धर्मसुधारणा चळवळीतील वैयर्थ लक्षात घेऊन एकदा चिंतामणराव वैद्य तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना म्हणाले होते, “अरे बाबा, ही दगडी भिंत आहे, यावर उगाच का डोके आपटतोस?” त्यांचे म्हणणे शिरोधार्य मानत तर्कतीर्थ धर्मसुधारणांचा आग्रह सोडून स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय होतात. त्याची; एक पार्श्वभूमी अशी असते की, तळेगाव दाभाडे येथील प्रा. वि. गो. विजापूरकर यांच्या राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या समर्थ विद्यालयावर ब्रिटिश सरकारने बंदी घातल्यामुळे तेथील शिक्षक व विद्यार्थी तसेच वातावरण असलेल्या आणि त्याच स्वरूपाचे शिक्षण देणाऱ्या वाईच्या प्राज्ञपाठशाळेत दाखल होतात. त्यामुळे वेदशाळा असलेल्या प्राज्ञपाठशाळेचे रूपांतर राष्ट्रीय शाळेत होते. ही शाळा आधुनिक, अध्यात्मवादी, सुधारणावादी, सशस्त्र क्रांतिवादी होते. येथील अध्यात्मवाद व क्रांतिवाद हा योगी अरविंदप्रणीत विचारसरणीवर आधारित होता. १९३०च्या कायदेभंग चळवळीत प्राज्ञपाठशाळेतील अनेक विद्यार्थी आणि शिक्षकांनी उडी घेतली. तर्कतीर्थही त्यांच्याबरोबर कायदेभंगाच्या चळवळीत सक्रिय झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> अग्रलेख : ‘मौसम’ है आशिकाना…

सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी तर्कतीर्थांनी भाषणे दिली, पैकी कराड येथे आठवडाभर दिलेल्या भाषणांचा परिणाम ब्रिटिशविरोधी लोकक्षोभ वाढण्यात झाला. ब्रिटिशांनी भाषणे देणाऱ्या काकासाहेब गाडगीळ, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, श्री. शं. नवरे प्रभृतींना येरवडा कारागृहात बंदी बनविले. तुरुंंगातून सुटून येताच तर्कतीर्थ कायदेभंग चळवळीत परत सक्रिय झाले. संगमनेरला त्यांनी कार्यकर्ते तयार करण्यासाठी शिबीर आयोजित केले. त्यात २०० ते २५० कार्यकर्ते सहभागी झाले; पण ब्रिटिश कलेक्टरने शिबीर बंद पाडले. त्यानंतर असेच शिबीर नाशिक जिल्ह्यातील बागलाणजवळ आयोजित केले. त्याला शंकरराव देव यांनी मार्गदर्शन केले होते. या वेळी परत अटक करण्यात येऊन धुळे कारागृहात पाठविण्यात आले. सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा दिली होती; पण महात्मा गांधींनी कायदेभंगाची चळवळ मागे घेतल्याने सरकारने सर्व कैद्यांना मुक्त केले.

हेही वाचा >>> तर्कतीर्थ विचार : धर्मनिर्णय पद्धती व समाजहित

महात्मा गांधी आणि आयर्विन यांची चर्चा फिसकटल्याने महात्मा गांधींनी परत कायदेभंगाची सुरुवात केली. या वेळी सन १९३२ ला तर्कतीर्थांनी आदिवासींचे मोठे संघटन करून बागलाणला जंगल सत्याग्रह घडवून आणला. तो इतका मोठा होता की, ‘ब्रिटिश इंटेलिजन्स रिपोर्ट’मध्ये त्याचे वर्णन ‘मिनी बार्डोली’ असे करण्यात आले होते. तर्कतीर्थ या काळात ‘महाराष्ट्र वॉर कौन्सिल’चे सदस्य होते. या सत्याग्रहप्रसंगी ब्रिटिशांना गोळीबार करावा लागला. तर्कतीर्थ फरार झाले. जंगलात त्यांची शाल आढळल्याने आणि ते न सापडल्याने त्यांच्या मृत्यूची अफवा पसरली. वाईत कृष्णा घाटावर चक्क नारायणशास्त्री मराठे यांच्या अध्यक्षतेखाली श्रद्धांजली सभा संपन्न झाली. काही दिवसांनी फंदफितुरी झाली आणि तर्कतीर्थांना कळवण (जि. नाशिक) येथे अटक करून परत धुळे तुरुंगात रवानगी करण्यात आली. या वेळी तर्कतीर्थांबरोबर धुळे तुरुंगात आचार्य विनोबा भावे, जमनालाल बजाज, द्वा. भ. कर्णिक, भाई पुरुषोत्तम त्रिकम, साने गुरुजी, गुलजारीलाल नंदाप्रभृती मान्यवर होते. तर्कतीर्थ तुरुंगात उपनिषद शिकवीत. ते अत्यंत आधुनिक विचारांनी भरलेले असायचे. याच काळात तर्कतीर्थांचा परिचय द्वा. भ. कर्णिकांमुळे मार्क्सवादाशी झाला. तर्कतीर्थांनी तुरुंगात ‘मॅनिफेस्टो’ वाचला आणि त्यांच्यात वैचारिक परिवर्तन झाले.

तर्कतीर्थांचा ओढा इंग्रजी वाचनाकडे वळला. स्पेन्सर, बकल, मार्क्स वाचत संस्कृत पंडितांचे रूपांतर पाश्चात्त्य तत्त्वज्ञानी म्हणून केव्हा झाले, हे त्यांचे त्यांनाच कळले नाही. तेन, मिलच्या ऐतिहासिक कृती वाचल्या. तुरुंगात ते धर्मग्रंथांचे विवेचन आधुनिक पद्धतीने करत. अस्पृश्यता निर्मूलनाचे शास्त्रातील आधार ते समजावून सांगत. त्यांच्या प्रतिपादनाचे नवेपण सर्वांचे आकर्षण झाल्याची नोंद जमनालाल बजाज यांनी करून ठेवली आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी ही गोष्ट महात्मा गांधींपर्यंत पोहोचवलीच, शिवाय महात्मा गांधींनी तर्कतीर्थांना बोलावून घेऊन त्यांच्याशी चर्चा करावी असेही सुचविले. त्यामुळे धुळे तुरुंगातून सुटताच तर्कतीर्थांनी येरवडा तुरुंगात जाऊन महात्मा गांधींची भेट घेतली आणि त्यामुळे अस्पृश्यता निर्मूलन कार्यास नवी दिशा मिळाली.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Religious reform became active in indian freedom movement zws