सुरुवातीला शिक्षणाचा प्रसार सर्वदूर नव्हता तेव्हा विशिष्ट समूहातलाच मध्यमवर्ग होता. कालांतराने शिक्षण वाढले, सुविहितपणे जगण्यासाठी सरकारी नोकरीला पर्याय नाही अशी धारणा बळावली. वेगवेगळ्या जातीतील तरुणांमध्ये शिकून नोकरी करण्याकडे कल वाढला. शासकीय स्तरावर, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नोकरी मिळणे म्हणजे जणू सुरक्षित जगण्याची हमी अशी खात्री बळावली. नोकऱ्यांच्या संधी वाढल्या, मध्यमवर्गाचा पैसही विस्तारला. हळूहळू भिन्न समाज घटकातील आर्थिक सुस्थापितांचा यात समावेश होऊ लागला. पांढरपेशीकरणाची प्रक्रिया ही अशी विस्तारत गेली. आजचा मध्यमवर्ग हा भिन्न जाती समूहांतला असला तरी त्याचं वर्तन मात्र एकसाची आहे. त्यातही आधीच्या पिढीत जगण्याच्या गरजा जेमतेम भागवणाऱ्या कनिष्ठ मध्यमवर्गीयांची पुढची पिढी ही वर्गांतराच्या प्रेरणेने एवढी झपाटलेली की सुरक्षित आणि खात्रीशीर मिळकतीच्या शाश्वतीनंतर जीवनशैली तर बदललीच पण जगण्याच्या धारणाही झपाट्याने बदलल्या. स्वत:त मश्गूल असणं, स्वत:वर लुब्ध असणं हे या जगण्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य! साधारणपणे गेल्या शतकाच्या संधिकाली उदयाला आलेल्या या वर्गाचं गेल्या पंचवीस वर्षातलं चरित्र हे ओळखताही येऊ नये इतपत बदललं. एक- एक परगणा जिंकत जावा आणि तरीही हातून काहीतरी निसटत चालल्याची भावना दाटून घ्यावी असा हा या मध्यमवर्गाच्या स्थित्यंतराचा काळ… बदलत्या काळात नात्यांचा पोत उसवणं, संबंधांचे धागे तटातटा तुटत जाणं आणि व्यक्ती व समष्टी यांच्यातल्या अद्वैताला उभी भेग पडणं, तडा जाणं अशा सगळ्या काळाचं हे स्थित्यंतर आहे. प्रचंड महत्त्वाकांक्षेनं झपाटलेल्या माणसातली संवेदना आटल्यानंतर त्याला सहसंबंधांची आवश्यकताच वाटत नाही, एकट्यानंच पुढे पुढे जात राहणं एवढी एकच यंत्रवत अशी गोष्ट या पळापळीमागे उरते. आधीची कनिष्ठ मध्यमवर्गाची छोटी छोटी स्वप्नं आणि ती पूर्ण करण्यासाठी करावा लागणारा जीवतोड संघर्ष, जमाखर्चाची तोंडमिळवणी करतानाचा आटापिटा यातलं कारुण्यही अनेक कथा कादंबऱ्यांमधून वाचायला मिळतं. ही गोष्ट जरा त्या पुढची. जागतिकीकरणानंतरच्या उंबरठ्यावरचा मध्यमवर्ग, त्यापुढचा उच्च मध्यमवर्ग हे टप्पे अलीकडचे. ‘क्लायंट्स’ म्हणून माणसाचं वस्तूकरण होण्याचा हा काळ. जगण्यासोबतच भल्या- बुऱ्याची चाड बाळगण्याचा विवेक गळून पडण्याचे हे दिवस. आत्ममश्गूलता ही या जगण्याची खासियत!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा