थोर होण्यासाठी आपली पाळेमुळे सोडून कुठेतरी दूर- परदेशात वसणे अपरिहार्य नसते. आपल्या मुळांशी सदैव बांधील राहूनही जगभर ठसा उमटवता येतो, हे सिद्ध करणारी काही व्यक्तिमत्त्वे असतात. पद्माश्री प्रा. अमिया कुमार बागची हे अशांपैकीच एक. राजकीय अर्थशास्त्र आणि अर्थशास्त्राचा इतिहास या विषयांचे तज्ज्ञ म्हणून जगभर ओळखले जाणारे प्रा. बागची मार्क्सवादी विचारांशी आणि कोलकात्याशीसुद्धा शेवटपर्यंत एकनिष्ठ राहिलेले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बागची यांचा जन्म १९३६साली मुर्शिदाबादमधील गावात झाला. मार्क्सवादातून आलेला बंडखोरपणा त्यांच्या स्वभावात भिनलेला होता. अन्यायाविरोधात आवाज उठविला म्हणून एक महाविद्यालय सोडावे लागल्यानंतर त्यांनी तुलनेने अधिक मुक्त वातावरण असलेल्या कलकत्त्यातील (आताचे कोलकाता) प्रेसिडेन्सी विद्यापीठात प्रवेश घेतला. तिथून पुढील शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केम्ब्रिज विद्यापीठात गेले. ट्रिनिटी महाविद्यालयात प्रवेश घेतला. १९६३ साली त्यांनी याच विद्यापीठातून ‘भारतातील खासगी गुंतवणूक’ या विषयात पीएचडी मिळविली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते कलकत्त्याला परतले आणि जिथून शिक्षण घेतले होते, त्या प्रेसिडेन्सी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. पुढे त्यांनी केम्ब्रिज आणि अमेरिकेतील कॉर्नेल महाविद्यालयातही काही काळ अध्यापनकार्य केले, मात्र १९६९मध्ये त्या नोकरीचा राजीनामा देऊन ते पुन्हा कलकत्त्याला प्रेसिडेन्सी महाविद्यालयात अध्यापन करू लागले.

हेही वाचा >>> व्यक्तिवेध : डॉ. अतुल वैद्या

प्रा. बागची हे चालती-बोलती संस्था म्हणून ओळखले जात. त्यांनी प्राध्यापक तापस मुजुमदार यांच्या साथीने ‘सेंटर फॉर इकॉनॉमिक स्टडीज’ची स्थापना केली. या संस्थेने देशाच्या अर्थकारणाला गती देणाऱ्या अर्थतज्ज्ञांच्या अनेक पिढ्या घडविल्या. ‘सेंटर ऑफ स्टडीज इन सोशल सायन्सेस’मधून २००१साली निवृत्त झाल्यानंतर लगेचच २००२मध्ये त्यांनी ‘इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट स्टडीज’, कोलकाता या संस्थेची स्थापना केली. २०१२मध्ये निवृत्त होईपर्यंत ते या संस्थेचे संचालक होते. २००५ साली त्यांना पद्माश्रीने सन्मानित करण्यात आले. प्रा. बागची यांची पत्नी जसोधरा बागची या स्त्रीवादी अभ्यासक होत्या.

प्रा. बागची यांनी ‘द प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट इन इंडिया’, ‘पेरिलस पॅसेज – मॅनकाइंड अँड द ग्लोबल असेन्डन्सी ऑफ कॅपिटल’, ‘द पोलिटिकल इकॉनॉमी ऑफ अंडरडेव्हलपमेंट’ अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली. पण त्यांचे वैशिष्ट्य हे की त्यांचा अर्थकारणासंदर्भातील अभ्यास केवळ सैद्धांतिक स्तरापुरता मर्यादित राहिला नाही. त्यांच्या कल्पना कधीही केवळ पुस्तकांच्या पानांत दडून राहिल्या नाहीत. त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेला आकार देण्यात सक्रिय आणि उल्लेखनीय योगदान दिले. दहाव्या पंचवार्षिक योजनेकरिता सरकारच्या वित्तीय स्थितीविषयीचा अहवाल सादर करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘बंगाल नियोजन मंडळा’चे ते २००५ पर्यंत सदस्य होते. १९९७ पर्यंत ते स्टेट बँक ऑफ इंडियाचे अधिकृत इतिहासकार होते.

कोणत्याही सच्च्या बंगाली व्यक्तीप्रमाणे प्रा. बागची यांचेही रवींद्रनाथ टागोरांच्या कवितांवर आणि एकंदरच काव्य, नाट्य, संगीतावर प्रेम होते. आज ना उद्या शोषणमुक्त समाज साकार होईल, यावर त्यांचा ठाम विश्वास होता. त्यासाठी ते शेवटपर्यंत कार्य करत राहिले. व्यक्तीच्या जाण्यानंतरही मागे उरते ते खरे शाश्वत कार्य. प्रा. बागची यांचे निधन झाले असले, तरीही त्यांच्या अनेक विद्वान विद्यार्थ्यांच्या आणि ‘इन्स्टिट्यूट ऑफ डेंव्हलपमेंट स्टडीज’च्या रूपाने त्यांनी आपल्या कार्याचा वारसा मागे ठेवला आहे.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Remembering economist amiya kumar bagchi zws