डॉ. आंबेडकरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कराड शाखेला भेट दिली होती, असा दावा केला जात आहे. ९ जानेवारी १९४० रोजी केसरी वृत्तपत्रात आलेल्या बातमीचा संदर्भ यासाठी दिला जात आहे. मागचा-पुढचा संदर्भ तोडून एखाद्या घटनेचं राजकीयीकरण करण्याची संघाची ही पहिली वेळ नाही. मात्र डॉ. आंबेडकर यांच्या बाबतीत तत्कालीन वर्तमानपत्रांनी अनेकदा खोट्या बातम्या दिल्याचे आढळते. ‘कुलाबा समाचार’ या वर्तमानपत्राने महाड सत्याग्रहाच्या वेळी ‘आंबेडकरांची रायगडावर स्वारी, आंबेडकरांच्या रायगडावरील लीला’ असा मथळा केला होता. बातमीत असे मांडण्यात आले होते की आंबेडकर गडावर गेले असता ते शिवाजी महाराजांच्या गादीवर बसले. त्यांनी समाधीची विटंबना केली. ही पूर्णत: खोटी बातमी होती. डॉ. आंबेडकर रीतसर मोबदला द्यायला तयार असूनसुद्धा १९२० साली ‘मूकनायक’ या वर्तमानपत्राची जाहिरात छापायला केसरी व्यवस्थापनाने नकार दिला होता. केसरीच्या या दुटप्पी व्यवहाराला उघडे पाडणाऱ्या बातम्या नंतर ‘बहिष्कृत भारत’च्या अंकात छापून आल्या होत्या. त्यामुळे आज दावा केली जात असलेली केसरीमधील बातमी किती विश्वासार्ह आहे, हा प्रश्न आहे. आंबेडकरांच्या संदर्भात तत्कालीन बातम्या पुस्तक रूपात संग्रहित करण्यात आलेल्या आहेत. त्यात १९४० साली आंबेडकरांनी सातारा, सांगली, बेळगाव असा प्रवास केल्याची नोंद आढळते. परंतु कराडच्या संघ शाखेला भेट दिल्याची कुठेच नोंद नाही. १९२० ते १९४० च्या दरम्यान डॉ. आंबेडकर अनेक वेळा सार्वजनिक कार्यक्रमासाठी पुण्यात आले. पण त्याची दाखल केसरीने कधीच घेतली नाही. त्या काळातील दलितांचे महत्त्वाचे नेते शिवराम जानबा कांबळे यांच्या मृत्यूची साधी एका ओळीची बातमी केसरीने छापली नाही. अशा परिस्थितीत कराडची बातमी शंकास्पद वाटते.
● केशव वाघमारे, मुंबई
(सविस्तर लेख loksatta.com वर ‘विचारमंच’मध्ये)
हेही वाचा >>> लोकमानस : आम्ही गावकी, भावकी कधीच सोडली
केवळ आंबेडकरी समुदायास भुलवण्यासाठी!
सागर शिंदे यांचा ‘डॉ. आंबेडकरांची संघशाखा भेट प्रेरक’ हा लेख (१४ जानेवारी) वाचला. अशा कितीही साक्षी काढल्या तरी परस्परविरोधी लक्ष्य असलेले हे दोघे सहप्रवासी होऊ शकत नाहीत. डॉ. आंबेडकर यांनी कराड येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेला भेट दिल्याच्या केसरीतील (९ जानेवारी १९४०) बातमीला अन्यत्र दुजोरा मिळत नाही. खैरमोडे, धनंजय कीर यांनी लिहिलेली चरित्रे अधिकृत मानली जातात. त्यांत या भेटीचा संदर्भ नाही. समजा केसरीच्या बातमीला पुष्टी देणारे पुरावे भविष्यात मिळाले, तरी ती औपचारिक, सौजन्याखातरची भेट होती, एवढेच म्हणता येईल. संघाविषयीची डॉ. आंबेडकरांची आपुलकीची भावना या एकाच प्रसंगातून कशी सिद्ध करणार?
डॉ. आंबेडकर यांची भूमिका विषमतावादी हिंदुत्वाच्या कायम विरोधात होती, तर संघाची भूमिका डॉ. आंबेडकरांच्या विरोधी होती. मनुस्मृतीवर आधारित नाही म्हणून संघाने संविधानाचा जाहीर विरोध केला आहे. ‘महर्षी आंबेडकर’ असे त्यांना हिणवले आहे. संविधान बदलले पाहिजे, अशी लेख लिहून मागणी केली आहे. हिंदू कोड बिलाच्या वेळी संघ बाबासाहेबांवर टोकाची टीका करत होता. डॉ. आंबेडकरांनी संसदेतील चर्चेत १९५१ साली संघाला ‘धोकादायक संघटनां’च्या यादीत समाविष्ट केले. ज्या ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ या बाबासाहेबांच्या ग्रंथातील संघाच्या सोयीच्या मुस्लीमविषयक अवतरणांचा हिंदुत्ववादी मंडळी संदर्भ वगळून प्रचार करतात, त्याच ग्रंथात बाबासाहेब असेही म्हणतात – ‘हिंदू राष्ट्र जर खरोखर प्रत्यक्षात आले तर देशासाठी ते एक भयानक संकट असेल. कारण या हिंदू राष्ट्रामुळे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता धोक्यात येईल. लोकशाहीशी त्याचा मेळ बसत नाही. वाटेल ती किंमत देऊन हिंदू राष्ट्राला रोखले पाहिजे.’ जातीजातींत समरसता नव्हे, तर मुळातूनच जाती उद्ध्वस्त होऊन समता आणली पाहिजे आणि त्यासाठी जातिव्यवस्थेला अधिमान्यता देणारे हिंदू धर्मग्रंथ नष्ट झाले पाहिजेत, अशी बाबासाहेबांची भूमिका होती. बाबासाहेबांच्या धर्मांतराला विरोध असणारी संघाची मंडळी आता बौद्ध धर्माला हिंदुत्वाच्या व्यापक छत्राखाली आणण्याचा प्रयत्न करतात. पण बाबासाहेबांनी धर्मांतरावेळी दिलेल्या २२ प्रतिज्ञांत हिंदू संस्कृती आणि त्यातील देवता यांपासून फारकत घेण्याची स्पष्ट नोंद होती. तात्पर्य, डॉ. आंबेडकरांची भूमिका आणि संघाची भूमिका एक नष्ट झाली तरच दुसरी टिकणार अशा प्रकारच्या असल्याने त्यांच्यात कदापिही सोयरीक संभवत नाही. आंबेडकरी समुदायांना भुलविण्याच्या संघाच्या अनेक फासांतला हा एक फास आहे, एवढेच.
● सुरेश सावंत, मुंबई
अमेरिका वैरभाव का वाढवत आहे?
‘ट्रम्प यांचा ग्रीनलँडहट्ट’ हा ‘अन्वयार्थ’ (१५ जानेवारी) वाचला. अवघ्या आठवडाभरात डोनाल्ड ट्रम्प हे महासत्तेचे अध्यक्ष म्हणून शपथ घेतील, पण त्याआधीच त्यांनी पनामा कालवा, कॅनडा देश आणि डेन्मार्क देशाचा स्वायत्त भाग असलेल्या ग्रीनलँड या बेटावर दावा केल्याने जागतिक पटलावर खळबळ माजली आहे. हे सारे विस्तारवादाला खतपाणी घालणारे आहे. रशिया व चीनवर टीका करणारे ट्रम्पही त्याच मार्गाने जात आहेत. अमेरिकेचे इतर देशांवरील अवलंबित्व कमी करण्याचा जरी ट्रम्प यांचा प्रयत्न असला, तरी साधनसंपत्ती मिळवताना आंतरराष्ट्रीय पर्यावरणीय नियम, कायदे यांना केराची टोपलीच दाखवली जाण्याची शक्यता अधिक. ग्रीनलँडच का? कारण स्कॅन्डिनेव्हियन डेन्मार्क नाटो सदस्य असला तरी हा देश लष्करी दृष्टिकोनातून बलवान नाही. तसेच तेथील राज्यकर्तेही तुलनेने मवाळ. ट्रम्प नाटोला भीक घालत नाहीत हे आधीही दिसून आले आहे. त्यामुळेच ट्रम्प दुबळ्यांवर दादागिरी करत आहेत. तालिबानीसमोर गुडघे टेकताना ट्रम्प यांचे हे शौर्य कुठे होते? अमेरिकेने ग्रीनलॅन्डच्या निमित्ताने आर्क्टिक महासागरात प्रवेश केल्यास रशिया-अमेरिका सामरिकदृष्ट्या खूपच जवळ येतील. तणाव वाढेल. अमेरिकेने ज्या मेक्सिको सीमेवर भिंत बांधली त्याच देशातून कॅलिफोर्नियात लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशामक यंत्रणा मागविण्याची वेळ महासत्तेवर आल्याचे जगाने पाहिले आहे. तरीही ट्रम्प नव्याने संघर्षाचे दार उघडत आहेत. यातून वाढेल ते फक्त अमेरिकेचे अन्य देशांबरोबरचे वैर!
● संकेत पांडे, नांदेड
कराडने अफाट संपत्ती जमविली कशी?
‘वाल्मीक कराडलाही ‘मकोका’’ ही बातमी (१५ जानेवारी) वाचली. खंडणी, देशमुख हत्या प्रकरणातील सहभाग याचबरोबर कराडने अफाट संपत्ती कशी जमविली, याचाही शोध घेतला जाणे गरजेचे आहे. त्याने निरनिराळ्या शहरांत जी मालमत्ता घेऊन ठेवली आहे, त्यासाठीचे पैसे त्याने उत्पन्नाच्या कोणत्या स्राोतातून मिळविले? राजकीय वरदहस्त असल्याशिवाय एवढी जमवाजमव शक्य आहे का? त्यामुळे कराडबरोबरच धनंजय मुंडे व ते ज्या पक्षात आहेत, त्या पक्षाच्या आजी, माजी प्रमुखांचीही चिंता वाढल्यास नवल नाही. कराडचा उदय हा वर्ष-सहा महिन्यांतील नाही. त्याची पाळेमुळे खोलवर पसरली आहेत. एकटे धनंजय मुंडे कराडला संरक्षण देण्यास सक्षम असतील असे वाटत नाही. चौकशी किती नि:पक्षपाती होते, याबाबत उत्सुकता आहे. बिहारमध्ये नितीशकुमारांना व उत्तर प्रदेशमध्ये आदित्यनाथांना जे शक्य झाले, ते महाराष्ट्रात शक्य होईल का? फडणवीसांचीसुद्धा कसोटी लागणार आहे. देशमुखांचा खून झाला नसता तर कदाचित कराड प्रकरण उघड झालेही नसते.
● अरविंद करंदीकर, तळेगाव दाभाडे
खासदार फुटत नसल्याने चिडचिड?
‘देशाचे पहिले तडीपार गृहमंत्री’ ही बातमी (१५ जानेवारी) वाचली. ‘नाठाळाचे माथी, हाणू काठी’ जगत् गुरू संत तुकोबाराय यांच्या अभंगातील ही ओळ. महाराष्ट्रातील संत परंपरेने इथल्या सामान्य जनतेला दिलेली ही शिकवण महाराष्ट्र तंतोतंत पाळत आलेला आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना ‘भटकती आत्मा’ म्हणून हिणवले होते. त्याचा परिणाम निवडणुकीत दिसून आला होता. शरद पवार यांचे राजकारण भलेही भाजपला पटत नसेल, मात्र त्यांनी कठीण परिस्थितीत महाराष्ट्राला सावरण्याचा प्रयत्न केला आहे. मग तो किल्लारीतील भूकंप असो वा मुंबईतील बॉम्बस्फोट. अमित शहा यांनी अलीकडेच संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही असाच अपमान केला. नेहरूंचा अपमानास्पद उल्लेख तर भाजप नेते नेहमीच करतात. डॉ. मनमोहन सिंग यांची त्यांच्या हयातीत आणि मृत्यूपश्चातही अवहेलना केली गेली. नितीश- नायडू यांच्या वाढत्या मागण्या सातत्याने पूर्ण करत राहण्यापेक्षा शरद पवार यांचे खासदार फोडून त्यांना आपल्या पक्षात विलीन करून घेऊन केंद्र सरकार स्थिर करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना यश न आल्यामुळेच भाजपचे चाणक्य बिथरलेले असावेत.
● अॅड. एम. आर. सबनीस, अंधेरी (मुंबई)