‘माझ्या कैदी बांधवांनो, कर्तव्यावर असलेल्या साऱ्या रक्षकांना चिरीमिरी चारून कारागृहाच्या कोपऱ्यातल्या आवारात तुम्ही एकत्र येण्याचे धाडस केले त्याबद्दल तुमचे आभार! एका गोष्टीसाठी पुन्हा अभिनंदन करायचे आहे व ती तुमच्या धाडसाशी संबंधित आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या गुन्हेनोंद विभागाच्या अहवालात कैदी पळून जाण्याच्या बाबतीत महाराष्ट्राने देशात पहिला क्रमांक पटकावला. सरकारच्या दृष्टीने भले ही अभिमानाची गोष्ट नसेल पण आपल्या दृष्टीने नक्कीच! पलायन करणे ही काही साधीसुधी गोष्ट नाही. त्यासाठी साहस व बुद्धिचातुर्य लागते. व्यवस्था आपल्या बाजूने वळवण्यासाठी सामदामदंडभेद नीतीच्या वापरात पारंगत असावे लागते. तुमच्यातील बहुतेकांमध्ये या यच्चयावत गुणांचा वेगाने शिरकाव होत असल्यामुळेच राज्याला प्रथम क्रमांकाचा मान मिळाला म्हणून तुमचे त्रिवार अभिनंदन! (टाळया) मी कैदी असलो व येथे तुमचे नेतृत्व करत असलो तरी मी मूळचा पांढरपेशा आर्थिक गुन्हेगार आहे. साहित्यात पलायनवादाकडे साहसी वृत्ती म्हणूनच बघितले गेले व कैदी पळून गेल्याच्या घटनांवर अनेक पुस्तके लिहिली गेली. आताही राज्याला क्रमांक एकवर आणणाऱ्या बातमीचे कात्रण कापून आपल्याला वर्तमानपत्रे वाचायला दिलीत पण माझ्या लक्षात येताच येथील व्यवस्थेला ‘वाकवून’ मी ते कात्रण मिळवल्याने आपला ‘पराक्रम’ सर्वांना कळू शकला व सभा घेता आली. हातावर तुरी (म्हणजे पैसे) देऊन पळून जाणे हा सरकारच्या दृष्टिकोनातून गुन्हा असला तरी आपल्या दृष्टीने नाही हे सर्वांनी पक्के ध्यानात घ्यावे.
हेही वाचा >>> लोकमानस : शेतकऱ्यांचे नुकसान; धनदांडग्यांचा फायदा
केलेल्या गुन्ह्यापेक्षा जास्त शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांनी करावे तरी काय या प्रश्नावर जोवर सरकार खोलवर विचार करत नाही तोवर पळून जाण्याचे आपले प्रयत्न सतत सुरूच ठेवावे असे आवाहन मी या निमित्ताने करतो. याच अहवालात महाराष्ट्राने भ्रष्टाचारातसुद्धा गेली तीन वर्षे सतत पहिला क्रमांक कायम ठेवल्याची नोंद असल्याचे एका रक्षकाकडून लाचेच्या बदल्यात समजले. अशी भ्रष्ट व्यवस्था अवतीभोवती असणे हा आपल्यासाठी दुग्धशर्करा योग. त्यामुळे या काळात आपल्या पलायनवादी वृत्तीला जोर चढायलाच हवा. (प्रचंड टाळया) आपण पळून गेल्याला जबाबदार धरून राज्यातील एकाही पोलिसावर कारवाई करण्यात आलेली नाही असे हा अहवाल सांगतो. याचा अर्थ सध्याची परिस्थिती आपल्यासाठी खूपच अनुकूल आहे. त्यामुळे सर्वांनी आता त्यादृष्टीने विचार करणे सुरू करावे. या राज्यात कैदी पलायनाची परंपरा अगदी जुनी. शत्रूपक्षाच्या कैदेतून पळून जाणाऱ्या राजे, महाराजांच्या कथा बालपणापासून आपल्या मनावर कोरलेल्या. भले त्यांनी चांगल्या कार्यासाठी पलायन केले असेल पण आपण वाईट कामासाठी पलायन करतो हा युक्तिवादच मुळात खोटा. आपणही आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी व येथे कैद्यांना अकारण सडवत ठेवण्याची सरकारी वृत्ती जगासमोर यावी याच उदात्त हेतूने हे करत असतो. पसार होण्यातून आपण व्यवस्थेतील विसंगती दाखवून देतो. त्या दूर करणे म्हणजे प्रगती. त्यामुळे आपली ही कृती एकप्रकारे प्रगतीला हातभार लावणारीच. या विसंगती किंवा आपल्या जेलच्या भाषेत ‘भगदाडे’ कधीच दूर होणार नाहीत, तसेच कैदी हा नेहमी पोलिसांच्या समोर असतो याची खात्री असल्यामुळे कोणतेही वैषम्य न बाळगता भ्रष्टाचाराप्रमाणेच या मुद्दयावर सुद्धा राज्य सलग कसे प्रथम क्रमांकावर राहील यासाठी सर्वांनी कसून प्रयत्न करावे असे आवाहन करून मी थांबतो. आता सर्वांनी एका सुरात म्हणा ‘जय चार्ल्स शोभराज’!