शतकापूर्वी पाप-पुण्य, पतित-पवित्र इ. भेदांबाबतची कर्मठता विवाह, धर्मांतर इत्यादी बाबींच्या कर्मठतेइतकीच सनातन, शब्दप्रमाण, रूढीबद्ध होती. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी याबाबतही वेळोवेळी झालेल्या धर्मसभा आणि संमेलनांमधून धर्मसुधारणा आणि समाजपरिवर्तनसंबंधी आपला पुरोगामी आग्रह निकराने चालू ठेवल्याने हळूहळू त्यांच्या विचारांचे समर्थक निर्माण झाले. त्यामुळे काशीच्या अखिल भारतवर्षीय ब्राह्मण महासंमेलनातील वाढत्या हेकेखोरपणाचा निषेध करत तर्कतीर्थांनी काशीच्या टाऊन हॉलमध्ये जाहीर सभेचे आयोजन केले होते. त्यास ३०हून अधिक धर्मपंडित उपस्थित होते. त्यांत बनारस हिंदू विश्वविद्यालयाच्या संस्कृत महाविद्यालयाचे प्रिन्सिपॉल प्रमथनाथ तर्कभूषण, महामहोपाध्याय देवीप्रसाद कविचक्रवर्ती, धर्मशास्त्राचार्य राधाप्रसाद प्रभृती मान्यवरांचा सहभाग होता, याची नोंद घेतली पाहिजे.

पतिताच्या शुक्रापासून उत्पन्न झालेल्या संतती त्याकाळी पतित मानल्या जात. यातही स्त्री-पुरुष भेद पाळला जात असे. म्हणजे पतित संतती मुलास मानले जाई, मुलीस नाही. कारण, ती दुसऱ्याच्या घरात (विवाहाने) जावयाची असते. पतित पुत्रास इच्छा असल्यास त्रैवार्षिक व्रताच्या तृतीयांश प्रायश्चित्त द्यावे लागे. या विरुद्ध तर्कतीर्थांनी अनेक सभा, संमेलनात आवाज उठविला; पण शक्य तितक्या अनुदार आणि कृपणदृष्टीनेच विचार करण्याचा ज्यांचा पण होता, त्यांना इतक्या लवकर नवे विचार आणि परिवर्तन पटणे व गळी उतरणे शक्य नव्हते.

हेही वाचा >>> लोकमानस : आम्ही गावकी, भावकी कधीच सोडली

मुस्लीम, ख्रिाश्चन इत्यादी कथित म्लेच्छ व चांडाळ यांबाबत तत्कालीन पारंपरिक, कर्मठ धर्मपंडित दुराग्रही असत. काशीच्या उपरोक्त महासंमेलनातील एका निर्णयानुसार, ‘‘हल्लीचे मुसलमान, ख्रिाश्चन इत्यादी म्लेच्छ व चांडाळ हे अस्पृश्य आहेत. देवालये, सभास्थाने इत्यादी स्थळी त्यांना येऊ देणे अधर्म्य आहे. विहिरी इत्यादी ज्या जलाशयास त्यांच्या भांड्यांचा स्पर्श झाला आहे, त्याठिकाणी स्पृश्य जातींनी पाणी भरणे शास्त्राविरुद्ध आहे. या शास्त्र मर्यादेचे पालन अवश्य केले पाहिजे,’’ असा ठराव संमत करण्याचा घाट घातला जात असताना तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी सदर महासंमेलनात या निर्णयाविरुद्ध अनेक शास्त्रवचने असल्याचे दाखवून दिले. याबाबतचा सविस्तर वृत्तांत तर्कतीर्थांनी साप्ताहिक ‘केसरी’मध्ये ‘निर्णयांची शास्त्रशुद्धा’ नामक लेखमाला लिहून जनतेसमोर मांडला. त्यामुळे सनातन दृष्टिकोनाविरुद्ध जनमत संघटित होण्यास साहाय्य झाले. पुढे १९३३ मध्ये महात्मा गांधींनी अस्पृश्यता निर्मूलन मोहीम हाती घेतली, तेव्हाही पारंपरिक दृष्टिकोन विरोधी शास्त्रवचने लक्षात आणून देण्याचे ऐतिहासिक सुधार कार्य तर्कतीर्थांनी केले.

परिणामी, भारतीय समाज मानसावर धर्माचा पगडा राहिला, तरी सामाजिक जीवनाचा साचा पृथकच राहिला. हिंदू आणि मुसलमान यांच्या संस्कृतींची घडण धर्मप्रेरित राहिली आहे. त्यामुळे राजकारण आणि अन्य संबंध त्यांना एका सूत्रात गोवू शकले नाहीत हे वास्तव आहे. कारण, धर्मव्यवस्था समाज मानसात खोलवर रुजलेली आढळते. इथे संतांनी आपल्या साहित्याद्वारे परधर्मसहिष्णुता रुजविली खरी; पण धर्मभिन्नतेने इथल्या सामाजिक पृथकत्वास भक्कम रीतीने रोखून ठेवल्याचे निरीक्षण नोंदविण्यास तर्कतीर्थ विसरत नाहीत. कोणताही आचार-विचार जितका विज्ञानावर प्रतिष्ठित असतो, तितका तो उन्नत असतो, यावर तर्कतीर्थांचा विश्वास होता. भौतिक कार्यकारणभाव सांगणारी विज्ञाने धर्मविद्योपेक्षा श्रेष्ठ असतात, अशी तर्कतीर्थांची पक्की धारणा होती. मनुष्याचे सृष्टीबद्दलचे ज्ञान जितके वाढते, त्यामानाने सृष्टीवर त्याची सत्ता वाढते. जेव्हा सृष्टीवरील सत्ता वाढण्यास अनुकूल अशी समाजरचना तयार होते, तेव्हा समाजातील पारलौकिक, अदृष्टवादी, देववादी व दैववादी विचारसरणी क्षीण होत जाते व मर्यादित होत जाते. परलोक, अदृष्ट व अलौकिक दिव्यशक्ती यांची कल्पना हाच धर्माचा महत्त्वाचा आधार असतो, हा आधार जितका मोठा, तितके अज्ञानही मोठे असते, हे तर्कतीर्थांनी परोपरीने सांगितले आहे.

drsklawate@gmail.com

Story img Loader