भारतीय समाजव्यवस्थेत एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात स्वातंत्र्य चळवळ, समाजसुधारणा, धर्मसुधारणांचे वारे वाहू लागले. महाराष्ट्रात लोकहितवादी देशमुख, महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, स्वामी दयानंद सरस्वती, ‘सुधारक’कार आगरकर प्रभृतींनी सत्यशोधक समाज, महाराष्ट्र समाज, ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, थिऑसॉफिकल सोसायटी इत्यादींच्या कार्य आणि विचारमंथनातून समाजात विविध स्तरांवर सुधारणा झाल्याशिवाय समाज आधुनिक व पुरोगामी होणार नाही, हे दाखवून दिले होते. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात टिळक युगाचा अस्त आणि गांधी युगाच्या उदयाने या सुधारणांना गती आली.
शब्दप्रामाण्य, वेदांचे अपौरुषत्व, शंकराचार्यांचे अलौकिकत्व इत्यादी बाबींवर धर्मसुधारकांनी कितीही कंठशोष केला तरी वाई, पंढरपूर इत्यादी तीर्थक्षेत्रे हिंदू धर्माच्या रूढींची मुळे अजिबात सैल करण्यास तयार नसत, हे तत्कालीन ब्राह्मण सभा, धर्मपरिषद, धर्मसंमेलने, धर्मपंडितांचे शास्त्रार्थ वादविवाद यांतून स्पष्ट होत होते. प्राज्ञपाठशाळा, वाईचे संस्थापक स्वामी केवलानंद सरस्वती, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, डॉ. केशव लक्ष्मण दफ्तरींसारखे पुरोगामी धर्मपंडित अशा सार्वजनिक धर्मसभा, संमेलनांतून सुधारणांची आग्रही मागणी व पुरस्कार करत. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींसारखा तरुण शिक्षक हाती घेऊन काशी, कलकत्ता येथून धर्मसुधारणांचे निरीक्षण व भारतीय परिदृश्य अनुभवून प्राज्ञपाठशाळेत शिक्षक म्हणून रुजू झाल्यावर स्वामी केवलानंद सरस्वतींना वेगळेच स्फुरण चढणे स्वाभाविक म्हणावे लागेल.
या दरम्यान, तर्कतीर्थ प्राज्ञपाठशाळेत शिक्षक म्हणून दाखल होण्याच्या प्रारंभीच्या काळातच १९२३ला संपन्न ब्राह्मण सभेत ब्राह्मण पोटजातींमध्ये (कोकणस्थ, देशस्थ, कऱ्हाडे, देवरुखे, द्रविड, गौड, सारस्वत, कान्यकुब्ज, चित्पावन इ.) परस्पर विवाह होऊ शकतात का, यावर गंभीरपणे विचारविमर्ष होत असे. आज हे हास्यास्पद वाटले तरी शतकापूर्वी तो अस्मितेचा मुद्दा होता. तर्कतीर्थ विचारांचे औचित्य यासंबंधींच्या वर्तमान समाजमानसाच्या प्रतिबिंबात आजही पाहता येते. रोहिणी मासिक, वृत्तपत्रांतील विवाहविषयक जाहिराती, आजही होणारे एकजातीय विवाह मेळावे, वधू-वर सूचक मंडळांतील प्रस्ताव, अशा संकेतस्थळांवरील जाहिराती काय सांगतात?
वाईत १९२३ ला झालेल्या ब्राह्मण सभेत आणि नंतर पुढे १९२८ मध्ये संपन्न झालेल्या अखिल भारतवर्षीय ब्राह्मण महासंमेलन, काशी (१९२८) मध्ये एवढा काळ लोटला तरी परिवर्तन दिसत नाही. ‘पोटजातीचा विवाह शास्त्रीयदृष्ट्या निंद्या होय,’ असा निर्णय दोन्ही ठिकाणी झाला; पण समर्थक सनातनी पंडितांना स्मृतीतील वचने आधार म्हणून सादर करता आली नाहीत. उलटपक्षी तर्कतीर्थांनी उपरोक्त सभा, संमेलनांत ‘दत्तकदीधिती’, ‘दत्तकतिलक’, ‘दत्तकसिद्धांतमंजरी’ इ. ग्रंथांत परस्पर दत्तकविधान होत नाही असे म्हटले आहे, एवढ्या पुराव्यावरून पोटजातींमध्ये परस्पर विवाह होऊ शकत नाही, असा निष्कर्ष रूढींच्या आधारे देण्यात आला, हे दाखवून दिले. अशा चर्चांत श्रुतीस्मृतिपुराणांचा आधार असल्यास मानावे, म्हणजे त्यांचे प्रामाण्य विचारविधया होईल, उपदेशविधया नाही, हे त्यांनी स्पष्ट केलेच, शिवाय नंतर अनेक नियतकालिके आणि वृत्तपत्रांमध्ये लेख लिहून तर्कतीर्थांनी यावर प्रकाश टाकला आहे.
आता हे सर्व विचारधन ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाङ्मय’ रूपाने जिज्ञासूंना वाचण्यास उपलब्ध झाले आहे. ते वाचताना लक्षात येते की, १९२३ ते १९३३ या दशकात तर्कतीर्थांनी धर्मसुधारणांसंबंधी विविध प्रश्न उपस्थित करून धर्माचरण, रूढी, परंपरांचा पुनर्विचार करण्याचा आग्रह धरला. त्यामुळे आंतरजातीय विवाह पुढील काळात रूढ होण्यास साहाय्य झाले. महात्मा गांधींनी स्वानुभवावरून (पुत्र देवदास विवाहाच्या संदर्भाने) अशा विवाहांचा पुरस्कार करून जनमत परिवर्तनास हातभार लावला. तर्कतीर्थांनी संमती वयवर्धन, कन्या विवाहवय, धर्मबहिष्कृतांची शुद्धी, पातकांचे प्रायश्चित्त सुलभ व सुगम करणे, शब्दप्रामाण्याऐवजी बुद्धिप्रामाण्याचा पुरस्कार करणे यासाठी प्रयत्न केले. वेद अपौरुषेय नसून, पौरुषेय (मानवनिर्मित) आहेत, असे आग्रही प्रतिपादन व लेखन वेळोवेळी करून जी समाजमनाची मशागत केली, ती त्यांना परिवर्तनवादी शास्त्री ठरवते. आज गरज आहे ती तर्कतीर्थ विचार वर्तमानात उदारपणे आचरणात आणण्याची.
– डॉ. सुनीलकुमार लवटे
drsklawate@gmail.com