमंत्र्यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ अशी घोषणा देऊन मतदारांना मुस्लिमांच्या विरोधात जागे (?) करण्याचा प्रयत्न करून पाहिला. देशाच्या पंतप्रधानांकडून इतकी भीती पसरवणारी घोषणा आजवर कोणी दिली नव्हती. वास्तविक ‘देशातील आणि महाराष्ट्रातील जनतेचे संरक्षण करण्यास केंद्र सरकार प्रबळपणे सिद्ध आहे’ ही ग्वाही देणे सयुक्तिक असताना, बहुसंख्य समाजाला २० टक्के लोकसंख्येची भीती दाखवून घाबरवत ठेवणे हे पंतप्रधानांना शोभत नाही. मोदीजी स्वत: भयभीत झाले आहेत काय? मुस्लीम समाजाकडून देशद्रोही कारवाया होत असतील तर त्यांना आपण सर्वच एकत्रितपणे पायबंद घालू, पण या अशा घोषणांमुळे जनतेला सतत दबावाखाली ठेवल्यास तुमचे काम काय राहील? यात धार्मिक किंवा जमातीच्या विरोधात प्रचार होतो आहे असा कोणी आक्षेप घेतला तर? आपण एक आहोतच हे पंतप्रधानांनी केवळ निवडणुका आहेत म्हणून पुन्हा बिंबवायची गरज नाही.
● मिलिंद कोर्लेकर, ठाणे
काय काय बंद करणार?
उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाने राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे की, ‘पुरुषांनी शिंप्याच्या दुकानात महिलांचे मोजमाप घेऊ नये, त्यांनी स्त्रीचे केस कापू नये किंवा तिला व्यायामशाळेत प्रशिक्षण देऊ नये’ (बातमी : लोकसत्ता – १० नोव्हेंबर) ही मागणी करण्याचे कारण म्हणजे, ‘महिलांचे संरक्षण करणे आणि सहेतुक स्पर्श व पुरुषांचा वाईट हेतू रोखणे’. उत्तर प्रदेशमधील सध्याचे वातावरण पाहता हा प्रस्ताव मान्य होईल असे मानायला नक्कीच जागा आहे.
तसे झाल्यास पुरुष शिंप्यांना धंदा बंद करावा लागेल किंवा महिलेला मापे घ्यायला ठेवावे लागेल. (सध्या बहुतांश महिला ब्लाऊज शिवायला देताना जुना ब्लाऊज मापाला देतात हा भाग वेगळा). पुरुष स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांनी स्त्रियांना तपासणे बंद करावे लागेल. मुलामुलींना सहशिक्षण देणाऱ्या शाळा व कॉलेजे बंद करून मुलींसाठी वेगळे शाळा व कॉलेजे उघडावी लागतील. जसजसे ‘यश’ मिळत जाईल तसतशी ही यादी हळूहळू वाढू शकते. सरतेशेवटी स्त्रियांना घराबाहेर पडू नका म्हणून आदेश काढला जाईल, कारण ‘पुरुषांची नजर वाईट असते’.
● निशिकांत मुपीड, कांदिवली (मुंबई)
हेही वाचा >>> लोकमानस: संशय आणि असुरक्षिततेचा परिणाम
त्यापेक्षा पुरुषांचे वर्तन सुधारा…
उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सल्ल्याची बातमी वाचून आठवले :पूर्वी जेव्हा मुली प्रथम शिकू लागल्या तेव्हा मुले आणि मुली एकत्र असल्यास मुली शाळेत यायला तयार नसत म्हणून निराळ्या कन्याशाळांची सोय केली होती. म्हणजे आपली प्रगती आता उलट्या दिशेने चालली आहे असे म्हणावे लागेल. मुलांचे /पुरुषांचे वर्तन मुलींच्या किंवा स्त्रियांच्या प्रति सुधारेल असे बघायचे का अशा काही चुकीच्या मागण्या करायच्या. काही दिवसांनी मुलामुलींना चालण्यासाठी रस्तेही वेगळे मागितले जातील. स्त्रियांच्या सुरक्षेसाठी मागण्या नक्कीच कराव्यात पण ही पद्धत ती नव्हे.
● नीता शेरे, दहिसर पूर्व (मुंबई)
समानता प्रत्यक्षात उतरणे दूरच…
‘‘तो’ परत आलाय…’ आणि ‘अनर्थमागील अर्थ’ हे आधीचे दोन अग्रलेख न वाचता ‘तो आणि त्या’ हे ट्रम्पविजय आख्यानातले अखेरचे संपादकीय कोणी वाचले तर रडीचा डाव छापाचे भाष्य वाटू शकेल. महत्त्वाच्या उतरत्या क्रमाने हे शेवटी येणे यथोचित होते. या मुद्द्याच्या अनुल्लेखाने विवेचन काहीसे अपुरे राहिले असते आणि स्वत: सिद्ध मानल्या गेलेल्या पुरुषी वर्चस्वाच्या दृष्टिकोनाला नकळत बळ मिळाले असते; त्यामुळे देखील हा उपसंहाराचा लेख यथोचित वाटला. फेमिनिझम तत्त्व म्हणून मान्य करणे आणि तो मनोमन पटून आचरणात आणणारे पुरुष कुटुंबात काय आणि समाजात काय सुभाषितातल्या ‘भवति वा न वा’ यादीत पहिल्या क्रमांकाने नोंदण्यासारखेच असतील. आगरकरांनी बोलके सुधारक आणि कर्ते सुधारक असा भेद केला होता तसे स्त्रीपुरुष समानता व्यवहारात उतरवणारे ‘कर्ते पुरुष’ अगदी पुढारलेल्या देशातदेखील कमीच आढळतील. सर्वोच्चपदी इंदिरा गांधी आरूढ होऊ शकल्या त्यामुळे आपण भारतीय तसे आहोत हा फुकाचा डंका पिटण्यात काही अर्थ नाही हे या संदर्भात मुद्दाम सांगायलाच हवे. सारांश, समानता पटणे, पचणे आणि प्रत्यक्षात उतरणे ही गोष्ट अजून वाक्प्रचारातल्या दिल्ली इतकीच दूर आहे!
● गजानन गुर्जरपाध्ये, दहिसर पश्चिम (मुंबई)
सांस्कृतिक मागासलेपण!
‘‘तो आणि त्या’’ या अग्रलेखातील जे डी व्हान्स, अमेरिकेचे होऊ घातलेले उपाध्यक्ष यांचे, ‘‘डेमोक्रॅटिक पक्ष धनाढ्य आणि मुले बाळे नसणारे लोक चालवतात’’ हे वाक्य वाचताना माझ्या समोर अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, जय ललिता, उमा भारती ही नावे समोर आली. आजपर्यंत भारतीय राजकीय अवकाशात या नेत्यांच्या राजकीय भूमिकेविषयी विरोध, चर्चा झाली परंतु कोणी व्हान्स यांच्यासारखे असंस्कृत विधान केल्याचे आठवत नाही. आज जगभर अनेक देशात विवाहित तरुण-तरुणी विचारपूर्वक मुले जन्मास न घालण्याचा निर्णय घेत आहेत, त्यांचे प्रमाण लक्षणीय वाढत आहे. या परिप्रेक्ष्यात अमेरिकेसारख्या प्रगत देशात असे विधान केले जावे हे त्या देशाच्या भौतिक प्रगती पलीकडे इतर गोष्टी अजूनही मागासलेल्या याचे निर्देशक!
● सुखदेव काळे, दापोली(रत्नागिरी)
मोदी, ट्रम्प यांची ‘आक्रमकता’ काळानुरूप
पी चिदम्बरम यांचा ‘आता निवडणुकीचे ट्रम्प प्रारूप?’ आणि विनोद तावडे यांचा‘‘दुसरे ट्रम्पपर्व आणि भारत’ हे दोन्ही लेख मतांचा विरोधाभास दाखवणारे असणार हे साहजिकच आहे. पण एकंदर जगभरच्या नेत्यांमध्ये ‘आक्रमकता’ – मग ती विकासकामांची असो, सुरक्षाविषयक असो, जी वाढत आहे, ती काळाची गरज आहे. त्याबाबतीत ट्रम्प आणि मोदी यांचे सौहार्दपूर्ण संबंध भारतीय जनतेसाठी, चीनला धडा शिकवण्यासाठी, आयात-निर्यात व्यापारात लवचीकता आणण्यासाठी, अमेरिकेतील भारतीय नागरिकांविषयीचा हळुवार कोपरा जपण्यासाठी, सुरक्षासाधनं व संबंधित तंत्रज्ञान मिळवण्यासाठी आजकाल महत्त्वाचे ठरू लागले आहेत. भारतातील विरोधक मात्र मोदींनी ट्रम्प यांचे तात्कालिक असभ्यता आणि संयमाची कथित धरसोड हे गुण जोपासू नयेत असे म्हणत राहणार. पण हे दोन्ही गुण हे स्थल, काल, व्यक्तींसापेक्ष आहेत हे लक्षात घ्यायला पाहिजे.
● श्रीपाद पु. कुलकर्णी, पुणे