‘बरणीतला राक्षस..’ (३१ ऑक्टो.) या संपादकीयात म्हटल्यानुसार पाकिस्तान हा आजच अराजकतेच्या उंबरठय़ावर उभा आहे असे नव्हे. आजपर्यंत झुल्फिकार अली भुट्टो, नवाज शरीफ यांनी ज्या ज्या लष्करप्रमुखांना निवृत्तीनंतरही सेवावाढ केलेली आहे त्याच लष्करप्रमुखांनी या ना त्या प्रकारे या पंतप्रधानांचा काटा काढल्याचे आपल्याला दिसून येते. त्यामुळेच ‘लष्करावर दबाव आणण्यासाठी’ इम्रान खान यांनी लाहोर ते इस्लामाबाद हा जो लाँग मार्च काढलेला आहे, त्याची परिणती नेमकी कशी होईल हे सांगता येणे कठीण आहे. तेथील खेळ हा पूर्णपणे लष्करावर अवलंबून आहे. हे लष्कर भारताविरुद्ध भावनिक आवाहन करून जनतेची दिशाभूल करते. यात खऱ्या अर्थाने नुकसान हे तेथील जनतेचे दिसून येते. सत्ताधारी असो किंवा लष्कर असो, त्यांना फक्त सत्ता उपभोगणे आणि पैसा वसूल करणे एवढेच दिसून येते. भारताविरुद्ध भावनिक आवाहन करून हे पाकिस्तानी नेते स्वत:चा गल्ला भरून घेत असतात.
– सुदर्शन मिहद्रकर, औरंगाबाद
इम्रान शोकांतिकेस कारणीभूत होतील..
‘बरणीतला राक्षस..’ हा अग्रलेख (३१ ऑक्टोबर) वाचला. पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी २०२३ मध्ये सत्तारूढ होण्याचे मनसुबे रचल्याने, सध्याचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्याविरुद्ध रणिशग फुंकत फैझ हमीद यांना लष्करप्रमुखपदी नेमण्याचा विडाच उचलला आहे. त्यासाठी जनतेला भावनिक आवाहन करत जनतेचा बुद्धिभेदही चालवला आहे. त्याचाच एक भाग म्हणून जनतेला आपल्या कह्यात ओढण्यासाठी धर्मभावना चेतवून सत्ताधाऱ्यांविरुद्ध लाहोर ते इस्लामाबाद असा लॉंग मार्च काढला गेला आहे. इम्रान खान यांच्याच कार्यकाळात चुकीच्या धोरणांमुळे पाकची अर्थव्यवस्था जलदगतीने गर्तेत सापडली. जनता पुरती बिथरल्यावर मात्र मूलभूत प्रश्नावरून त्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी पूर्वसुरींप्रमाणे भारताला निर्थक धाक दाखवूनही झाला; पण सारे काही व्यर्थ! शेवटी धूर्त व मुत्सद्दी राजकारण्यांप्रमाणे आपल्या अपयशाचे खापर खोटय़ा कथानकाने ‘परकीय शक्तींचा हस्तक्षेप’ म्हणून अमेरिकेच्या माथी फोडण्याचा कांगावा करीत, त्या राष्ट्राला नाहक लक्ष्यही केले गेले. तुलनेने सध्या पाकमध्ये लष्कर व मूलतत्त्ववादी शांत आहेत. बाटलीबंद असलेल्या या राक्षसांना मुक्त करण्याचे ‘पुण्यकर्म’ सध्या इम्रान खान यांचे हस्ते नक्कीच होत आहे. भविष्यातील पाकिस्तानी शोकांतिकेस म्हणून तेच तर कारणीभूत होतील यात बिलकूल शंकाच नाही!
– बेंजामिन केदारकर, नंदाखाल (विरार)
खेळ अंगलट आल्यास दहशतवाद वाढेल
‘बरणीतला राक्षस..’ (३१ ऑक्टोबर) हे संपादकीय वाचले. इम्रान खान हे कसलेले गोलंदाज आहेत, त्यांना कोणता चेंडू कोठे, कधी आणि कसा फेकायचा याचे चांगले ज्ञान आहे, म्हणून बरणीत कोंडलेला राक्षस आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी सोयीनुसार बाहेर काढायचा व सत्ता येताच पुन्हा आत कोंडायचा हा खेळ ते खेळू पाहात आहेत. पण त्या राक्षसाला कोंडताना कधी कधी सत्ता गमवावी लागते, हे नवाज शरीफ यांनी १९९९ मध्ये पाहिले आहे, त्यांना डावलून मुशर्रफ प्रमुख झाले. जर असे झाले तर इम्रान यांचा डाव त्यांच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही. यातून दहशतवादास पोसण्यासाठी सुपीक भूमी लाभलीच म्हणून समजा.
– शरद शिंदे, जामखेड (जि. अहमदनगर)
भारताने सावध, सज्ज राहण्याची गरज
‘बरणीतला राक्षस..’ हा अग्रलेख वाचला. पाकिस्तानचे पंतप्रधान, लष्करप्रमुख आणि मूलतत्त्ववादी संघटनांचे म्होरके यांच्यात सत्तेसाठी रस्सीखेच होत असताना, त्यात सामान्य पाकिस्तानी नागरिक कुठेच नसतो. तो मात्र महागाई, बेरोजगारी, आर्थिक विषमता, गरिबी, दैन्यावस्था यांचा शिकार बनतो. याची कुणालाच पर्वा नसते. धर्मावर आधारित राष्ट्रे लयाला जातात. इस्लामवर आधारित पाकिस्तान राजकीय अस्थिरतेच्या, धार्मिक कट्टरतेच्या आणि आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर उभा आहे. एकाअर्थी पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, म्यानमार, बांगलादेश, श्रीलंका हे भारताच्या शेजारील देश कमालीचे अस्थिर झाले आहेत आणि ते चीनच्या प्रभावक्षेत्राखाली येतात. त्यातच चीन आणि पाकिस्तान यांच्यात भारतद्वेष हा समान दुवा असल्यामुळे भारताने सदासर्वकाळ सावध व सज्ज राहण्याची गरज आहे.
– डॉ. विकास इनामदार, पुणे
..पण जगण्याचे आव्हान!
‘सत्ता राहील, पण आव्हाने वाढतील..’ हा ‘लालकिल्ला’ या सदरातील लेख (३१ ऑक्टोबर) वाचला. लेखकाचे या लेखातील विश्लेषण सत्ताधारी पक्षकेंद्रित आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र सर्वसामान्य माणसांना जगणे कठीण होत आहे. त्यांच्यापुढे जगण्याचे आव्हान आहे .सर्वसामान्य माणसाला काही ‘टक्केवारी’ मिळत नाही किंवा राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नसल्यामुळे कोणताही आर्थिक लाभ मिळत नाही, व्यवसाय-धंद्याला संरक्षण नाही, अशा बिकट अवस्थेत सर्वसामान्य नागरिक आहे. त्याच्यापुढे जगण्याचे आव्हान आहे.
– युगानंद गुलाबराव साळवे, पुणे
विरोधकांचा आदर आणि समस्यांचे भान हवेच
‘सत्ता राहील, पण आव्हाने वाढतील.. ’हा महेश सरलष्कर (३१ ऑक्टोबर) यांचा लेख वाचला. बहुपक्षीय लोकशाही असल्याने निवडणुकीला सामोरे जाण्याची संधी राष्ट्रीय पक्षासमवेत प्रादेशिक पक्षांना देखील आहे. परंतु विरोधकांना सूडबुद्धीने जेरीस आणून त्यांच्यावर केंद्र शासनाच्या अधीन असलेल्या ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या स्वायत्त संस्थेला भाग पाडणे व विरोधकांचे खच्चीकरण करणे हा उचित प्रकार नाही. लोकशाहीमध्ये सत्ताधारी जेवढे महत्त्वाचे आहे तेवढेच विरोधकदेखील अत्यंत महत्त्वाचे असतात. जर विरोधकच नसतील तर अराजकता माजून हुकूमशाही, ठोकशाहीची, मनमानीची बीजे रोवली जाऊन सामान्य नागरिक भरडण्याची चिन्हे दिसून येतात. राष्ट्रप्रेम, राष्ट्रधर्म, हिंदूत्व यांसारख्या कल्पनांची पेरणी करीत असताना महागाई, बेरोजगारी, गरिबी, भूक, आर्थिक विषमता यांसारख्या समस्या सोडविण्यासाठी आग्रही भूमिका सत्ताधाऱ्यांची असायला हवी. ही स्थिती सध्या नसल्यामुळे, भारतीय जनता पक्षाचा यात कसोटीचा काळ असेल यात शंका नाही.
– दुशांत बाबूराव निमकर, गोंडपिपरी (जि. चंद्रपूर)
विश्वबंधुत्वासाठी वैचारिक, बौद्धिक कष्ट हवे
‘विश्वधर्म, विज्ञान आणि वंशाभिमान..’ हा राजा देसाई यांचा लेख (रविवार विशेष – ३० ऑक्टोबर) आणि ‘विविधता आकळून घेणारे विवेकानंद’ ही समर्पक प्रतिक्रिया (लोकमानस- ३१ ऑक्टो.) वाचली. वैचारिक, बौद्धिक कष्ट घेऊन कोणत्याही गोष्टींच्या मुळाशी जाण्याची आपली तयारी नसते किंवा काही वेळा क्षमता नसते हे खरेच. म्हणूनच राजकारणी धर्माचे खेळणे आपल्या हातात देऊन आपल्याला झुलवत ठेवू शकतात. तसेच भोंदू धर्मकारणी आपल्याला भीती दाखवून कह्यात ठेवू शकतात. पण आपल्याला स्वत:ला असे कष्ट घ्यायचे नसतील तर निदान असे कष्ट घेऊन काही ज्ञान प्राप्त केलेल्या विवेकानंदांसारख्या बुद्धिमान दीपस्तंभांना तरी आपण डोळसपणाने अनुसरू शकतोच ना! त्यांचे गुरू श्रीरामकृष्ण यांनी हिंदू धर्माव्यतिरिक्त इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माचा काही एक अनुभव घेऊन सर्व धर्म एकाच सत्याकडे नेणारे वेगवेगळे मार्ग असल्याची ग्वाही दिली होती. (www.ramakrishnavivekananda. info)) हा विचार ‘आपलाच धर्म श्रेष्ठ’ वगैरे कल्पनांपेक्षा वेगळा आहे!
स्वत:ला इतरांपेक्षा वरचढ ठरविण्याकरता आपल्याला धर्म, जात, कधी पैसा किंवा प्रतिष्ठा यांच्या कुबडय़ा लागतात का? विवेकानंद, संत ज्ञानेश्वर इत्यादींचे, वेदांतातील एकत्वाच्या रसरशीत ज्ञानाने पुष्ट झालेले विश्वबंधुभावाचे विचार पुन्हा आपल्यासमोर ठळकपणे येण्याची गरज आहे. पण ते करताना आधुनिक बुद्धिवाद्यांनी जबाबदारी दाखवणे गरजेचे आहे. अंधश्रद्धा, धर्माधता नाकारताना आपण जीवनाला ऊर्जा देणाऱ्या श्रद्धेवरच घाव घालत नाही ना याचाही विचार व्हावा.
– के. आर. देव, सातारा
आपण फक्त टाळय़ा वाजवायच्या!
लोकानुनयाची सवंग स्पर्धा सर्वत्र सुरू असल्याचे या दिवाळीत दिसले! दिवाळीनिमित्त कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरकरांना दिवाळीत वाहतूक नियमांतून सर्व वाहनचालकांना ‘विशेष सूट’ दिली. रहदारीचे नियम तोडणाऱ्या बेफाम व बेजबाबदार वाहनचालकांना दिवाळीच्या चार दिवसांत वाहतूक नियम, सिग्नल यंत्रणा व वाहतूक पोलिसांना मंत्रिमहोदयांनी हास्यास्पदच केले. राज्याचे एक मंत्रीच नागरिकांना बेफाम वागण्यास प्रोत्साहन देतात, हे पूर्णत: विवेक हरवल्याचे लक्षण आहे. गुजरात राज्याने हीच सवंग सवलत दिवाळीत संपूर्ण गुजरात राज्यासाठी जाहीर केली. देशातील बहुसंख्य राज्यकर्ते वैचारिक दिवाळखोरीचे प्रदर्शन करत नागरिकांना कायदा पाळू नका सांगण्यात व त्यापायी मतांची बेगमी करण्यात मग्न झाले, निरपराध नागरिकांना अपघाती मृत्यूंकडे आपण ढकलत आहोत हेच विसरून गेले.
महाराष्ट्रात वर्षभरात साधारण १२,००० नागरिक रस्ते अपघातांत प्राण गमावतात, तर देशात सरासरी दीड लाख नागरिक रस्ते अपघातात मृत्युमुखी पडतात हे आपल्याला लज्जास्पद आहे. आपण आधीच कायदे पाळायचे नाहीत किंबहुना भारतीयांना कायद्यांची भीतीच राहिलेली नाही. अशा भयानक परिस्थितीत राज्यकर्तेच नागरिकांना कायदे मोडण्यास प्रोत्साहन देत असतील तर काही बोलायलाच नको. राज्यकर्तेच मुडदेफरास झाले. आपण फक्त टाळय़ा वाजवायच्या.
– शिशिर शिंदे, मुलुंड (मुंबई)