सिद्धार्थ खांडेकर
बेदींसाठी ‘मूल्याधारित वागणूक’ हीच व्यावसायिकता होती.. त्यांनी हक्कांसाठी धरलेला आग्रह, ही इतरांच्या लेखी ‘बंडखोरी’ होती!
बिशनसिंग बेदींची कोणतीही मुलाखत पाहणे म्हणजे मनोरंजन असते. शब्दोच्चार फार स्पष्ट नाहीत, शब्दसंख्याही मर्यादित. पण जे सांगायचे, ते थेट आणि नि:संदिग्ध. आमच्या पिढीला त्यांची गोलंदाजी केवळ यू-ट्यूब किंवा जुन्या चित्रफितींमधूनच अनुभवता येते. पण त्या शैलीतली सौंदर्यस्थळे आजही अभ्यासण्याजोगी ठरतात. टी-२० क्रिकेटच्या सध्याच्या फास्ट ट्रॅक जमान्यात त्यांच्या हळुवार चालीतली चार षटकेही पूर्ण करण्यासाठी कर्णधाराची धावपळ झाली असती. पंचेचाळीसेक वर्षांपूर्वीच्या काळात बेदींच्या कसोटी कारकीर्दीची अखेर झाली. त्यानंतर क्रिकेटमध्ये आमूलाग्र बदल झालेत. आता तर टी-२० क्रिकेटच्या फैलावामुळे कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटसमोर भवितव्याचा प्रश्नच निर्माण झाला आहे. तरीदेखील बेदींच्या धूर्त डावखुऱ्या गोलंदाजीचे मूल्य कालौघात घटले असे ठामपणे म्हणता येत नाही. चेंडूला भरपूर उंची देत फलंदाजाला खेळपट्टीच्या सुरक्षित चौकटीबाहेर खेचण्याचे त्यांचे तंत्र आजही परिणामकारक ठरू शकते. कारण फलंदाजाने एखाद्या चेंडूवर लगावलेला षटकार हा त्याच्या बाद होण्याची नांदी ठरू शकतो असा गुरुमंत्र बेदींनीच जगाला दिला ना! फक्त त्या काळातील बेदींची हिंमत आणि सबुरी आजच्या किती गोलंदाजांच्या ठायी असेल हा खरा प्रश्न आहे. चेंडू फेकण्याच्या जरा आधीची त्यांची मुद्रा कोणत्याही पट्टीच्या नर्तकाशी स्पर्धा करेल अशीच. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल अॅथरटनने ‘द टाइम्स’मध्ये एका लेखातून अशाच मुद्रेतील बेदींच्या छायाचित्रामागील कथा विशद केली. केन केली नावाचा छायाचित्रकार चार वर्षे अचूक छायाचित्रासाठी धडपडत होता. बेदींना याचा अर्थातच पत्ता नव्हता. चार वर्षे खटपटून केलीने कॅमेराबंद केलेली बेदीमुद्रा खुद्द त्या अवलिया गोलंदाजाइतकीच कौतुकपात्र ठरली होती. बेदींसाठी सारे काही सहजक्रियेतून घडून आले होते. बेदींच्या गोलंदाजी शैलीमुळे परदेशात विशेषत: गोरे खेळाडू आणि विश्लेषक मंत्रमुग्ध व्हायचे. क्वचित त्या कौतुकात वसाहतवादी दर्पाचा शिरकावही व्हायचा. भारतात बेदींच्या शैलीकडे पाहून उसासे टाकले जाण्यासारखी परिस्थिती नव्हती. बेदींइतकेच किंवा कदाचित अधिक शैलीदार फिरकी गोलंदाज इथल्या मातीत खोऱ्याने निर्माण झाले. बेदींनी या असाधारण नैपुण्याला एतद्देशीयांपेक्षा अधिक प्रमाणात जागतिक परिमाण आणि प्रतिष्ठा मिळवून दिली असे म्हणता येईल. हे सर्व करत असताना, आपण कुणी निराळे आणि अभिजन आहोत असे त्यांनी कधीही भासू दिले नाही. त्यांच्या मते, शिस्तप्रिय जीवन जगल्यास, स्वनैपुण्यावर प्रेम केल्यास आणि मुख्य म्हणजे कटाक्षाने स्वत:चा आब राखल्यास जे रसायन तयार होईल त्याला बिशनसिंग बेदी किंवा इतर कोणतेही नाव देता येईल. त्यांनी कधीही स्वत:ची कहाणी साखरपेरणी करून इतरांना ऐकवली नाही. ‘तेव्हा मी जे बोललो ते अमुक भावनेतून बोललो. त्याबद्दल तेव्हा नि आता मला अजिबात विषाद वाटत नाही,’ असे ते अखेरपर्यंत ठासून सांगत राहिले.
हेही वाचा >>> अन्वयार्थ : महाराष्ट्राच्या जातगणनेचा प्रश्न
कौंटी क्रिकेटमध्ये बेदींइतक्या विकेट्स फार थोड्या फिरकी गोलंदाजांनी मिळवल्या. इंग्लंड, वेस्ट इंडीज, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात पहिला विजय मिळवणाऱ्या भारतीय संघातून ते खेळले आणि बहुतेकदा त्यांचे योगदान मोलाचे राहिले हा योगायोग नव्हता. बेदी-प्रसन्ना-चंद्रा-वेंकट या फिरकी चौकडीने मिळून १९६०-७०च्या दशकात ८५३ बळी घेतले. हे चौघे एकत्रितपणे मात्र एकाच सामन्यात खेळले. तरीही या सर्वांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय होते बेदीच. चौघांपैकी तिघे दाक्षिणात्य, तर बेदी हे एकमेव पंजाबी, उत्तर भारतीय. इतर तिघांच्या व्यक्तिमत्त्वामधील नेमस्तपणा बेदींमध्ये नव्हता. सर्वाधिक बळी बेदींनी मिळवले, तरी त्यांच्या वागण्या-बोलण्यात तेव्हा आणि नंतरही अभिजनवाद नव्हता. बेदी हे या सगळ्यांमध्ये उठून दिसले, कारण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या विविध थरांतील प्रशासकांना भिडण्याची धमक बहुतेकदा बेदींनीच दाखवली. १९७०च्या दशकात क्रिकेटजगतात काही बंडखोर क्रिकेटपटूंनी स्वतंत्र ठसा उमटवला. कॉलर टाइट करून, शर्टाची वरची बटणे उघडी टाकून मैदानावर मजेत नि माजात वावरण्याचा तो काळ. इयन चॅपेल, टोनी ग्रेग अशी काही नावे घेता येतील. मैदानावर अत्यंत लढवय्ये असे हे क्रिकेटपटू. ही मंडळी त्यांच्या-त्यांच्या देशात क्रिकेट चालवणाऱ्या व्यवस्थेशी लढली. या लढ्याच्या केंद्रस्थानी क्रिकेटपटूंना मिळणारी फुटकळ बिदागी हा प्रमुख मुद्दा होता. बेदींनीही तसाच संघर्ष येथील व्यवस्थेशी केला. पण गोऱ्यांचे पाहून नव्हे! व्यावसायिकता हे मूल्य भारतात, आशियात रुजण्यास काही काळ जावा लागला. बेदींसाठी व्यावसायिकता म्हणजे मूल्याधारित वागणूक होती. दिल्ली क्रिकेट संघटनेच्या एका बड्या प्रस्थाने समक्ष भेटीत अभिवादनाचा स्वीकार केला नाही, म्हणून बेदींनी संताप व्यक्त केला होता. तेव्हा त्यांचे वय होते अवघे १५ वर्षे! किमान सभ्यता अंगी असायला कितीशी किंमत मोजावी लागते हो, असा त्यांचा नेहमीचा सवाल असे. पाणी नसलेल्या होस्टेलमध्ये (हॉटेलमध्येही नाही!) निवासाची व्यवस्था करणे, ट्रेनच्या रिटर्न तिकिटाची व्यवस्थाच न करणे वगैरे प्रसंगांतून गेलेले बेदी हे एकटेच भारतीय क्रिकेटपटू कदाचित नसतील. पण या अव्यवस्थेविरुद्ध आणि अनास्थेविरुद्ध आवाज उठवणारे ते बहुधा एकमेव. याबद्दल त्यांना बंडखोर वगैरे म्हटले जाई. पण बेदींनी क्रिकेटपटूंच्या हक्कांसाठी आवाज उठवला, बंडखोरीसाठी नव्हे.
लढवय्या असूनही अंगी दिलेरपणा नसेल, तर क्रिकेटकडून आपण काहीही शिकलो नाही, असेही ते सांगत. यासाठीच आपल्याच गोलंदाजीसमोर चाचपडणाऱ्या प्रतिस्पर्धी फलंदाजाला स्वत:हून नेट प्रॅक्टिस देणारे बेदींसारखे फारच थोडे गोलंदाज क्रिकेटमध्ये होऊन गेले. मुंबई क्रिकेट, गावस्कर-वाडेकर यांच्यासारखे मुंबईकर क्रिकेटपटू यांच्याशी निकोप स्पर्धा करण्यात त्यांनी अभिमान बाळगला. दिल्लीसाठी मुंबईसमोर जिंकलेली दोन रणजी अजिंक्यपदे त्यांना आंतरराष्ट्रीय विजयांइतकीच मोलाची वाटत. गावस्कर यांच्याविषयी त्यांची काही मते होती. दोन अभिमानी व्यक्तिमत्त्वांचे सर्वच गुण आणि मते परस्परपूरक असतील, असे समजण्याचे काहीच कारण नाही. पण याच गावस्करांच्या नावावरून आपल्या पहिल्या पुत्राचे नाव बेदींनी ‘गावस इंदर सिंग’ असे ठेवले. हीच ती दिलेर वृत्ती!
हेही वाचा >>> बुकरायण : प्रयोगाची नवी कथावाट…
उत्तम फिरकी गोलंदाजी कशी जमते या प्रश्नाचे थेट उत्तर त्यांनी कधी दिले नाही. ‘मी क्रिकेट जगतो. त्याशिवाय वेगळे काही मला जमलेले नाही. तसा विचारही मनात आला नाही’ असे ते म्हणायचे. ‘लहानपणी कधीही उत्तम मैदानी खेळाडू नव्हतो. पण गोट्या उत्तम प्रकारे खेळायचो. त्यातून एकाग्रता आली. फिरकी गोलंदाजाची बोटे लवचीक हवीत. माझ्या बाबतीत विचाराल, तर स्वत:चे कपडे स्वत:च धुतल्यामुळे माझी बोटे लवचीक बनली…’ आजच्या काळातील किती क्रिकेटपटू इतक्या साधेपणाने स्वत:च्या यशाचे गमक कथन करतील? फिरकी गोलंदाजी ही अस्सल भारतीय कला. भारताने तिला प्रतिष्ठा दिली. तेज गोलंदाजीच्या बहराच्या काळात भारतीय फिरकीने जगभर तिरंगा फडकवत ठेवला. या लढाईतील सेनानी बेदी होते. जगभर त्यांनी बळी मिळवले, तरी शत्रू निर्माण केले नाहीत. इंग्लिश आणि ऑस्ट्रेलियन माध्यमांत त्यांच्याविषयी मृत्यूपश्चात भरभरून लिहून येते आहे. त्या अर्थाने बिशनसिंग बेदी हे जागतिक व्यक्तिमत्त्व होते. रोखठोकपणा, प्रामाणिकपणा, आस्वादकता या गुणत्रयीवर त्यांचा अखेरपर्यंत विश्वास होता. त्यामुळेच ‘चकिंग’ गोलंदाजी असो वा आयपीएलमधील किंमतबोली, बेदींनी कधीही यांविषयी सकारात्मक मत व्यक्त केले नाही. ‘इंग्रजीत इट्स नॉट क्रिकेट’ असे म्हटले जाते. इट्स नॉट फुटबॉल किंवा इट्स नॉट टेनिस असे म्हणत नाहीत. ते का? कारण क्रिकेट हा खेळ सभ्यता, प्रामाणिकपणा, मैत्रीभाव प्रसारणारा असतो. तीच जीवनशैली असायला कुणाचे काय बिघडते?’ असा त्यांचा बिनतोड सवाल. तो विचारणाराही संपला नि ती संस्कृतीही!