तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या जीवन, कार्य आणि विचारांचे विश्लेषण करताना एक गोष्ट लक्षात येते की, परंपरा, प्रबोधन आणि परिवर्तन या त्रिसूत्रीतून ते विकसित होत राहिले. परंपरेबद्दल त्यांच्या मनात आदर, श्रद्धा असली तरी ती कालसंगत झाल्याशिवाय तिला अर्थ राहात नाही, असे ते मानत. त्यामुळे परंपरांची कूस बदलायची तर प्रबोधनास पर्याय नाही, अशी त्यांची ठाम धारणा होती. प्रबोधनातूनच परिवर्तन शक्य आहे, यावरही त्यांचा दृढ विश्वास होता. संत, नेते, माहात्मे समाजास वंदनीय तेव्हाच ठरतात, जेव्हा ते नवा विचार आचारातून देत नवसमाज निर्मितीस हातभार लावतात.

त्यांचे असे म्हणणे होते की, संतांनी केलेल्या चळवळी वा व्यक्त केलेले विचार हा मानवी विश्व नव्याने घडविण्याचा ध्यास होता. जुने बदलणे ही व्यक्तीची जबाबदारी असते, हे मध्ययुगात माहीत नव्हते. सामाजिक संस्थांवर सारी भिस्त होती. सामाजिक विश्वाची जबाबदारी माणसावरच असते. याची जाणीव मानवास प्रकर्षाने झाली ती आधुनिक काळात. परिवर्तनासाठी मानसिक सामर्थ्य आणि वर्तनक्रमाची आवश्यकता असते, हेही आज मानवास उमगले आहे. मानवी सामर्थ्य आणि वर्तनक्रम दोन प्रेरणांच्या अधीन असतात. परमसत्याची जिज्ञासा व विश्वव्यापी प्रेम या त्या प्रेरणा होत. हीच माणसाची खरी आध्यात्मिक शक्ती असते. हेच माणसाचे दिव्यत्व होय. माणूस विषयवासनेपासून जितका दूर जातो, तितके वैराग्य त्याच्या दृष्टिपथात येते. जितके प्रखर वैराग्य तितकी प्रबळ जीवनेच्छा! मानवतावादी जीवन ही वैराग्य कसोटी. निवृत्तीवाद हा व्यापक मानवतावाद होय. तो मानवी मूल्य जाणिवेतून निर्माण होतो. बौद्ध, जैन, ख्रिाश्चन धर्मांचा इतिहास हा सामाजिक प्रवृत्ती विकासाचा इतिहास आहे. आज वर्तमानास मानवव्यापी नव्या चळवळीची अपेक्षा आहे.

हेही वाचा :उलटा चष्मा : मोनालिसाचे रुदन

सामाजिक परिवर्तनाची कोणतीही चळवळ असो, तिचा पाया परिवर्तनाचा ध्येयवाद हा असला पाहिजे, असे तर्कतीर्थांचे मत होते. कोणतीही चळवळ मानवी ऐक्याच्या स्फूरणाने व्यापलेली असेल, तरच ती यशस्वी होते, यावर त्यांचा प्रचंड विश्वास होता. कोणतीही चळवळ सामाजिक सुधारणावाद असत नाही किंवा क्रांतिवादही असत नाही, ती असते सामाजिक स्वास्थ्याचा ध्येयवाद. स्वास्थ्य अथवा अस्वास्थ्य यापेक्षा अधिकतर उच्च साध्य शीलवान स्वभाव (चरित्र) असतो. चारित्र्याशिवाय माणूस जगावर विजय मिळविण्यात यशस्वी होत नाही. स्वास्थ्य झुगारून देऊन प्रसंगी माणसास उच्चतर जीवनासाठी अस्वास्थ्याची पराकाष्ठा झालेल्या संग्रामात जगण्याची तयारी ठेवावी लागते. विश्वविजय हे मूलत: न संपणारे ध्येय होय. स्वास्थ्य आणि अस्वास्थ्याचे द्वंद्व त्याकरिता माणसास सहन करावे लागते. मानवी स्वभाव शीलवान करणे, हे चळवळीचे प्रमुख लक्ष्य असते.

संत चळवळ आणि राजकीय चळवळ यात मूलभूत अंतर असते. राजकीय चळवळीत नैतिकतेचे असावे तितके गांभीर्य असत नाही. ती चळवळ शास्त्रीय सत्याचा पाठपुरावा करत नसते. विशिष्ट हेतू साध्य करण्यासाठी शास्त्रीय सत्याकडे कानाडोळा करण्याची या चळवळीची प्रवृत्ती असते. सामाजिक क्रांतीच्या चळवळीसाठी निर्वाणीच्या त्यागाची गरज असते, किंबहुना ती तिची पूर्वअट असते. शाश्वत नैतिक मूल्यांच्या बाबतीत क्रांतिवादी मनुष्य सापेक्षतावाद मानतो. त्यामुळे क्रांतीची साधना हेच वरिष्ठ मूल्य ठरून, ते शाश्वत नीतीला दृष्टिआड करते. संतांच्या चळवळीचे नीती हेच सर्वस्व असते. नीती हाच त्यांच्यालेखी परमार्थ असतो, ठरतो. त्या परमार्थाच्या पायावर सामाजिक चळवळ उभी राहिली तरच ती तरेल. परमार्थावाचून मानवी संसार असार होऊन उद्ध्वस्त होईल, याचे भय संतास असते.

हेही वाचा :लोकमानस : वृक्ष, रस्ते, कचरा सारे काही गायब

महात्मा गांधी संत होते की राजकारणी, याचा निर्णय भले भले करू शकले नाहीत. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे हे विचार म्हणजे त्यांना झालेला मानवतावादी मूल्यांचा साक्षात्कारच होय. तो आज आपणास होण्याची अनिवार्यता निर्माण झाली आहे, हे मात्र खरेच!

डॉ. सुनीलकुमार लवटे

drsklawate@gmail.com

Story img Loader