‘‘ममीफाइड’ मध्यमवर्ग!’ हे संपादकीय (२ डिसेंबर) वाचले. यूपीए सरकारच्या ‘मनरेगा’ योजनेची तुलना ‘लाडकी बहीण’ या योजनेशी होऊ शकत नाही. मनरेगासंदर्भात सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या नॅशनल अॅडव्हायझरी कमिटीमध्ये हर्ष मंदर, एम. एस. स्वामीनाथन, अरुणा रॉय, माधव गाडगीळ यांसारख्या आपापल्या क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती होत्या. ही योजना जगभर नावाजली गेली. या योजनेअंतर्गत खेड्यातील गरीब मजुरास घराजवळच्या परिसरात वर्षभरात १०० दिवस हक्काच्या मजुरीची हमी दिली जाते. त्यातून आजवर ग्रामीण भागातील अनेक आवश्यक प्रलंबित कामे पार पडली आहेत. आज मनरेगा ही जगातील सर्वांत मोठी रोजगार-हमी देणारी योजना ठरली आहे. जगभर नावाजल्या गेलेल्या या उपक्रमाची खुद्द वर्ल्ड बँकने २०१४ मध्ये प्रशंसा केली होती. कोविडच्या संकटकाळी या योजनेने लाखो कुटुंबांना उदरनिर्वाहाचे साधन दिले. दरवर्षीच्या राष्ट्रीय अर्थसंकल्पात मनरेगा योजनेसाठी तरतूद केली जाते. सरकारे आली, गेली परंतु ही योजना सुरूच आहे. निवडणुकीतील प्रलोभन म्हणून, कुठलीही आगाऊ आर्थिक तरतूद नसताना जाहीर केलेली फुकट रेवड्या वाटणारी ‘लाडकी बहीण’ योजना आणि मनरेगाची तुलना होऊ शकत नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा