‘लिबरेशन थिऑलॉजी’ किंवा ‘मुक्तिवादी धर्मशास्त्र’ हा कॅथोलिक ख्रिास्ती धर्मातील पीडित-मुक्तीचा पुरोगामी विचार. ‘गरिबीचे कारण सामाजिक आहे’ तसेच ‘चर्चने धनाढ्यांच्या कह्यात जाऊ नये’ असे विचार मांडून या ‘लिबरेशन थिऑलॉजी’ने एक प्रकारे कॅथोलिक श्रद्धांना आव्हान दिले, असे मानले जाते… पण पुढे कॅथोलिकांनी याही विचाराचे स्वागत केले. ‘लिबरेशन थिऑलॉजीच्या निमित्ताने ख्रिास्ती मंडळी आहेरे आणि नाहीरे यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी झटत आहेत व म्हणून भांडवलशाहीच्या मक्तेदारांचा त्यांच्यावर रोष आहे’- असा निर्वाळा मराठीत, दिवंगत धर्मचिंतक फा. फ्रान्सिस दिब्रिटो यांनी दिला होताच, पण ‘या तत्त्वज्ञानाशी माझा परिचय होऊन त्याचा माझ्यावर प्रभाव पडला’ अशी कबुलीही फा. दिब्रिटोंनी नोंदवलेली आहे. गुस्ताव्हो गुटेरेस यांना या ‘लिबरेशन थिऑलॉजी’चे जनक मानले जाते. हे रेव्हरंड गुटेरेस २१ ऑक्टोबर रोजी वयाच्या ९६ व्या वर्षी निवर्तले.

हेही वाचा >>> अन्वयार्थ : राष्ट्रकुल स्पर्धेचा वाद… अकारण नि अवाजवी!

दक्षिण अमेरिकेतल्या पेरू या देशातले रेव्हरंड गुस्ताव्हो गुटेरेस हे १९२८ साली लिमा या राजधानीच्या शहरानजीक जन्मले. त्याच वर्षी ‘पेरूव्हियन सोशालिस्ट पार्टी’ची स्थापनादेखील झाली होती, हा निव्वळ योगायोग. एरवी लिमातील मध्यमवर्गीय कुटुंबांचा संबंध समाजवादी विचारांशी नव्हता, तसा गुटेरेस यांचाही नव्हता. किशोरवयात आजारपणाने ते जवळपास अपंग झाले, चाकाच्या खुर्चीला खिळले आणि वाचनाची गोडी वाढली. तत्त्वज्ञान आणि मानसशास्त्र हे विषय शिकून, १९५० च्या सुमारास ते युरोपात धर्मशास्त्र शिकण्यासाठी गेले. स्पेनखेरीज इटली आणि फ्रान्समध्येही शिकले. वैचारिक वैविध्याची ओळख तिथे झाली. हा काळ फ्रान्स/ इटलीतील विद्यार्थी-उठाव वगैरेंपेक्षा बराच आधीचा, पण फ्रान्सच्या लिआँ शहरात धर्मशास्त्राच्या विद्यार्थ्यांना सिग्मंड फ्रॉइड, कार्ल मार्क्स यांच्याही विचारांचा परिचय करून दिला जात असे. समाजवादी चळवळीने नव्हे, पण मार्क्सच्या ‘शास्त्रीय समाजवाद’ विश्लेषणपद्धतीने गुस्ताव्हो गुटेरेस प्रभावित झालेले असावेत.

हेही वाचा >>> उलटा चष्मा : डोंगर, झाडी, बंडले…

‘शेजाऱ्यावर प्रेम करा’ ही येशूची शिकवण. ती आज आपण विसरलो आहोत का, असा सवाल गुटेरेस यांनी धर्मगुरू म्हणून दहा वर्षे मायदेशात काम केल्यानंतर, १९६९ मधील एका कॅथोलिक धर्म परिषदेत जाहीरपणे उपस्थित केला. ती धर्म परिषद केवळ दक्षिण अमेरिकी देशांपुरती होती, स्पॅनिश भाषेत तिचे कामकाज चालले होते, तरीही या प्रकारच्या मांडणीने वाद झाले आणि तिथेच काही समविचारीही दिसून आले. धर्मातील ‘पाप-पुण्या’च्या, ‘दु:खभोगा’च्या विचारांचा वापर, आजच्या सामाजिक अन्यायाकडे डोळेझाक करण्यासाठी होता कामा नये, यावर या साऱ्यांचे एकमत असल्याचे पुढल्या काळात दिसूनही आले. १९७१ मध्ये ‘तिओलॉजि दे ला लिबरास्याँ’ची स्पॅनिश प्रत आली, तर १९७३ मध्ये तिचे इंग्रजी भाषांतरही आले. या पुस्तकात धर्मचर्चाच असली, तरी ती सामाजिक अंगाने केलेली आहे. यावरून झालेले वाद दुहेरी होते. म्हणजे धर्मवाद्यांनी या पुस्तकाला ‘कम्युनिस्ट’ ठरवले, तर डावे विचार अमान्य नसणाऱ्या स्त्रीवाद्यांनी ‘महिलांच्या दमनाकडे दुर्लक्ष केले’ अशी टीका केली. ‘लिबरेशन थिऑलॉजी’चे नाव घेणारी सामाजिक चळवळ पुढे काही दक्षिण अमेरिकी देशांत हिंसक झाली, पण असल्या प्रकारांशी आपला संबंध नसून बुद्धिनिष्ठ चर्चेशीच राहील, हे गुटेरेस यांनी स्पष्ट केले होते. त्यांना धर्मसंबंधित क्षेत्रात उचित बढत्याही मिळत गेल्या होत्या.