‘योगायोग संस्कृतिसंगम’ हा अग्रलेख (१८ऑक्टोबर) वाचला. अंधेरी पोटनिवणुकीच्या माघारीवर चर्चा करत असताना रंगमंचावर जे सादरीकरण झाले ते सर्वानी बघितले. पडद्यामागे जी रंगीत तालीम झाली ती नजरेआड करून कसे चालेल? साखरझोपेत असलेल्या राजकीय संस्कृतीला उठवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी गजर वाजवले ते ऋतुजा लटके उमेदवारी अर्ज भरत असताना का वाजवले नाहीत? शरद पवार आणि आशीष शेलार यांनी एकत्रित उभ्या केलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत कदाचित त्याचे गुपित असेल. शेवटी सारेच एकमेकांचे प्रतिस्पर्धी. दोन प्रमुख पक्षांत ही निवडणूक झाली असती तर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा आणि दशा स्पष्ट झाली असती.
कोणाचा मान ठेवून म्हणा किंवा काळजावर दगड ठेवून म्हणा वा मशालीच्या लख्ख प्रकाशाने म्हणा, कोल्हापूर, पंढरपूर, देगलुर पोटनिवडणुकीत साखरझोपेत असलेली राजकीय संस्कृती अंधेरी पोटनिवणुकीत जागी झाली. येत्या काळात तिची साखरझोप संपेल, अशी आशा आहे.
– अभिजीत चव्हाण, नांदेड
या ‘माघारी’त पुढील काळाची शिदोरी!
‘योगायोगांचा संस्कृतिसंगम!’ हा अग्रलेख वाचला. अग्रलेखात म्हटल्याप्रमाणे ‘भाजपने माघार घेतल्याने तो पक्ष विजयाबाबत साशंक होता किंवा काय, असा प्रश्न पडतो.’ आणि आता भाजपचे विरोधी म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना तसे म्हणतही आहे. राजकारणामध्ये एक पाऊल तेव्हाच मागे घेतले जाते जेव्हा पुढील काळात दोन पावले पुढे जाण्याची शक्यता असते! गुंतवणूक तिथेच केली जाते जिथून पुढील काळात खात्रीने भरघोस नफा मिळेल!
योगायोग, संस्कृती वगैरे सर्व झूठ आहे, नाहीतर या आधी विद्यमान उमेदवाराच्या निधनाच्या निमित्ताने झालेल्या पोटनिवणुका बिनविरोध झाल्या असत्या, त्या झाल्या नाहीत! म्हणजे संस्कृती आणि मनाचे मोठेपण या फक्त बोलायच्या पोकळ गोष्टी आहेत त्याला राजकारणातील सबळ पुरावा नाही! हे माघारीचे राजकारण भाजपसाठी पुढील काळाची शिदोरी आहे, एक गुंतवणूक आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये!
– अनिरुद्ध गणेश बर्वे, कल्याण
यांना अगोदर नाही आठवली का संस्कृती?
‘योगायोगांचा संस्कृतिसंगम!’ हे संपादकीय वाचले. हे वाचून सगळय़ात आधी प्रश्न पडला की, या राज्यकर्त्यांसाठी संस्कृती म्हणजे नेमकं काय? हा सर्व खेळ होत असताना राज ठाकरे आणि भाजपला त्यांची संस्कृती का आठवली नाही? मुळात राज ठाकरे हे भाजपचे
राष्ट्रीय अध्यक्ष आहेत का? की ते भाजपचे राष्ट्रीय राजकीय सल्लागार आहेत? की त्यांच्या एका पत्रावरून भाजपने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. जनतेला मूर्खात काढायचे बंद करा.
– अॅड. संतोष स.वाघमारे(लघुळ, नांदेड)
व्यापक बहुपक्षीय स्वार्थसंगम
‘योगायोगांचा संस्कृतिसंगम!’ हा अग्रलेख वाचला. लोकप्रतिनिधीच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांना भावनिक आणि गरज असल्यास व्यावहारिक, आर्थिक सर्व प्रकारचा आधार पक्षाने आणि पक्षामधील त्यांच्या मित्रांनी देणे ही आपली संस्कृती असायला हवी. बहुपक्षीय सोयीस्कर राजकारणाच्या उद्दिष्टांना भावना, त्याग आणि आदर्शाचा लेप देऊन महत्त्वाच्या निकषांना मूठमाती देणे ही घाऊक चलाखी आहे. अशा प्रयोगामुळे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा स्तर उंचावतो ही मांडणी बुचकळय़ात टाकणारी आहे.
– सत्यवान भाऊ पाटील, नाळे नालासोपारा
मारुतीच्या बेंबीत गारगारच वाटणार..
सहानुभूतीच्या लाटेत लटके विजयी झाल्या असत्या यापेक्षा त्या एकनाथ शिंदे गटात सामील झाल्या नाहीत याचेच जास्त राजकीय शल्य फडणवीस, राज ठाकरे आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना होते. त्यातूनच हे सगळे राजकीय योगायोग घडत गेले आहेत. त्यामुळे विजय असो अथवा पराभव याचा विचार न करता मारुतीच्या बेंबीत बोट घातल्यावर आत आम्हला गार वाटले असे प्रत्येकजण म्हणतो तसा हा प्रकार आहे एवढेच!
– सुनील समडोळीकर, कोल्हापूर
संघाच्या बदललेल्या विचारसरणीतच गोंधळ
‘दुहीचे सौदागर’ हा राम माधव यांचा लेख वाचला. अमेरिकन दैनिकातील ‘सशुल्क जाहिराती’ला एवढे महत्त्व देण्याचे मुळात कारणच काय? ‘ती सशुल्क जाहिरात आहे.’ – केवळ या एकाच कारणावरून संबंधित वृत्तपत्र ‘सत्य तपासणी’च्या जबाबदारीतून मोकळे होऊ शकते. सामान्यत: सर्व वृत्तपत्रे आपल्या प्रत्येक अंकात एके ठिकाणी असे स्पष्ट करतात की, ‘जाहिरातीतील मजकुराच्या सत्यासत्यतेची जबाबदारी त्यांची नाही; वाचकांनी जाहिरातीवर विश्वास ठेवताना सत्यासत्यता स्वत: पडताळून पाहावी.’ त्यामुळे त्या अमेरिकन वृत्तपत्राला याबाबतीत मुळीच दोष देता येणार नाही.
दुसरे म्हणजे, लेखक स्वत:च म्हणतो की, ‘अशा प्रचाराचा सरासरी भारतीयांवर कोणताही परिणाम होणार नाही, परंतु भारतातील अल्पसंख्याक समाजातील लोकांमध्ये अजूनही यामुळे चलबिचल होऊ शकते.’ (!) सगळय़ा समस्येचे खरे मूळ इथे नकळत ध्वनित झाले आहे! मातृसंस्था रा. स्व. संघ आणि सत्ताधारी राजकीय पक्ष भाजप या दोहोंना अलीकडच्या काळात बहुसंख्य भारतीयांपेक्षा अल्पसंख्याक समाज जास्त महत्त्वाचा वाटू लागलेला आहे!
एकगठ्ठा मतांसाठी अल्पसंख्याकांचा सतत अनुनय करण्याची जी चूक सुमारे साठ-सत्तर वर्षे काँग्रेसने केली, तीच चूक आता संघ आणि त्याची राजकीय शाखा – भाजप – करत आहेत. सध्याच्या सरसंघचालकांच्या ‘मुस्लीम-संवाद’ वाढवण्याच्या प्रयत्नांचे लेखक कौतुक करतात. पण अखिल भारतीय इमाम संघटनेच्या प्रमुखांशी सरसंघचालक भागवत यांचा संवाद ज्या दिवशी झाला, त्याच रात्री पीएफआयच्या देशभरच्या कार्यालयांवर केंद्रीय तपास यंत्रणांनी छापे घालून मोठय़ा प्रमाणावर धरपकड करण्यात आली आणि सात दिवसांत पीएफआयसह इतर आठ संलग्न/ संबंधित संस्थांवर बंदी घालण्यात आली, त्याचे काय? विशेष म्हणजे या बंदी घालण्यात आलेल्या आठ संस्थांमध्ये ‘अखिल भारतीय इमाम संघटने’चा समावेश आहे. ज्या संघटनेवर देशविघातक, दहशतवादी कारवायांसाठी बंदी घातली जाते, त्या संस्थेच्या प्रमुखांबरोबर सरसंघचालक बंद दाराआड सुमारे तासभर ‘मोकळेपणाने’ नेमकी कोणती चर्चा करत होते? कोणता संवाद साधत होते?
मुस्लीम समुदायाच्या श्रोत्यांना भागवत सांगतात की, ‘ते हिंदू समाजापासून वेगळे नाहीत.’ किती मुस्लीम श्रोत्यांना ते पटते? मुळात भागवतांचे म्हणणे ‘खरे’ आहे का? महत्त्वाचे म्हणजे, ते ‘इस्लाम’ला मान्य आहे का? गांधीजींची तीच जुनी धून – ‘ईश्वर अल्ला तेरो नाम..’ आणखी किती काळ आळवणार? जे गांधीजींना त्यांच्या उभ्या आयुष्यात जमले नाही, ते आपल्याला जमेल, असे सरसंघचालकांना खरेच वाटते का? मुळात मुस्लीम समाज हिंदूंपासून वेगळा नाही, तर देशाची फाळणी धार्मिक आधारावर कशी आणि का झाली? इतिहासापासून कधीच काहीच शिकायचे नाही, असा संघपरिवाराने निश्चय केला आहे का? एकूण संघाच्या नव्या बदललेल्या विचारसरणीतील गोंधळ लेखात पूर्णपणे प्रतिबिंबित झालेला दिसतो.
– श्रीकांत पटवर्धन, कांदिवली, मुंबई
संघाला हे प्रयत्न मान्य आहेत का?
‘दुहीचा सौदागर’ हा राम माधव यांचा लेख (१८ ऑक्टोबर ) वाचला. गेल्या आठ वर्षांत मुस्लीम समाजाच्या हिताचे निर्णय घेतले गेले, त्या समाजाशी संवादाचे प्रयत्न हेतूपूर्वक केले जाताहेत, असा लेखाचा सूर आहे. संघ-भाजपची मुस्लीमविरोधी प्रतिमा दुरुस्त करण्याचा हा प्रयत्न वाटला. या गोष्टींना मुस्लीम अनुनय न मानता देशहितासाठी संवादाशिवाय पर्याय नाही असे संघ परिवाराला आता मनापासून वाटत असेल, तर त्याचे स्वागतच आहे. पण वास्तव काय आहे? देशात सामूहिक स्वरूपात जातीय दंगली लक्षणीय प्रमाणात कमी असण्याचे स्थिती गेल्या आठ वर्षांतील नाही तर त्या आधीपासूनची आहे. धार्मिक तेढ, द्वेष, असहिष्णुता, कट्टरता गेल्या आठ वर्षांत चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे.
हरिद्वार येथे हिंदू धर्मसंसदेत जी अत्यंत विखारी भाषणे झाली त्याचा एका शब्दानेही संघ-परिवाराने निषेध केला नव्हता. नूपुर शर्मानी केलेल्या विद्वेषी धार्मिक वक्तव्याबद्दल आखाती मुस्लीम देशांनी भारताला तंबी देण्याआधीच त्यांच्यावर कारवाई झाली नाही. बिल्कीस बानू प्रकरणातील गुन्हेगारांची सुटका करून त्यांचे हारतुरे घालून स्वागत केले गेले. प्रत्येक निवडणुकीत धार्मिक ध्रुवीकरणाचे प्रयत्न झाले. या सर्व बाबी ध्यानात घेता संघपरिवाराला खुद्द सरसंघचालकांचे मुस्लीम-संवादाचे प्रयत्न मान्य आहेत का, हा प्रश्न साहजिकच मनात येतो.
‘या देशात सनातन धर्माचे राज्य येईल’ हा मल्लिकार्जुन खर्गे यांचा इशारा राम माधव यांना सनातन धर्माची बदनामी वाटते. राम माधव यांना त्यांच्याच म्हणण्यानुसार सनातन धर्म गौरवास्पद वाटत असेल तर हा इशारा बदनामीकारक वाटण्याचे कारण काय? कनिष्ठ मानल्या
जाणाऱ्या जातींतील व्यक्तींना सनातन धर्म म्हटला की आठवते ती, अमानुष वर्ण व जातिव्यवस्था. तेव्हा त्या अनुषंगाने काही वक्तव्य केले गेले असेल तर ते समजून न घेता तात्काळ बदनामीचा आरोप करणे म्हणजे मोहन भागवतांना अपेक्षित पापक्षालनाचा मुद्दा मोडीत काढण्यासारखेच नाही का?
– अनिल मुसळे, ठाणे (पश्चिम)