आदूबाळ

जगात सुरू असलेली युद्धं विविध मार्गांनी आपल्यापर्यंत येऊन भिडली आहेत. माणूस इतिहास घडवतो तसा इतिहासही माणसांना घडवत असतो. अशाच कित्येक युद्धांचा आणि त्यांनी माणसांवर लिहिलेल्या इतिहासाचा मागोवा घेणारी कादंबरी…

nude painting
अन्वयार्थ: असभ्य, म्हणून अश्लील!
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
india s economy slowing down
अग्रलेख : मध्यमवर्ग मेला तरी…
book review the silk route spy book by author enakshi sengupta
बुकमार्क : गुप्तहेर की देशभक्त?
loksatta editorial on inflation
अग्रलेख: थाली बचाव…!
Stampede at Mumbai s Bandra
अग्रलेख: पंचतारांकितांचे पायाभूत
mharashtra total registered voters
अग्रलेख : अवघा हलकल्लोळ करावा…
loksatta editorial on fake court set up in ahmedabad zws
अग्रलेख : भामटे आणि तोतये…

र एक फत्ह-ओ-ज़़फर के दामन पे खून-ए-इंसान का रंग क्यूँ है? – साहिर लुधियानवी

काही कादंबऱ्या – लहान असल्या तरीसुद्धा – वाचायला कठीण असतात. वाचक म्हणून त्या तुम्हाला शब्दांमागून शब्द बकरीसारखे चरू देत नाहीत. थबकवतात, विचार करायला भाग पाडतात आणि तुम्ही ‘तसले’ वाचक असाल तर आवडलेल्या ओळी अधोरेखित करण्याशिवाय पर्याय नसतो. ॲन मायकल्स या कॅनेडियन कवयित्रीची ‘हेल्ड’ ही कादंबरी अशा पुस्तकांपैकी एक आहे.

या कादंबरीला सलग सरळरेषीय कथानक नाही. रूढार्थाने ही ‘ऐतिहासिक कादंबरी’ आहे, पण त्यात इतिहासाचा पट तपशिलात रंगवण्यावर फार भर दिलेला नाही. लहानशा तुकड्यातुकड्यांत सांगितलेली ही एका कुटुंबाच्या चार पिढ्यांची १२० वर्षांत पसरलेली कथा आहे. हे तुकडेही सरळ मांडलेले नाहीत – भूत/ भविष्यात मारलेल्या उड्या आहेत. घटना आहेत, त्या घटनांना पात्रांनी दिलेले प्रतिसाद आहेत. प्रसंगी अद्भुताचा वावर आहे. पण ही पात्रांची चरित्रं नाहीत – त्यांच्या आयुष्यातले मोठमोठे तुकडे कोरे आहेत – त्यावर लेखिका लिहित नाही. कथनातली ती शांतता वाचकाने भरून काढायची आहे.

हेही वाचा >>> बुकमार्क : गुप्तहेर की देशभक्त?

‘एका कुटुंबाच्या चार पिढ्यांची कथा’ मराठी वाचकाला नवीन नाही. ‘मुखवटा’ किंवा ‘तुंबाडचे खोत’ या कादंबऱ्यांच्या संकेतांनुसार ‘हेल्ड’चे पत्ते ओळीत लावता येतील. सुरुवात होते ती पहिल्या महायुद्धात जखमी झालेल्या जॉन या ब्रिटिश सैनिकापासून. त्या नृशंस संहारापासून तो मनाने कधीच मुक्त होऊ शकत नाही. तो इंग्लंडमध्ये परततो आणि फोटोग्राफीचा व्यवसाय सुरू करतो. त्यादरम्यान त्याला काही अद्भुत, अतिंद्रिय म्हणावे असे अनुभवही येतात. त्याची पत्नी हेलेना कुशल पण अयशस्वी चित्रकार असते. इंग्लंडमधल्या त्यांच्या वास्तव्यात महायुद्धातल्या मृत/ बेपत्ता सैनिकांच्या कुटुंबीयांचे त्यांना आलेले अनुभव मानवी अस्तित्व, संहार, आणि प्रेमभावनेच्या खोलात घेऊन जातात.

जॉन-हेलेना यांची मुलगी अॅना मार्क्सवादी विचारांच्या एका हॅट बनवणाऱ्याशी लग्न करते. तीही वेगवेगळ्या युद्धांमध्ये वैद्याकीय सेवा पुरवते, त्यासाठी सतत युद्धभूमीवर जाते. तिची मुलगी मारा हीदेखील युद्धभूमीवर सेवा पुरवणारी डॉक्टर होते. अशाच एका युद्धभूमीवर तिचा युद्धपत्रकार नवरा तिला भेटतो. एका अतिशय तरल प्रसंगात मारा तिच्या नवऱ्याला ती चार महिने गरोदर असल्याचं सांगते आणि त्याच वेळी तीन आठवडे युद्धभूमीवर जाणार असल्याचंही सांगते. ती परत येणार नाही असं तिच्या नवऱ्याला आणि वडिलांना आतून वाटत आहे, पण मारा आपल्या निर्णयावर ठाम आहे. अद्याप न भोगलेल्या या दु:खाला हे कसे सामोरे जातात हे लेखिका अत्यंत हळुवारपणे रंगवते. अखेर ती आपल्या माणसांच्या प्रेमापायी स्वत:ची होळी करायचं टाळते. कालांतराने त्यांना मुलगी होते, तिचं नावही ते ॲना ठेवतात.

कथनाचा प्रत्येक तुकडा आपली नवनव्या ठिकाणच्या नव्या पात्रांशी भेट घडवून आणतो. कथनातल्या त्यांच्या वावरातून काही ध्वनी-प्रतिध्वनी-चित्रं वाचकाला परिचित होत जातात. त्या पात्रांमधले परस्परसंबंध लेखिकेने प्रत्यक्ष ठासून मांडलेले नसले तरी लक्षपूर्वक वाचणारा वाचक ते जाळं मनात बांधत जाऊ शकतो. उदा. दुसऱ्या ॲनाच्या प्रेमात घायाळ झालेला आयमो नावाचा तरुण हा आधी एका प्रकरणतुकड्यात भेटलेल्या संगीतकार युगुलाचा मुलगा आहे हा अंदाज करता येतो. या युगुलाला इस्टोनियामधून विचारगुन्हा (थॉट क्राईम) केल्याबद्दल हद्दपार केलेलं असतं. दुसऱ्या एका प्रकरणतुकड्यात पहिल्या ॲनाचा नवरा हा जंगलात लाकडं गोळा करताना बेपत्ता झालेल्या एका फ्रेंच स्त्रीचा मुलगा असल्याचं लक्षात येतं. हे दुवे फिकट भासले तरी संपूर्ण कादंबरीच्या चौकटीत त्यांना महत्त्वाचं स्थान आहे. याच साखळीत पुढे अर्नेस्ट रदरफोर्ड, मारी आणि पिएर क्युरी हे सुप्रसिद्ध पदार्थवैज्ञानिक भेटतात. जॉन-हेलेना-मारा-ॲना यांच्या कथनाशी या दुव्याचा संबंधही फिकाच आहे. मादाम पॅलाडिनो या तथाकथित अतिंद्रिय शक्ती असलेल्या प्रख्यात ‘मीडियम’बद्दल त्यांच्यात झालेली चर्चा कादंबरीच्या गाभ्याला स्पर्श करून जाते- जगाकडे पाहायचा विज्ञाननिष्ठ- भौतिक- दृष्टिकोन अवलंबावा की मानवी अस्तित्वाला व्यापणाऱ्या, आकार देणाऱ्या त्यापेक्षा वेगळ्या शक्तीवर निष्ठा ठेवावी?

ॲन मायकल्सची ही तिसरी कादंबरी. ‘फ्युजिटिव्ह पीसेस’ या १९९६ साली प्रसिद्ध झालेल्या तिच्या पहिल्याच कादंबरीने तिला प्रसिद्धी मिळवून दिली. बीबीसीच्या ‘शतकातल्या सर्वात महत्त्वाच्या १०० कादंबऱ्या’ (100 Novels That Shaped Our World) या मानाच्या यादीत ‘फ्युजिटिव्ह पीसेस’ला स्थान आहे. मूळची कवयित्री असल्याने तिच्या गद्यालेखनालाही एक काव्यमय लय आहे. कादंबरी ही अतिशय फसवी गोष्ट असते. कथानक, पात्रयोजना आणि शैली हे कादंबरीचे तीन आधारस्तंभ मानले जातात. सामान्यत: तिन्ही भक्कम असले की कादंबरी किमान वाचनीय होते. पण रूढ संकेत पार मोडून टाकणं प्रतिभावान कलाकाराचं व्यवच्छेदक लक्षण असतं. अॅन मायकल्सच्या लेखनात हे जाणवतं. ती शब्दांच्या गारुडात वाचकाला अडकवून टाकते. कथानक आणि पात्रयोजना तिच्या जगात तुलनेत बिनमहत्त्वाचे आहेत. नेमके, मोजके शब्द आणि चित्रदर्शी प्रतिमा ती एकमेकांशेजारी ठेवत जाते. त्यातून निर्माण होणारा अनुनाद वाचकाला साद घालेल अशी आशा तिला असते.

अर्थात, सर्वच वाचकांना ही पद्धत पचनी पडेल असं नाही. एका गोष्टीतून बाहेर येणारी दुसरी गोष्ट, किंवा तिसऱ्या गोष्टीचा दुवा पाचव्या गोष्टीशी जुळणे ही पद्धत भारतीय वाङ्मयावर पोसलेल्या वाचकाला फार वेगळी वाटत नाही, पण कथानकाच्या घट्ट दुधावर, सुरुवात-मध्य-शेवटाच्या सकस आहारावर पोसलेल्या विशिष्ट वाचकाला ही कथनाची तुटकी थोटकं आणि सोडून दिलेले काव्यात्म विचारतरंगांचे दुवे त्रासदायक वाटू शकतात. पात्रांचा आणि काळाचा सांधेबदल गोंधळात टाकू शकतो. ‘अज्ञाताचा विचार करायला आपण फक्त ज्ञात गोष्टीच वापरू शकतो’ असली लहानशी सुभाषितवजा वाक्यं सखाराम गटण्याच्या ‘जीवनविषयक सूत्रां’ची आठवण करून देऊ शकतात, अशा वाचकाला ही कादंबरी बिलकूल झेपणार नाही, पण त्यात वाचकात काही हीन आहे असं समजण्याचं कारण नाही. ‘अशा’ लेखकांचा पिंड वेगळा असतो तसा ‘तशा’ वाचकांचाही.

पण तरीही आजच्या विचक्षण वाचकाने एकदा ‘हेल्ड’ वाचून पाहायला हरकत नाही. विशेषत: द्वेष, घृणा, रक्तपात आणि युद्धांनी भरलेल्या आपल्या सद्या आसमंतात प्रेमगीत वाजवणारी ही बारीकशी पिपाणी एरवी ऐकायला येईल-न-येईल! विविध युद्धं ‘हेल्ड’च्या कथनामागे सतत वावरताना दिसतात. या कादंबरीत युद्ध आहे, पण युद्धाचे तपशील नाहीत. किंबहुना युद्धं क्वचितच नावानीशी उल्लेखली आहेत. लेखिकेला त्याची गरजच वाटत नाही. ‘इतिहासकारासाठी प्रत्येक युद्ध वेगवेगळं असतं; तत्त्ववेत्त्यासाठी सगळी युद्धं सारखीच असतात’ – असं मार्मिक निरीक्षण ती एके ठिकाणी नोंदवते. लेखक म्हणून तिची भूमिका इतिहासकाराची आहे की तत्त्ववेत्त्याची हे स्पष्टच आहे. त्याऐवजी ती युद्धस्थितीशी संबंध असलेल्या तिच्या पात्रांच्या मनोव्यापारावर लक्ष देते. युद्धावर जाणारी, युद्धात अडकलेली, युद्धावरून आलेली, किंवा युद्धामुळे आयुष्य बदललेली सामान्य माणसं. एके ठिकाणी ती एक किस्सा नोंदवते. पहिल्या महायुद्धावर जाणाऱ्या प्रत्येक स्कॉटिश सैनिकाकडे त्याच्या आईने/ बायकोने/ प्रियतमेने स्वत: विणलेला स्वेटर असे. प्रत्येक गावाची विशिष्ट नक्षी असे आणि त्या नक्षीतही प्रत्येक विणकर स्त्री स्वत:ची विविक्षित अशी ‘चूक’ बुद्ध्या करत असे. ‘ही चूक नव्हती, हा भविष्यातल्या अंधारात धाडलेला संदेश होता,’ अॅन मायकल्स लिहिते. ‘हा धोक्याचा, भीतीचा टाका होता. अज्ञाताला केलेली प्रार्थना होती – हा स्वेटर ल्यालेला निश्चेष्ट देह सापडला तर तो आपल्या कुटुंबाकडे पाठवा. मृताचा पुढचा प्रवास एकट्याने होऊ देऊ नका. विणकामातली ही ‘चूक’ त्यामागच्या प्रेमभावनेमुळे अ-चूक होते आहे.’

माणुसकी, आपुलकी, जिव्हाळा, प्रेम ही माणसांच्या परस्परसंबंधांतली ओल माणसांनीच माणसांविरुद्ध सुरू केलेल्या युद्धांमुळे करपून जाईल की काय, अशी शक्यता वाटत असताना ॲन मायकल्स या भावनांचा प्रवाह कादंबरीच्या पानापानांतून झिरपवते. युद्धाच्या होरपळीत प्रेमभावनेचा तीव्र ताजेपणा टिकेल का? प्रेम हा जखम आणि मृत्यू यांचा उतारा असू शकतो का? ‘प्रत्येक युद्धाच्या विजयपताकेवर माणसाच्या रक्ताचा रंग का असतो?’ असं विचारणाऱ्या एका आधुनिक भारतीय कवीची आठवण इथे क्रमप्राप्त आहे. कलावंताचा हा भाबडेपणा आहे की चतुरपणा हे ज्याचं त्याने ठरवावं.

जगात सध्या सुरू असलेली विविध युद्धं विविध मार्गांनी आपल्यापर्यंत येऊन भिडली आहेत. आपण प्रत्यक्ष युद्धभूमीवर नसेना का, पण एका अर्थी या युद्धांशी आपलाही दूरचा का होईना, संबंध आहे. ‘माणूस इतिहास लिहितो तसा इतिहासही माणसांवर लिहित जातो. आपल्या शरीरांवर आता युद्ध कोणता इतिहास लिहित आहे?’ ॲन मायकल्स विचारते. अस्वस्थ झालेली संवेदनशील माणसं सध्या स्वत:ला हाच प्रश्न विचारत आहेत. इतिहासकथनातला कोरडेपणा बाजूला ठेवून ही कादंबरी आपल्या सर्वांच्या आत खोलवर जिरत चाललेल्या युद्ध या स्थितीला साद घालते आहे. ॲन मायकल्सने या कादंबरीचं नाव ‘हेल्ड’ का ठेवलं आहे याबद्दल अनेक मतमतांतरं आहेत. ते ‘होल्ड’ (‘धरणे’) या क्रियापदाचं भूतकालवाचक धातुसाधित (past participle) आहे का? प्रत्येक माणूस असा कोणा-ना-कोणाशी प्रेमा-जिव्हाळ्याच्या धाग्यांनी धरला-बांधला गेलेला असतो का? असाही अर्थ निघेल, पण मला थोडं वेगळं वाटतं. ‘हेल्ड हॉस्टेज’ किंवा ‘ओलीस ठेवले’ असा एक वाक्संप्रदाय इंग्रजीत आहे. आपल्या आत झिरपत असलेल्या युद्धांनी आपल्याला ओलीस ठेवलं आहे, या कादंबरीतल्या पात्रांसारखंच.

हेल्ड – ॲन मायकल्स

ब्लूम्सबरी पब्लिकेशन

पृष्ठे : २४०

मूल्य : २,७७३ रुपये

aadubal@gmail.com

Story img Loader