‘डॉ. आंबेडकरांची संघ शाखा भेट प्रेरक’, ही ‘पहिली बाजू’ (१४ जानेवारी) वाचली. ज्या ‘केसरी’मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांच्या निधनाची बातमी छापली नव्हती, त्यातच बाबासाहेबांच्या संघ शाखा भेटीची बातमी छापून यावी; हा एक योगायोगच! शंभरी पूर्ण करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघास या चार ओळींच्या बातमीचे किती अप्रूप असेल हे समजू शकते. बाबासाहेबांच्या संदर्भातील संघासाठीचा केसरीतील हा अत्यंत मौल्यवान पुरावा सापडला नसता तरी, संघाने समरसतेचे आणि ‘सकल हिंदू बंधू बंधू’चे काम थोडेच सोडले असते? हा लेख म्हणजे चार ओळींच्या संदर्भावर किती उत्तम प्रकारे मोठा लेख लिहिता येतो, याचा वस्तुपाठ आहे!

जातीच्या भिंती पाडून समाज जोडण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शंभर वर्षांपासून करीत आला असेल, तर मग १९५६ साली बाबासाहेब आपल्या अनुयायांसह परधर्मात गेले त्याबद्दल संघाचे काय मत आहे? त्यानंतर हिंदू धर्मात उरलेले जे पूर्वाश्रमीचे अस्पृश्य आहेत; जे स्वत:ला हिंदू म्हणवून घेतात, निदान त्यांच्यातली आपसातील जातीयता घालविण्यासाठी किंवा त्यांना एकत्र आणण्यात संघाने १९५६ नंतर तरी कोणते ठोस कार्य केले? खालच्या जातीतील हिंदूंमधीलच दरी संघ गेल्या शंभर वर्षांत मिटवू शकला नसेल तर तथाकथित उच्चवर्णीय हिंदू आणि खालच्या जातीतील हिंदू लोकांमध्ये समरसता कधी प्रस्थापित होणार आहे; याचे उत्तर संघाने शंभरीत तरी द्यावे.

हेही वाचा >>> अन्वयार्थ : गोड बोलण्यापेक्षा, न्यायाचे बोला!

कराडमधील काही स्वयंसेवकांनी बाबासाहेबांना निमंत्रण दिले म्हणून ते संघ शाखेत गेले होते; हे आता या पुराव्यांवरून सिद्ध झालेले आहे. यजमानांचा अनादर करण्याची आपली संस्कृती नसल्याने बाबासाहेब तेव्हा म्हणालेही असतील की, ‘काही बाबतीत मतभेद असले तरी मी या संघाकडे आपलेपणाने पाहतो.’ बाबासाहेब जर संघाकडे इतक्याच ‘आपलेपणाने’ पाहात असतील तर त्यांनी (संघाच्या स्थापनेच्या एक वर्ष आधी) २४ सप्टेंबर १९२४ रोजी स्थापन केलेले समता सैनिक दल बरखास्त करून त्यातील स्वयंसेवकांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांत नसते का पाठवले? जर बाबासाहेबांना २ जानेवारी १९४० रोजी संघाच्या शाखेबद्दल इतका आपलेपणा वाटला होता, तर बाबासाहेब त्यानंतर त्यांच्या हयातीत संघाच्या कोणत्याही शाखेवर कधीच का गेले नसतील?

डॉ. आंबेडकरांच्या खऱ्या अनुयायांना माहीत आहे की, बाबासाहेबांचे अपहरण करणे म्हणजे बाबासाहेबांचे विचार स्वीकारणे असते आणि समग्र बाबासाहेब स्वीकारणे संघाला कधीच झेपणारे नाही. जर संघाला बाबासाहेबांबद्दल इतकीच टोकाची आत्मीयता असेल आणि ते त्यांना गांधीजींइतकेच प्रात:स्मरणीय मानत असतील तर त्यांनी त्यांच्या स्वयंसेवकांना बौद्धिकातून (त्यांच्या बुद्धीला) झेपतील अशी ‘बाबासाहेबांची निवडक विचार मौक्तिके’ सांगण्याची गरजच काय? त्यापेक्षा त्यांना समग्र बाबासाहेब झेपतील तसे हप्त्याहप्त्याने सांगावेत. शिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हिंदू कोडबिलाला विरोध का केला होता आणि संघाच्या स्वयंसेवकांनी बाबासाहेबांचा पुतळा का जाळला होता; हेही समजावून सांगावे.

संघ विचारांच्या नसलेल्या एखाद्या नेत्याच्या अपहरणाचा आरोप फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरच का होतो; याबद्दल संघाने आत्मपरीक्षण आणि त्यांच्या भाषेत चिंतन करण्याची गरज आहे. लेखकाने ‘गावकी आणि भावकी’चे यमक जोडून जी वैचारिक म्हणून शाब्दिक गंमत केलेली आहे, त्याबद्दल लेखकाचे खऱ्या आंबेडकरवाद्यांविषयीचे आकलन कमी पडले असावे, आंबेडकरांच्या खऱ्या अनुयायांनी आंबेडकरांच्या प्रेरणेतून गावकी कधीच सोडलेली आहे आणि भावकी अर्थात दुष्मनी निर्माण केलेली नाही!

● शाहू पाटोळेखामगाव (धाराशीव)

जातिनिष्ठा नष्ट केल्या की पुष्ट केल्या?

डॉ. आंबेडकरांची संघ शाखा भेट प्रेरक’ या लेखात (लोकसत्ता, १४ जानेवारी) सकल हिंदू बंधू बंधू’ या विचाराने अत्यंत प्रामाणिकपणे जातीच्या भिंती पाडून समाज जोडण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापनेपासून करीत आला आहे, असे म्हटले आहे. पण मग गोळवलकरांच्या काळात संघाने चातुर्वर्ण्य व्यवस्थेचे केलेले खुले समर्थन व संविधानाऐवजी मनुस्मृतीचा केलेला पुरस्कार याचे काय? महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह (२० मार्च १९२७), नाशिक येथील काळाराम मंदिराच्या प्रवेशाचे आंदोलन (२ मार्च १९३०) या अस्पृश्यांसाठी सार्वजनिक ठिकाणे खुली व्हावीत या आंबेडकरांच्या आंदोलनांत संघाची भूमिका नक्की काय होती? बाबासाहेबांनी ‘हिंदू कोड बिल’ मांडले तेव्हा त्या बिलाला कुणी विरोध केला? चवदार तळ्यावर आंबेडकरांनी सत्याग्रह केल्यानंतर तेथे शास्त्रोक्त विधी करून तळ्याचे शुद्धीकरण केले, ते कोणी? तेव्हा संघाने विरोध केला का? जेव्हा आंबेडकरांना आणि तथाकथित अस्पृश्यांना खरी गरज होती तेव्हा काहीच विशेष न करता आता मात्र स्वत:ची गरज म्हणून आंबेडकरांच्या वारशाशी जवळीक साधू पाहायची यात नक्की कुणाचा स्वार्थ साधला जाणार आहे?

● प्रवीण नेरुरकरमाहीम (मुंबई)

सत्तेच्या उद्दिष्टाने पछाडलेले!

दबंग… दयावान?’ हा अग्रलेख वाचला. शिर्डी येथील महाअधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना ‘पंचायत ते पार्लमेंट भाजपचा(च) अंमल असायला हवा’ असे बजावले आणि त्यात काही वावगे वाटत नाही. भाजप हा एक असा पक्ष आहे की जो हरला म्हणून रडत बसत नाही आणि जिंकला म्हणून गाफील राहत नाही आणि हे पक्षीय गुण अन्य पक्षीयांनी घेण्यासारखे आहेत. अमित शहा हे संपूर्ण भारतात भाजपची सत्ता हवी या उद्देशाने पछाडलेले आहेत. त्यामुळेच ‘इतके समर्थ व्हा की दगाबाजी करण्याची कोणाची हिंमत राहणार नाही’ असे वक्तव्य ते करू शकतात! अशी त्यांची एकंदर धडकी भरवणारी प्रतिमा निर्माण करण्यात ते यशस्वी झाले आहेत. कारण त्यामागे त्यांच्या कार्यकर्त्यांची महत्त्वाकांक्षा आहे. महत्त्वाकांक्षी कार्यकर्ते घडविणे आणि त्यांचे मनोबल वाढवणे हे मोठ्या नेत्याचे उद्दिष्ट असले पाहिजे आणि या महाअधिवेशनातून त्यांनी तेच करण्याचे काम केले आहे, असे म्हणावे लागेल!

● अनिरुद्ध बर्वेकल्याण

उर्वरितांना हातपाय हलवावे लागतील

दबंग… दयावान?’ हे संपादकीय वाचले. अर्धी शिवसेना आणि अर्धी राष्ट्रवादी या पक्षांच्या नेत्यांनी एकत्रित येऊन दबाव पाडण्याचा प्रयत्न केला तरच निभाव लागेल. त्यांना आता तरी हातपाय हलवावेच लागतील. नाही तर पुढील काळात महामंडळांच्या अध्यक्षपदावरच भूक भागवावी लागेल. केंद्रात स्वबळावर सत्ता नसताना दोन धोंड्यांवर पाय रोवून भाजप उभा राहिला आहे. पंचायत ते पार्लमेंट ‘एक पक्ष, एक लक्ष्य’ साध्य करताना कोणी दगाबाजाने पुनर्जीवित होण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्यामागे तपास यंत्रणांचा ससेमिरा लावण्यात येईल. एक गोष्ट भाजपकडून सर्वच पक्षांना घ्यावी ती म्हणजे पक्षबांधणी आणि शिस्त.

● श्रीनिवास डोंगरेदादर (मुंबई)

उत्पादक घटकांच्या मालकीआधारे अर्थकारण

मराठवाड्यातील अस्वस्थतेची पाळेमुळे’ हा लेख (१४ जानेवारी) वाचला. तेथील मागासलेपणाचे मूळ हे भांडवली प्रक्रियेच्या ‘संयुक्त व असमान विकास’ या लिऑन ट्रॉट्स्की याच्या सिद्धांतात पाहायला मिळते. ते अपवादात्मक नसून त्या प्रक्रियेचे ते मूळ स्वरूपच आहे. ती कधीच समान विकास करू शकत नाही.

या प्रादेशिक विषमतांच्या चौकटीत त्या त्या भागातील सामाजिक विषमता नव्याने घडत असतात. उत्पादक घटकांच्या मालकीआधारे तेथील अर्थकारण विकसित होते. हा घटक हा जमीन असू शकतो, वाळू किंवा वीज प्रकल्पातील राखही. ‘लोकसत्ता’च्या ‘बीडमधील बाहुबली’ या लेखमालिकेतून हे वास्तव ठळकपणे समोर आले. त्या त्या भागातील प्रभावशाली जातींमधील बडी धेंडे या नव्या अर्थकारणातील संधीचा फायदा घेऊन मोठे बाहुबली होतात. एकीकडे त्यांना जाती व्यवस्थेतून आलेल्या त्यांच्या उच्च स्थानाचा, मालकी संबंधांचा फायदाही होत असतो तर दुसरीकडे ते नव्याने भांडवली चौकटीत जातींची पुनर्निर्मितीही करत असतात. यातूनच त्या प्रभावशाली जातींमधील प्रभावशाली गटाची वर्गोन्नती होते, तर बाकी मात्र सर्वहारा वर्गात फेकले जात असतात. पण मग याला उत्तर म्हणून ही जातीय समीकरणे अधिक घट्ट करून त्याच्या जोरावर राजकीय पक्ष व त्या त्या जातींचे ठेकेदार आपल्या हितसंबंधांची पोळी भाजून घेतात. यातूनच कट्टर व विखारी राजकारणाला अधिक जोर चढतो. मराठवाड्यात हे स्पष्टपणे जाणवते. यात बळी जातो तो सर्वसामान्य जनतेचा.

● सागर धनराजश्रमिक हक्क आंदोलन (पुणे)

Story img Loader