गरिबांना बांडगूळ’ समजणारे कोण?’ हा ज्युलिओ रिबेरो यांचा लेख (४ मार्च ) वाचला; पण ‘न्या. गवई यांनी अलीकडेच केलेले एक विधान निराशाजनक आहे, असे जाहीरपणे म्हणण्याची वेळ ‘कॉन्स्टिट्यूशनल कॉन्डक्ट ग्रुप’ या संस्थेतील सहकाऱ्यांवर आली’ याचेच आश्चर्य वाटले. न्या. गवई यांनी आजपर्यंतच्या कारकीर्दीत अनेक लोकोपयोगी निवाडे दिलेले असतानाच त्यांच्या या विधानाचा विपर्यास करण्यात येत आहे हे लांछनास्पद आहे. खरेतर, निवडणुका जिंकण्यासाठी मोफत योजनेद्वारे लाभ देऊन लोकांना ‘परोपजीवी’ वा ‘बांडगूळ’ करण्याच्या कामात सध्याचे सनदी अधिकारी राज्यकर्त्यांना साथ देत आहेत; या विरोधात रिबेरोंचा समावेश असलेल्या त्या संस्थेने सरकारला जाब विचारायला पाहिजे. यावरून एक लक्षात येते की, गरीब मागासवर्गीय लोकांना मोफतच्या योजनेत गुंतवून शिक्षणापासून वंचित ठेवायचे आहे. संविधान तर बदलू शकत नाही परंतु त्यापासून मिळणाऱ्या आरक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न आणि बेरोजगार बनवण्याचे षड्यंत्र या सरकारकडून होत आहे. राज्यात १९७२ मध्ये दुष्काळ पडला तरीही ‘मोफत वाटप’ योजना अस्तित्वात न येता ‘रोजगार हमी योजने’तून गरीब व मागासवर्गीयांना सन्मानाने जगता यावे अशी योजना तत्कालीन सरकारने आणली होती, हे विसरू नये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

● ज्ञानेश्वर हेडाऊपुणे

गावस्करांना ते अशक्य नव्हते

पद्माकर शिवलकर यांच्या मृत्यूची बातमी (लोकसत्ता – ४ मार्च) वाचून खूप दु:ख झाले; पण अन्य कारणांमुळेही वाईट वाटले : त्या बातमीसह असलेल्या चौकटीत भारताचे माजी कर्णधार व सलामीवीर सुनील गावस्कर यांनी सांगितले आहे की शिवलकर यांना संघात घेण्यासाठी निवड समितीला ते पटवून देऊ शकले नाही आणि हे शल्य मनात राहील. हे दुर्दैवी आहे, कारण एका इंग्लिश दौऱ्यावर मुंबईचे सहा खेळाडू भारतीय संघात होते. सुरु नायक यांची भारतीय संघात निवड झाली व त्यांना कसोटी सामना खेळता आला. अमरनाथ फुल फॉर्ममध्ये असताना त्यांना निवड समितीने वगळले होते. त्या इंग्लिश दौऱ्यावर गावस्कर कर्णधार होते. गावस्कर कर्णधार असताना वयाने लहान असलेल्या रवी शास्त्री यांना न्यूझीलंडमध्ये तातडीने बोलावून संधी देण्यात आली होती. अशा वेळी पॅडी यांना एक संधी दिली असती तर काही बिघडले नसते.

● जॅक गोम्सचुळणे (वसई)

युरोप-अमेरिकेत दुरावा अटळ

‘…यातून तरी शिकावे!’ हे संपादकीय (४ मार्च ) वाचले. अमेरिकेच्या युक्रेनविरोधातील प्रखर भूमिकेनंतरही युक्रेनला युरोपियन राष्ट्रांनी जवळ करणे हा अमेरिकेसाठी मूक इशारा असल्याचे द्याोतक आहे. या प्रसंगांतून दिसते की युरोप अमेरिकेपासून दुरावत आहे. याला अमेरिका-रशिया यांच्या कृत्रिम, स्वार्थी व नफाकेंद्री मैत्रीची किनार आहे. अमेरिकेची आर्थिक दहशत लक्षात घेता उघडपणे कोणत्याही देशाचे नेतृत्व त्यांच्यावर टीका करताना दिसत नाही. तरीही अमेरिकेपासून युरोपियन व आशियाई मित्र देश हळूहळू दुरावतील व नजीकच्या भविष्यकाळात ट्रम्पनीतीचा अमेरिकेला फटका बसेल यात शंकाच नाही.

● नामदेव पवारआळेफाटा (पुणे)

इराण व उत्तर कोरियाचे फावेल…

‘…यातून तरी शिकावे!’ (४ मार्च) व ‘‘विश्व’गुंड!’ (३ मार्च) या दोन्ही संपादकीयांमध्ये अमेरिकन अध्यक्षांच्या कृतीबाबत अत्यंत परखडपणे मत व्यक्त करण्यात आले आहे. अर्थात, ट्रम्प यांची मूळ प्रवृत्ती ही गुंडगिरीचीच वाटते. आजपर्यंतच्या अमेरिकेच्या धोरणाविरुद्ध ट्रम्प यांचे धोरण असल्याने नाटो संघटनेचा प्रवर्तक असलेल्या अमेरिकेनेच त्यातून बाहेर पडणे किंवा फाइव्ह आय या संघटनेतून बाहेर पडणे यासारखे पोरकट विचार केवळ ट्रम्प करू शकतात. यामुळे चीन, रशिया इतकेच नव्हे तर इराण व उत्तर कोरिया यांचेही फावते आहे. ट्रम्प यांना निवडून देऊन अमेरिकन नागरिकांनी इतिहासातील सगळ्यात मोठी चूक केली हे येणारा काळच दाखवून देईल.

● सुदर्शन महिंद्रकरसोलापूर

झेलेन्स्कींनीच दूरचा विचार करावा !

झेलेन्स्की यांनाही ट्रम्प यांच्याशी बोलताना इस्रायली अध्यक्षाप्रमाणे त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळून किंवा किमान ट्रम्प यांची तथाकथित अहवेलना न करता आपले काम करता आले असते. ट्रम्प हे आत्ममग्न आणि हेकेखोर हुकूमशाही नेते असले तरी सध्या ते जगातील सर्वात शक्तिशाली देशाचे निवडून आलेले अध्यक्ष आहेत. कधी कधी दुसऱ्याला त्याची चूक दाखवण्यापेक्षा आपले काम काढून घेणे महत्त्वाचे असते. रशियाविरुद्धची ही लढाई केवळ युरोपच्या मदतीने – अमेरिकेच्या मदतीशिवाय – युक्रेनला परवडणारी नाही हे समजण्यास कोणा राजनैतिक तज्ज्ञाची झेलेन्स्की यांस आवश्यकता नाही.

● वैभव फरताळेयेवला (जि. नाशिक)

मोदींनी दिलेली सवलत रद्द करणार?

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एसटी) तोट्यात आहे असे राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक म्हणतात. महिलांना राज्यात कुठेही फिरायला अर्धे तिकीट, ज्येष्ठांना (६० ते ७४ वर्षे) अर्धे तिकीट आणि ७५वर्षे किंवा त्याहून अधिक वय असणाऱ्यांना फुकट प्रवास या सर्व योजना बंद करण्याचा एसटी महामंडळाचा विचार आहे. पण दररोज कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीत चाललेल्या एसटीला निव्वळ सवलत योजना बंद केल्यामुळे बंद करून नफा होणार आहे का? भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या महोत्सवाचे औचित्य साधून ७५ किंवा वरील वयाच्या नागरिकांना एसटीचा मोफत प्रवास करण्याची मुभा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे, ती बंद करून काय साधणार? ७५ वर्षांवरील किती ज्येष्ठ नागरिक स्वत: एकटे स्वतंत्रपणे प्रवास करू शकतात? समाजातील किती टक्के लोक याचा लाभ घेऊ शकतील, याचाही विचार व्हावा आणि एसटीच्या तोट्याचे खापर या सवलतींवर फोडू नये.

● अजित शेटयेडोंबिवली

मुसलमान होऊन पाहा…म्हणाले तर?

संघाची मालमत्ता स्वयंसेवक’ (रविवार विशेष- २ मार्च) या टिपणात लिहिल्याप्रमाणे दिल्लीतील ‘केशवकुंज’च्या निर्मितीवर १५० कोटी रुपये खर्च झालेले आहेत… ते सगळे स्वयंसेवकांच्या वर्गणीतूनच, असेही टिपणातच नमूद आहे. ठीक आहे, आता ही रक्कम कोणी कोणी किती रुपयांची देणगी दिली हे संघ मुख्यालय जाहीर करेल काय? म्हणजे गरजेनुसार स्वयंसेवकाच्या समर्पणातून ही सगळी निर्मिती होत आहे याबद्दल लोकांच्या मनात शंका राहणार नाही. दुसरे असे की, लेखात म्हटल्याप्रमाणे आपल्या मनातील प्रश्न सरसंघचालकांना स्वयंसेवक सहजपणे विचारू शकतो. ही सत्यता संघात आल्यावरच कळते. ते जाणून घ्यायचे असेल तर संघात जावे लागेल. संघाची कोणी चिकित्सा करू लागले तर त्याला हे स्वयंसेवक नेहमीच असे सुचवतात की, ‘एकदा शाखेत या. काही दिवस शाखेत राहा, बघा आणि मग टीका करा. शाखेवर या, म्हणजे सारे समजेल.’ असे मोघमपणे सांगितले जाते; पण त्यावर असा प्रश्न विचारला की, तुम्ही मुसलमानांचा द्वेष वाढवण्यासाठी मुसलमानी धर्माची चिकित्सा करता तेव्हा तुम्हाला मुसलमानांनी ‘आधी मुसलमान व्हा आणि मग आमच्या धर्माची चिकित्सा करा’ असे सांगितले, तर चालेल काय? थोडक्यात काय तर दारूवर टीका करण्याआधी हे स्वयंसेवक म्हणतील, ‘आधी दारू पिऊन बघा, मग टीका करा…’ संघाची रचना एकचालककेंद्री असल्यामुळे ‘आम्ही आदेश द्यायचा आणि स्वयंसेवकांनी कुठलाही चांगला-वाईट विचार न करता तो पाळायचा’, ही संघाची समानता म्हणावी काय?

● जगदीश काबरेसांगली

काँग्रेसने आघाड्या करूच नयेत

‘‘इंडियाबरखास्त झाल्यात जमा?’ हा लाल किल्ला सदरातील महेश सरलष्कर यांचा लेख (३ मार्च) वाचला. ‘सादगी’ आणि सचोटीचा दावा करून सत्तेवर आलेल्या केजरीवालांच्या दाव्यांचा फुगा ‘दैवाने दिले आणि कर्माने नेले’ या उक्तीप्रमाणे फुटला आणि विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. केजरीवालांच्या ‘आप’चे अपयश काँग्रेससाठी इष्टापत्तीच ठरेल, त्यामुळे काँग्रेससाठी राजकीय अवकाश निश्चितच वाढला आहे! केजरीवाल काय वा तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी काय; अशा हेकेखोर, तिरसट, एककल्ली नेत्यांशी सहकार्यापेक्षा काँग्रेसने ‘एकला चलो’ म्हणत आपल्या सिद्धांतांवर ठाम राहून वाटचाल करणे लाभदायक ठरेल. ● श्रीकांत जाधव, अतीत (जि.सातारा)