‘पतिव्रतेच्या गळय़ात धोंडा’ हा अग्रलेख (२३ ऑगस्ट) वाचला. गुलाम नबी आझाद आणि आनंद शर्मा यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेस काही धडा घेईल असे अजिबात वाटत नाही. याआधी अनेक नेते पक्ष सोडून गेले आहेत. हे दोन्ही नेते गर्दी खेचणारे आहेत. मुळात काँग्रेसमधील जनाधार नसलेली काही मंडळी आहेत जी नेहमी या कुरापती करण्यात व्यग्र असतात. जनाधार असणारी माणसे पक्षाला नकोशी वाटू लागली आहेत. याचे एक मुख्य कारण म्हणजे स्वत: नेतृत्वच विस्कळीत मानसिकतेत आहे. काँग्रेस पक्षाला आजही जनाधार आहे, मात्र तो आता नेतृत्व करू पाहणाऱ्या नेत्यांना नाही हे लक्षात घेतले पाहिजे. काँग्रेस म्हणजेच गांधी-नेहरू घराणे असा भास निर्माण करणारे दरबारी आणि देशातून घराणेशाही हद्दपार करा असे म्हणणारे भाजप नेते यांची भाषा अगदी सारखीच नाही का?
सर्व जातिधर्माना सोबत घेऊन चालणारा पक्ष आपल्याच पक्षातील नेत्यांना का सोबत घेत नाही याचाही विचार होणे महत्त्वाचे आहे. याचे मुख्य कारण म्हणजे पक्ष आपल्या हातून तर निसटणार नाही ना, याचे भय. एकदा का काँग्रेस इतरांच्या हाती गेली तर गेल्या काही पिढय़ा ज्या फक्त दिल्ली दरबारी बसून आपला स्वार्थ साधत आहेत त्यांचे काय होणार. बरे या पक्षात कोणतीही आवक नाही, गर्दी नाही, तरीही गटतट पडत आहेत याचीच कमाल वाटते. भाजपसारख्या पक्षात स्थानिक भाजपपेक्षा जास्त भरणा इतर पक्षांतील नेत्यांचा आहे तरी कोठेही वादविवाद होत नाही. सर्व जुने नेते बिचारे हार आणि पुष्पगुच्छ घेऊन तयारच असतात. याचे कारण म्हणजे मोदी शहा यांची पक्षांतर्गत दहशत. अशी दहशत काँग्रेसमध्ये निर्माण झाली तरी चालेल, पक्ष वाढेल तरी.
आज जनतेला एका मजबूत राष्ट्रीय विरोधी पक्षाची आणि नेत्याची गरज भासू लागली आहे. मात्र हे काँग्रेस नेत्यांच्या गावीच नाही. राहुल गांधी यांनी आजही दिल्ली सोडून राज्यातील जनतेशी संवाद साधला तर ते नेतृत्व करण्यास सक्षम आहेत असे जनतेला वाटेल. नाव जर चालविता येत नसेल तर नावाडय़ाने स्वत:हून नावेतील अनुभवी माणसाच्या हाती ती नाव द्यावी. तरच ती किनाऱ्यावर पोहोचते, आपल्या माणसाचे प्राण वाचतात आणि भविष्यासाठी एक चांगला नावाडी तयार होतो.
– प्रा. आनंद हरिश्चंद्र निकम, वैजापूर
काँग्रेसने विचारसरणी बदलावी
‘पतिव्रतेच्या गळय़ात धोंडा..’ हे संपादकीय (२३ ऑगस्ट) वाचले. कोणताही राजकीय पक्ष केवळ नेत्यांच्या अस्तित्वावर चालत नाही, तर त्यासाठी त्यांना कार्यकर्त्यांची भक्कम फळी आवश्यक असते. काँग्रेसकडे अशी फळी ‘आहे’ म्हणण्यापेक्षा ‘होती’ असेच म्हणावे लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ‘हात ओला त्याचा मित्र भला’ यानुसार सध्या भाजपमध्ये चलती आहे. काँग्रेस दिवसेंदिवस रोडावत आहे, त्याचे कारणही तेच! कठीण परिस्थितीत आहेत ते कार्यकर्ते व पदाधिकारी टिकवून ठेवणे पक्षीय उच्च नेतृत्वाचे कौशल्य ठरते. काँग्रेसप्रमाणेच सध्या शिवसेनादेखील नेमके हेच अनुभवत आहे.
काँग्रेस ज्याप्रमाणे पक्षात वरचढ होऊ पाहणारे गुलाम नबी आझाद व आनंद शर्मा यांची पंखछाटणी करत आहे, तद्वतच स्थिती सत्ताधारी भाजपमधील नितीन गडकरी यांचीही आहे. निष्ठावंतांना डावलून आयात केलेल्या नेत्यांना बहुसन्मानित करण्याचे काम काँग्रेस व भाजप हे दोन्ही पक्ष करत असल्याने या बाबतीत हे दोन्ही पक्ष समानधर्मी म्हणायचे! काँग्रेस पक्षास पक्षवाढीपेक्षा आहे तो व तेवढा टिकवणे अधिक महत्त्वाचे असल्याने उच्च नेतृत्वाने आता पक्षापेक्षा स्वत:ची विचारधारा बदलणे गरजेचे वाटते.
– बेंजामिन केदारकर, नंदाखाल (विरार)
अध्यक्ष निवडणूक केवळ सोपस्कार
‘पतिव्रतेच्या गळय़ात धोंडा..’ हा अग्रलेख वाचला. के. कामराज नाडर, एस. निजिलगप्पा, नीलम संजीव रेड्डी, एस. के. पाटील यांचा सिंडिकेट काँग्रेसवर प्रभाव होता. सिंडिकेट काँग्रेसचे नेतृत्व इंदिरा गांधी यांना मान्य झाले नाही. वैचारिक वादात काँग्रेस दुभंगलेली पाहायला मिळाली. गांधी घराण्याचे वर्चस्व तेव्हापासून प्रस्थापित झाले.
पक्षांतर्गत निवडणुकीच्या सोयीस्कर सोपस्काराचे बीज तेव्हापासून रुजले. आताही जी-२३ मधील गुलाम नबी आझाद ते आनंद शर्मा यांनी नुकतेच दिलेले राजीनामापत्र काँग्रेस हायकमांडला मानवणारे नाही. त्या पक्षाची ती परंपराच नाही. नेतृत्वशून्य काँग्रेसचे सुकाणू गांधी वलयातून बाहेर पडू शकणार नाही. अशोक गेहलोत यांना तडजोडीच्या राजकारणात पक्षाध्यक्ष पदाची सूत्रे सोपवून राहुल-प्रियंका काँग्रेसवर वर्चस्व प्रस्थापित करत रहातील. सचिन पायलट यांना सचिवपदाची जबाबदारी कधीही मिळणार नाही.
पंतप्रधान मनमोहन सिंग यांना मुठीत ठेवून सोनिया गांधी कारभारी झाल्या तद्वतच अशोक गेहलोत यांना पक्षाध्यक्ष करून राहुल-प्रियंका जोडी त्यांचे हात बांधून ठेवेल. काँग्रेसमधील निष्ठावंत हे जटायू पक्षाच्या पंख छाटल्या अवस्थेत पडून राहाणार. शेवटी काँग्रेस विचारधारा आज शिल्लक राहिलेली दिसत नाही. काँग्रेसचे वलय हे आज ही ‘गांधी’ परिवारपासून दूर जात नाही, हीच काँग्रेसच्या जडणघडणीची शोकांतिका आहे.
– सुबोध पारगावकर, पुणे
भाजप ‘एकपक्षीय’ स्वप्ने पाहात आहे का?
‘मोदी-युगात* भ्रष्टाचार अक्षम्यच!’ हा ‘पहिली बाजू’ सदरातील लेख (२३ ऑगस्ट) वाचला. त्यात देशभरातील अलीकडच्या काळातील अधिकारी आणि राजकीय नेत्यांच्यावरील छाप्यांतून एक कठोर संदेश दिल्याचे मत मांडले आहे. मात्र विरोधकांनी दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया यांच्या निवासावरील छापे सूडबुद्धीने टाकल्याची टीका सुरू केली आहे. दिल्ली सरकारने शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात केलेली प्रगती ही भारतच नव्हे तर जगाला कळली आहे म्हणूनच की काय ‘न्यू यॉर्क टाइम्स’ने या प्रगतीची दखल घेतली.
सर्वच विरोधक भ्रष्टाचारी असतील तर हेच भ्रष्टाचारी जेव्हा सत्ताधारी (भाजप) पक्षात प्रवेश करतात तेव्हा ते स्वच्छ कसे होतात आणि हेच नेते पुढे भ्रष्टाचार चळवळीचे खंदे समर्थक असल्याचा आव कसे आणतात, याचेच आश्चर्य वाटते. भाजपने याविषयी स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे.
नुकतेच महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले, या सरकारमधील अनेक मंत्री हे विविध आरोप असलेले आहेत. काही मंत्र्यांवर तर गुन्हेगारी स्वरूपाचे गंभीर आरोप आहेत. मंगलप्रभात लोढा यांची एकटय़ाची संपत्ती ४४१ कोटी ६५ लाख रुपये आहे तर सर्वात कमी संपत्ती संदीपान भुमरे यांची दोन कोटी ९९ लाख एवढी आहे. भ्रष्टाचाराचे आरोप झालेले नेते भाजपमध्ये गेले की लगेच स्वच्छ चारित्र्याचे कसे होतात? हा पक्ष वॉशिंग मशीन आहे का? एकपक्षपद्धतीकडे वाटचाल करण्याचे भाजपचे मनसुबे आहेत का?
– संदीप वरघट, अमरावती
तो भ्रष्ट म्हणून मी स्वच्छ, असे नसते
‘मोदी-युगात* भ्रष्टाचार अक्षम्यच!’ हा ‘पहिली बाजू’ सदरातील लेख (२३ ऑगस्ट) वाचला. देशातून भ्रष्टाचाराचे उच्चाटन व्हावे यात कोणाचेच दुमत नसावे. लेखक मनीष सिसोदिया किती भ्रष्ट आहेत हे सांगण्याचा प्रयत्न करताना दिसतात. काही वर्षांपूर्वी केजरीवाल यांनादेखील अनेक चौकशांना सामोरे जावे लागले होते. भाजपचे नेते भ्रष्टाचाराबद्दल भरभरून बोलत असतात. परंतु सुवेंदू अधिकारी, नारायण राणे, प्रताप सरनाईक या व्यक्ती भाजपच्या गोटात येतात कशा, असे विचारले की सारे गप्प होतात. आपल्या देशात मनी लाँडिरग ही मोठी समस्या आहे. यात सर्वपक्षीय व उद्योजक गुंतले आहेत हे उघड गुपित आहे. भाजप केवळ पक्ष विस्तारासाठीच त्याचा उपयोग करून घेत आहे, हे वास्तव साऱ्यांना ठाऊक आहे.
लेखात हॅम्लेट नाटकातील ‘राज्यांत काहीतरी कुजलेले आहे खास’चा दाखला दिला आहे. मला वाटते त्याच नाटकात हॅम्लेटला बोचणाऱ्या शल्यांपैकी एक ‘इन्सोलन्स ऑफ ऑफिस’ विद्यमान व्यवस्थेला लागू होते.
तात्पर्य : तो भ्रष्ट आहे म्हणून मी स्वच्छ आहे असे नाही.
– शैलेश न. पुरोहित, मुलुंड
आता तरी पादचाऱ्यांना न्याय द्या
‘निर्लज्ज प्रशासनाचे बळी’ हा ‘अन्वयार्थ’ बापुडवाण्या पादचाऱ्यांचा प्रश्न अधोरेखित करणारा आहे. मुंबईत व देशात सर्वत्र उत्तम रस्ते बांधले जात आहेत मात्र पादचारी मार्ग पूर्णपणे दुर्लक्षित राहिलेला दिसतो. महामार्गावर महिला एकमेकींच्या मागे डोक्यावर भारे घेऊन चालतात ते जीवाच्या भीतीनेच.
दुर्दैवाने आपल्या देशात वाहनचालकांना पादचाऱ्यांबद्दल जराशीही सहानुभूती नाही आणि प्रशासन त्याबाबत पूर्ण बेफिकीर आहे. पादचारी मार्गावरील फेरीवाले, खोका मार्केट हे पादचाऱ्यांना अतिशय अडचणीची ठरतात आणि त्यांना मुख्य रस्त्यावर चालणे भाग पडते. यामुळे अपघात होतात. एवढे होऊनही ते मुख्य रस्त्यावर का चालतात म्हणून त्यांनाच दोष दिला जातो. आता सर्वसामान्यांचा मनापासून विचार करणारे सरकार सत्तेत आले आहे असे म्हणतात, निदान त्यांनी तरी पादचाऱ्यांना न्याय द्यावा.
– माया हेमंत भाटकर, चारकोप गाव (मुंबई)