तापमानवाढ आणि हवामान बदलांची चिंता जगभर व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजवर आपापल्या कार्यक्षेत्रात पर्यावरणस्नेही पर्यायांचा धांडोळा घेणाऱ्या आणि निसर्गाची हानी मर्यादित ठेवूनही प्रगती शक्य असल्याचे सिद्ध करून दाखवणाऱ्या व्यक्तींच्या वाटचालीवर प्रकाश टाकणारे ‘स्पीकिंग विथ नेचर’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. लेखक, पर्यावरण अभ्यासक रामचंद्र गुहा यांच्या या पुस्तकातून भारतीय पर्यावरणवाद्यांच्या इथल्या मातीत रुजलेल्या मुळांचा शोध घेण्यात आला आहे. पुस्तकात शांतिनिकेतनच्या रूपाने शिक्षण आणि पर्यावरणाची सांगड घालण्याचा प्रेरणादायी प्रयोग करणारे रवींद्रनाथ टागोर आणि महात्मा गांधींचे पर्यावरणवादी अनुयायी कुमारप्पा यांच्या पर्यावरणविषयीच्या आग्रही भूमिकांचा मागोवा घेण्यात आला आहे. आध्यात्म व पर्यावरणाची सांगड घालणाऱ्या के. एम. मुन्शी यांच्या वनमहोत्सवाशी ओळख करून देण्यात आली आहे. प्रसिद्ध निसर्ग अभ्यासक एम. कृष्णन यांनी भारताचा संस्कृतिक इतिहास आणि येथील नैसर्गिक वारसा यातील दुवा कसा अधोरेखित केला हेदेखील स्पष्ट करण्यात आले आहे. ब्रिटिश राजवटीत भारतात पर्यावरणवाद का आणि कसा रुजला, याचा आढावा या पुस्तकात घेण्यात आला आहे. पर्यावरणवाद्यांनी पाश्चिमात्य देशांतील औद्योगिकीकरणाविषयी व्यक्त केलेली नाराजी पुस्तकात प्रतिबिंबत झाली आहे. ‘फोर्थ इस्टेट’ने प्रकाशित केलेले हे पुस्तक पर्यावरणाविषयी आणि एकंदरीतच मानवजातीच्या भवितव्याविषयी ज्यांना चिंता आहे, अशा प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरू शकते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा